धर्मानंद कोसंबी यांनी बहुतेक सर्वच लेखन मोकळ्या सरळ अस्सल मराठीत केले आहे. परंतु या संदर्भात असे सांगावेसे वाटते की, अलिकडे गेल्या २०-२५ वर्षांत मराठी शैलीतील साधी अर्थवाहकता कमी होत चालली आहे. विशेषत: ललित, साहित्यातील शैली नटवी, पसरट व गुंतागुंतीची बनत चालली आहे. कवितांमध्ये याचा प्रत्यय अधिक येतो. ॠजुता, प्रसन्नता, अर्थवाहकता हा दोष ठरेल की काय अशी भीती वाटत आहे. अर्थ गूढ वा अव्यक्त असलेली शैली साहित्य पदवीला भूषवू लागली आहे. याचे एक कारण असे की, विचार आणि प्रत्ययशीलता ही अर्थाला सरळ पोचेनाशी झाली आहेत. धर्मानंदांची लेखनशैली या अवनतीपासून वाचवील, अशी आशा वाटते.

म.रा.सा.सं. मंडळाने प्राचीन ग्रंथमालेत आजवर भरतमुनीचे ''भरतनाट्यशास्त्र'' (अध्याय ६ व ७ आणि अध्याय १८ व १९), विशाखादत्त्ताचे ''मुद्राराक्षसम्'', कात्यायनाचे ''कात्यायन शुल्बसूत्रे'', पाली भाषेतील ''धम्मपदम्'', शाड्र्गदेवाचे ''संगीत रत्‍नाकर'' भाग १, इत्यादी संस्कृत ग्रंथांची भाषांतरे प्रकाशित केली आहेत. तसेच ''भरत नाट्यशास्त्र'' अध्याय २८, ''चार शूल्बसूत्रे'' या संस्कृत ग्रंथांची भाषांतरे तसेच कवी हाललिखित ''गाथा सप्‍तशती'', कवी बिहारी लिखित ''सतसई'' व जयदेवकवी विरचित ''गीतगोविंदम्'' या भाषांतरित ग्रंथांचे मुद्रण चालू आहे.

बौद्ध धर्म विषयक ग्रंथांचे ज्ञान सामान्य मराठी वाचकांना व्हावे म्हणून कै. धर्मानंद कोसंबी यांच्या मौलिक व दुर्मिळ साहित्याचे पुनर्मुद्रण करण्याचे मंडळाने ठरविले आहे. जातककथा भाग १, २ व ३ चे मंडळाच्या प्राचीन ग्रंथमालेत प्रकाशित करण्यास मंडळास आनंद होत आहे.

मुंबई

माघ ३० शके १९००
सोमवार दि. १९ फेब्रुवारी १९७९

लक्ष्मणशास्त्री जोशी
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel