'आणि एका नागकन्येनें हातांत निखारें घेऊन जनमेजयाच्या राजपुरुषांना 'स्त्रिया भीत नाहींत होमकुंडाला' हे दाखवूंन दिलें म्हणतात. राजाचे अधिकारी तेथून पळून गेले. त्या गांवातील भांडणें मिटून तेथें स्वराज्य स्थापिलें. सर्वांनी. एकेक आश्चर्यच.' दधीचि म्हणाले.
'नवयुगाचा जन्म होण्याचें हें वातावरण आहे. सर्व स्त्री-पुरुषांच्या हृदयांत एकच भाव जागृत झाला आहे. स्त्री-पुरुषांतील सुप्त शक्ति जागृत करणा-या जनमेजयास धन्यवादच दिले पाहिजेत.' आस्तिक म्हणाले.
'मग काय ठरले ? ' यज्ञमूर्तींनीं प्रश्न केला.
'एके दिवशीं निघावयाचें. आस्तिकांनी दिवस कळवावा.' दधीचि म्हणाले.
'महान् यज्ञ पेटवायचा ना ? ' आस्तिकांनी विचारलें.
'हो.' हारीत म्हणाले.
'मग तुम्हीं आतां प्रचार करा. दिवस मी कळवितों.' आस्तिक म्हणाले.
'ठीक.' सारे म्हणाले.
ऋषिमंडळी मोठया पहांटे उठून निघून गेली. ती मंडळी गेली व वत्सला आणि नागानंद आलीं. येऊन शशांकाजवळ बसलीं.
'किती दिवसांनी आलीस, आई ? ' त्यानें विचारिलें.
'येथे माझ्याहून मोठी आई होती. म्हणून नाहीं आलें; आणि बाळ, आतांहि राहतां नाहीं येणार. तुला भेटून जायचें आहे. स्त्रियांची शांतिसेना घेऊन मी प्रचार करितें आहें. आपापलीं मुलेंबाळें सोडून भगिनी माझ्याबरोबर आल्या आहेत. मग मी का तुझ्याजवळ बसूं ? तो मोह दिसेल, ती आसक्ति दिसेल. आमच्या शांतिसेनेतील एकता कदाचित् कमी व्हायची, खरें ना ? आणि हे सुध्दां पुरुषांची शांतिसेना घेऊन हिंडत आहेत. मधुर मुरली वाजवून सर्वांना प्रेमवेडे करीत आहेत. तुला भेटायला आलों आहोत. लौकर बरा हों.' वत्सला म्हणाली.
'आई, मी बरा झालों तरी तात आस्तिकांबरोबर मी जाईन. ते जर निघालें त्या यज्ञकुंडांत, त्या सर्पसत्रांत उडी घ्यावयास, तर मी त्यांच्याबरोबर जाईन. मी उडी मारीन. प्रल्हाद रडला नाहीं. सुधन्वा रडला नाहीं. मी पण नाहीं रडणार. हंसेन व आंगीत कुदेन. आई, तूं रडूं नको हं ! हें काय रडतेसशी ?' त्यानें विचारिलें.