गरुड म्हणाला ''पण एवढ्यासाठीं आपणाला नागभवनांत जाण्याची मुळींच गरज नाहीं. तो सुंदर तरुण राजकुमार आपल्या जवळ येत असतो तोंच नागांचा राजा होय. त्याला विचारिलें असतां यातील वर्म काय आहे तें तो आपणास सांगेल.'' तापसी म्हणाला ''पण माझ्या भक्ताचें वर्म समजावून घेऊन तें त्याच्या शत्रूला- जरी तो माझा भक्त असला तरी त्याला- कळविणें योग्य आहे काय ?'' गरुड म्हणाला ''हें जर काम सामान्य मनुष्याच असतें तर तें करण्यापासून लाभ कोणताच नव्हता. हानि झाली असती आणि आपण निंदेलाहि पात्र झाला असतां. परंतु गरुडाचें प्रेम संपादन करण्यांत नागाची इतराजी झाली तर त्यापासून आपलें कांहींच नुकसान होणार नाहीं. आणि आपणाला नागापेक्षां आम्ही शतपटीनें मदत करूं शकूं. आपला योगप्रभाव आहे ही गोष्ट आमच्या पराक्रमानें लोकांच्या निदर्शनास आणून देऊं. व तेणेकरून आपलें यश दिगंताला नेऊं.

त्या उदरंभरू साधूला सुपर्ण राजाचें हें म्हणणें पटलें आणि तो म्हणाला, ''नागराजाचें वर्म जाणण्याविषयीं माझ्याकडून होईल तेवढी खटपट करीन.'' दुसर्‍या राजकुमारवेषानें आपल्या भेटीस आलेल्या पंडर नागराजाला तो साधू म्हणाला ''तुम्ही मोठे बलाढ्य नागराजा असतां माझ्यासारख्या यःकश्चित् तपस्व्याच्या दर्शनाला कां येतां ?'' आपण नागराजा आहे हें तपस्व्यानें योगबलानें जाणलें असावें असें वाटून नागराजा म्हणाला, ''आमच्या सारख्यानें बुद्धिबळ आपल्या योगबळापुढें कुचकामाचें आहे. मनुष्यलोकीं जन्मून आपल्यासारखी योगसिद्धी मिळवावी यासाठीं आम्ही प्रार्थना करीत असतो आणि आपल्यासारख्या सत्पुरुषाची सेवा करीत असतो. आम्ही किती बलवान असलों तरी आमची योनि मनुष्य योनीहून हलकीच आहे व अशा हीन जातीपासून मुक्त होणें हें मोठें भाग्य आहे.''

तपस्वी म्हणाला ''तुम्ही म्हणतां ही गोष्ट खरी आहे. तथापि तुमचा पराक्रम ऐकून मी फारच चकित होऊन जातो. गरुड म्हटले म्हणजे नागाचें आणि नाग गरुडाचें खाजें. असें असतां तुम्ही व तुमच्या नागभवनांतील सर्व नाग गरुडांचा पराभव करिता तेव्हां तुमच्या अंगीं आलौकिक सामर्थ्य असलें पाहिजे.'' पंडर नागराज म्हणाला ''ही कांहीं सामर्थ्याची गोष्ट नाहीं. त्यांत एक लहानशी खुबी आहे एवढेंच काय तें.'' तपस्वी म्हणाला ''अशी खुबी तरी कोणती कीं जिच्यायोगें तुम्ही गरुडांचा पराजय करितां.'' नागराजा म्हणाला ''तुम्ही सत्पुरुष आहां व माझे गुरु आहां त्याअर्थी ही गोष्ट तुम्हाला सांगण्यांत कांहीं दोष नाहीं. तथापि माझी आपणास एवढीच विनंती आहे कीं ती षट्कर्णी होऊं देऊं नका. केवळ गरुडाच्या मूर्खपणामुळें आम्हाला त्यांचा पराजय करितां येतो. गरुड जवळ आले कीं, आम्ही मोठमोठाले पाषाण गिळून जड होऊन व फणा वर करून बसतो. ते फणेला धरून आम्हाला उचलूं पहातात. परंतु आमचें वजन फार झाल्यामुळें अत्यंत क्लांत होऊन खालीं पडतात आणि आमच्या हातीं सांपडतात. पण फणेला न धरितां त्यांनीं जरी आमच्या पुच्छाला धरून आम्हास वर उचललें तर आमच्या पोटांतील पाषाण आपोआप खालीं पडून आमचें वजन हलकें होईल व आम्हाला त्यांना वाटेल तिकडे उचलून नेतां येईल.''

तपस्वी म्हणाला, ''वाहवा नागराज ! वाहवा ! आपल्यासारखा बुद्धिमान् नेता असल्यावर नागांचा विजय व्हावा ही मोठी आश्चर्याची गोष्ट नाहीं. तदनंतर नागराजा तपस्व्याला वंदन करून त्याचा निरोप घेऊन नागभवनाला गेला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel