रीसा सभा उठली. राजपुरुष घाबरले. त्यांच्या भोवतीं सर्व स्त्री-पुरुषांचा गराडा पडला. इतक्यांत मंजुळ आवाज कानांवर आला. बांसरीचा आवाज. नागानंद व वत्सला आलीं. प्रेमाचा धर्म घेऊन आलीं. जिवंत असणा-यांना अधिक यथार्थपणें जिवंत करण्यासाठीं आलीं. सारी सभा तटस्थ झालीं. वत्सला गांणें म्हणत होती. नागानंद बांसरी वाजवीत होता. अपूर्व गाणें, अपूर्व वाजविणें.
'आकाशांतून जीवन देणारापाऊस पडतो, समृध्दि देणारा प्रकाश मिळतो. मानवा, तुझ्या हृदयाकाशांतून तूं का जीवनाचा संहार करणारा द्वेष देणार, जीवनाला जाळून टाकणारा क्रोध देणार ?
अरे, आपण सडक्या नासक्या वस्तूंहि शेतांत टाकून त्यांच्यापासून भरपूर धान्य मिळवितों. मनुष्य कां त्यापेक्षा वाईट ? विषांतून अमृत मिळवणरा, मातीचे सोनें करणारा, शेणखतांतून धान्य निर्मिणारा असा हा मानव--त्याला मानवांत मंगलता कां दिसूं नये ?
ऊठ, ऊठ बंधो ! ऊठ, माते ! ऊठ. सर्वत्र मांगल्याचा अनुभव घे. सारें सुंदर आहें, शिव आहे. सूर्य आपले किरण सर्वत्र फेकतों व सारें प्रकाशमान करतो. आपणहि प्रेमाचे किरण सर्वत्र फेंकू या व सारें सुंदर करूं या.
आग पेटली आहे. चला विझवावयाला. आपलीं जीवनें घेऊन चला. जो मानव असेल तो उठेल. जो पशु असेल तो पळेल. कोण येतां, बोला. मांगल्य बोलावीत आहे. मानव्य हांक मारीत आहे. नवधर्म बोलावीत आहे, कोण येतां बोलां !
द्वेषाची लाट आली आहे; प्रेमाचा सिंधु घेऊन चला. संकुचितपणा येत आहे; विशालता घेऊन चला. क्षुद्रता घेरूं पाहत आहे; उदारता घेऊन चला. अंधार येत आहे; प्रकाशाचे झोत आणा. घाण येत आहे; सुगंध पसरा. मरणाचा सुकाळ होत आहे; जीवनाची वृष्टि करा. बंधनें वेष्टूं पाहत आहेत; तोडी ती बंधनें. मुक्त करा म्हणजे मुक्त व्हाल. बध्द कराल तर बध्द व्हाल. ओ का कोणी मोक्षार्थी, कोणी मुमुक्षु ? उठूं द्या जे कसतील ते.
मोक्षाची नवप्रभात येत आहे. जीवनाचा दीप पाजळून स्वागतार्थ जाऊं या. सत्वपरीक्षा आहे. चला, परीक्षा देऊ. सोनें आगींतून परीक्षिलें पाहिजे. आपलें जीवन सोन्याचे आहे. चला, तें सिध्द करूं. चला सारे मानव, चला सर्व मायबाप, चला पतिपत्नी, चला बहिणभाऊ, चला लहानथोर, येथें ना आर्य कोणी, ना नाग कोणी. ही मानव्याची परीक्षा आहे.'
वत्सला गाणें गात होती, नागानंदाची बांसरी चालली होती. कृष्णी येऊन नाचूं लागली. कार्तिकही आला. सारे आले. लहानथोर आले. सारे नाचूं लागलें. सारे गाणें म्हणू लागले. आणि ते राजपुरुष कोठें आहेत ? ते सैनिक कोठे आहेत ? तें कोलित कोठें आहे ? आग विझली. प्रेमाचा मळा तेथें पिकला.
गाणे थांबलें, वाजवणें थांबले.