वत्सला आनंदून आली होती. परंतु गंभीर झाली. ती तेथें बसली. तीहि निजली. दमून आली होती. आजीच्या दुस-या मांडीवर ती निजली. सुश्रुता त्यांच्याकडे पाहत होती. दोघांच्या डोक्यांवरून तिनें हात फिरविले. झोपेंत नागानंदाचा एक हात वत्सलेच्या हाताजवळ आला. ते दोन्ही हात मिळालें. एकत्र मिळाले.
नागानंद जागा झाला. कोणाचा हात होता त्याच्या हातांत ? त्यानें पाहिलें. तों तो गोरा गोरा हात. त्यानें आपला हात दूर घेतला. तो वत्सला जागी झालीं. तिनें त्याच्याकडे पाहिलें.
'घ्या हो दोघें हातांत हात मी ! तुमचे हात एकमेकांच्या हातांत देतें. करा पाणिग्रहण. आजीच्या मांडीवर बसून पाणिग्रहण. तुम्ही परस्परांसाठी जन्मलेलीं आहांत. तुम्ही एकमेकांपासून दूर राहूं शकणार नाही. जवळ याल तर सुखानें नांदाल. वत्सले, बस. तुझ्या गळयांतील ह्या माळांपैकीं एक नागानंदाच्या हातांत दे व एक तूं आपल्या हातांत घे. घाला परस्परांस. खालीं काय पाहतां ! खरेंच मी सांगते.' आजी प्रेमानें म्हणाली.
वत्सलेनें गळयांतील एक माळ काढली व नागानंदाच्या हातीं दिली. तिनें एक माळ आपल्या हातीं घेतलीं. उभयंतांनी एकमेकांस घातल्या माळा. दोघें सुश्रुता आजीच्या पायां पडलीं. वृध्देचे डोळे भरून आले. शतस्मृतींनी भरून आले. तिनें त्यांना शुभ आशीर्वाद दिले ! वत्सला व नागानंद यांचा विवाह झाला.
राजा परिक्षिति कधीं कधीं फार उच्च विचारांत रमे, तर कधीं फारच खालीं येई. त्या जीवनांत चंचलता होती. तो आज काय करील, उद्यां काय करील याचा नेम नसे. पुष्कळ वेळां स्वत:चा निर्णय त्याला कधीं घेतां येत नसे. अशा माणसांची स्थितिं मोठी चमत्कारिक असतें. जेथें जातील तेथें त्या त्या बुध्दिमान. माणसांचे ते कबूल करतात. पुन्हां मागून पस्तावतात. 'मीं कसें असें केलें ?' असें त्यांचें त्यांनाच मग आश्चर्य वाटतें.
एके दिवशीं परीक्षिति, जगांव कांहींच शेवटी खरें नाहीं अशा विचारांत होता. जगांत सारा सांवळागोंधळ आहे असें त्या दिवशीं त्याच्या मनांत येत होतें. अशा मन:स्थितींत तो शिकारीस निघाला. आज नि:शंकपणें तो बाण मारीत होता. हरिण असो, हरिणी असो वा हरिणपाडस असो -- त्याचा बाण आकर्ण धनुष्य ओढून सोडला जाई. आज सर्वांची तो हत्या करीत होता. पक्ष्यांवरहि आज दया नव्हती. त्यांनाहि बाण मारून खालीं पाडीत होता. आज स्वत:लाहि बाण त्यानें मारला असता ! जीवन म्हणजे निरर्थक वस्तु, असेंच आज त्याच्या मनांत होतें.
एका झाडावर एक सर्प विळखा मारून बसला होता. परीक्षितीचें लक्ष गेलें. त्यानें मारला बाण साप त्या झाडांत खिळून बसला. आणखी एक बाण मारला व तो साप मेला. प्रचंड होता साप. तो मेलेला साप त्यानें बरोबर घेतला.