'जा, पण मधून मधून येत जा. मधून मधून तहान लागते. पाण्याची नव्हे - तुम्हांला पाहण्याची. जा तुम्ही, तात.' तो म्हणाला.
'नागेश आहे हं येथें.' असें म्हणून आस्तिक गेले.
'नागेश शशांकाला थोपटीत होता. त्याचें हातपाय चुरीत होता. इकडे ऋषींचे बोलणें चाललें होतें.
'आस्तिकांचें आश्रमवासीयांवर किती प्रेम !' दधीचि म्हणाले.
'त्यांच्या आश्रमांतून जे जे जिंकून गेले ते थोर काम करीत आहेत. आस्तिक म्हणजे सेवामूर्ति, प्रेममूर्ति, ज्ञानमूर्ति. मागें एकदां आलों होतों येथें, तर स्वत: एका मुलाचे दांत घांशीत होते. रागावून नाहीं, तर हंसत हंसत. मला कौतुक वाटलें.' यज्ञमूर्ति म्हणाले.
'आणि मी आलों होतों येथें एकदां. सर्व मुलांसह आम्हीं वनांत काष्ठें आणण्यासाठीं गेलों. कांहीं मुलें झाडांच्या हिरव्या फांद्या तोडूं लागलीं. तेव्हां आस्तिक म्हणाले, 'वाळलेलीं काष्ठें थोडी का आहेत ? मुद्दाम जिवंत फांद्या कां म्हणून तोडतां ? नाहींच मिळालें कोरडें इंधन तर मग ओलें. मेलेलें लांकूड आधीं नेऊ या.' अशी त्यांची दृष्टि. मी तर चकित झालों. उगीचच्या उगीच झाडाची फांदीहि न दुखवूं पाहणारे हे प्रेमसागर आहेत. जनमेजयासमोर जाऊन ते जर उभें राहतील तर त्याला काय वाटेल ? ते वाटेंनें जातांना लक्षावधि लोकांना काय वाटेल ? आणि ही लक्षावधि जनता का स्वस्थ बसेल ? ती त्यांच्या पाठोपाठ येईल. इंद्राचें सैन्य पुरवलें. परंतु हे शांतिसैन्य कसें पुरवणार ? मला तर आंतून उचबळून येत आहे. हिरवी हिरवी करूं आपण सृष्टि, जीवनाची सृष्टि, भारतीय सृष्टि ! सुंदर अशा या भरतभूमीतील आपलें जीवनहि सुंदर करूं. भरतभूमींत सुंदर सूर्य, सुंदर चंद्र ! येथील जनतेच्या जीवनांतहि निर्मल ज्ञानसूर्य असो; मधुर प्रेमाचा, मधुर भावनांचा चंद्र विलसो. सुंदर बालसृष्टि, सुंदर अंत:सृष्टि ! आस्तिक मार्ग दाखवतील. ' हारीत म्हणाले.
असा त्यांचा संवाद चालला होता; तोंच आस्तिक आलें.
'वेळ नाहीं ना फार लागला ?' त्यांनी नम्रपणें विचारिलें.
'आणि वेळ लागला असता म्हणून काय झाले ? बरें वाटतें का मुलाला ? ' यज्ञमूर्तींनी प्रश्न केला.
'त्याला माझें आहे वेड. किती गोड आहे मुलगा ! त्याचा पिता तिकडें बांसरी वाजवून द्वेष शमवीत आहे. त्याचाच हा पुत्र. याचं बोलणें म्हणजेच मधुर वेणुनाद आहे.' आस्तिक कौतुकानें म्हणाले.
'स्त्रियांनी म्हणे वाटेंतून एका राजाचे सैन्य परतविलें. शेंकडों स्त्रिया शांतिसूक्तें गात, प्रेमगीतें गात चालल्या होत्या. त्या सैन्यासमोर त्या उभ्या राहिल्या. 'आम्हांला मारा व मग जायचें असेल तर जा. आम्हांला मागें रडत ठेवू नका.' असे त्या म्हणाल्या. त्या स्त्रियांत वत्सलाच प्रमुख होती. या मुलाचीच ती आई ना ? ' हारीतांनी विचारिले.
'हो.' आस्तिक म्हणाले.