१३१. खरें मंगल.

(महामंगलजातक नं. ४५३)


एकदां बोधिसत्त्व रक्षित नांवाचा प्रसिद्ध तपस्वी होऊन मोठ्या शिष्यसमुदायासह हिमालयावरील एका आश्रमांत रहात असे. कांहीं काळानें पावसाळा संपल्यानंतर त्याचे शिष्य त्याला म्हणाले, ''गुरुजी, पुष्कळ वर्षे आम्ही या अरण्यांत वास करून आहों. आतां आमच्या आरोग्यासाठीं आंबट आणि खारट पदार्थ सेवन करण्यास्तव आम्ही मध्यदेशांत जाऊं.''

रक्षित म्हणाला, ''माझी येथून जाण्याची इच्छा नाही. डोंगराचे कडे चढण्याची आणि दूरचा रस्ता आक्रमून जाण्याची मला ताकद राहिली नाहीं. तेव्हां तुम्हीच मध्यदेशांत जाऊन प्रवास करून या.'' ते गुरूची आज्ञा घेऊन फिरत फिरत वाराणसीला आले. तेथे राजानें त्यांचा चांगला आदर-सत्कार करून त्यांना आपल्या उद्यानांत ठेऊन घेतलें.

एके दिवशीं वाराणसींतील संथागारांत मंगलासंबंधानें प्रश्न निघाला. कोणीं लग्नकार्याच्या आरंभी वाद्य वाजविणें मंगलकारक आहे असें म्हणाले. कोणाचें मत असें पडलें कीं, अमुक अमुक मंत्र म्हणणें हें त्या त्या प्रसंगीं मंगलकारक होय. दुसरे कोणी आप्‍त मित्र इत्यादिकांपासून आपणाला सुख व्हावयाचें असलें तर अमुक अमुक मंत्राचा अशा अशा प्रकारें जप करावा म्हणजे कार्यसिद्धि होते असें म्हणाले. पण त्यांपैकीं कोणाचेंहि मत सर्वसंमत झालें नाहीं. शेवटीं आपण सर्वजन राजाला विचारूं व तो ज्या गोष्टी मंगलकारक आहेत असें सांगेल त्यांचा स्वीकार करूं असा त्या सर्वांनीं ठराव केला.

परंतु राजानें त्यांस असें सांगितलें कीं, या गोष्टींत माझी चांगली गति नाहीं. धर्मप्रतिपादन करणें हें ॠषींचें काम होय. तेव्हां तुम्हीं जाऊन माझ्या उद्यानांत रहात असणार्‍या तपस्व्यांना हा प्रश्न विचारा आणि ते सांगतील त्याप्रमाणें वागा. परंतु ॠषी देखील त्यांची शंका दूर करूं शकले नाहींत. राजाला बोलावून आणून ते म्हणाले, ''महाराज, लोकांमध्यें विवाहकार्यादिकाच्या प्रसंगीं मंगलकृत्यें करण्याचा व मंगलस्तोत्रें म्हणण्याचा परिपाठ आहे, परंतु यांपैकीं कोणतीं चांगली व कोणतीं वाईट हें आम्ही सांगूं शकत नाहीं. आमचे आचारवर्य हिमालयावर रहात असतात. तेच या प्रश्नाचें उत्तर देऊं शकतील.''

राजा म्हणाला, ''भदंत, हिमालय फार दूर पडला आणि तेथें जाण्याचा मार्गहि बिकट. मला येथें अनेक कामें असल्यामुळें तेथें जातां येत नाहीं. तेव्हां मेहेरबानगी करून आपणच जाऊन आचार्याला हा प्रश्न विचारा व तो जीं मंगलें योग्य आहेत असें सांगेल तीं मुखोद्‍गत करून येथें येऊन आम्हांला पढवा.''

तपस्व्यांनीं राजाचें म्हणणें पसंत केलें व प्रवास करीत पुनरपि ते आपल्या आश्रमांत आले. रक्षिताचार्याचें दर्शन घेऊन घडलेलें इत्थंभूत वर्तमान त्यांनी त्याला निवेदन केलें.

तेव्हां रक्षित तपस्वी म्हणाले, ''बाबांनों, मध्यप्रदेशांत लोक जीं मंगलें करीत आहेत तीं खरीं मंगलें नव्हेत. विवाहसमयीं सर्वच लोक स्तोत्रें म्हणतात आणि कर्दळी, पर्णघट इत्यादिकांची स्थापना करून मंगलविधी करतात. परंतु त्यामुळें सर्व विवाहकार्ये सुखप्रद होतात काय ? कित्येक विवाहानंतर अल्पावधींतच विधवा होतात. कित्येकांला नवर्‍याकडून आणि सासूसासर्‍यांकडून जाच होतो. तर कित्येक अल्पवयांतच भयंकर रोगानें पछाडिल्या जाऊन मृत्युमुखांत पडतात. अशाच तर्‍हेचीं इतर मंगलेंहि होत. त्यांचें सर्वदैव फळ येतेंच असें नाहीं. मनुष्याच्या कर्माप्रमाणें सर्व गोष्टी घडून येतात. म्हणून मनुष्यानें आपलीं कर्मे पवित्र ठेविण्यासाठीं सर्वकाळ झटाव. पवित्र आचरणासारखें श्रेष्ठ मंगल नाहीं. तथापि कांहीं ठळक मंगलें मी तुम्हांला सांगतों. तीं शिकून वाराणसीच्या राजाला पढवा --

''देव, पितर, सर्प, चतुष्पाद, द्विपाद वगैरे सर्व प्राण्यांवर जो मैत्रीची भावना करितो तो प्राणिमात्रापासून भय पावत नाहीं. आणि म्हणूनच मैत्रीची भावना हें प्राण्यांपासून सुखप्राप्ति होण्यासाठीं मंगलाचरण होय.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel