७८. पतिव्रता स्त्रीचें तेज.
(मणिचोरजातक नं. १९४)
बोधिसत्त्व काशीराष्ट्रांतील वाराणसी नगराच्या जवळ एका गांवीं जन्मला होता. तो वयांत आल्यावर वाराणसींतील एका अत्यंत सुस्वरूप स्त्रीबरोबर त्याचें लग्न झालें. तिचें नांव सुजाता असें होतें. सुजाता आपल्या पतीच्या आणि सासूसासर्यांच्या सेवेत फार दक्ष असे. तिचा उद्योगी आणि मायाळू स्वभाव पाहून बोधिसत्त्व तिच्यावर जीवापाड प्रेम करीत असे. कांहीं वर्षे सासुरवास केल्यावर सुजातेला आपल्या आईबापांस भेटण्याची इच्छा झाली. ती बोधिसत्त्वाला म्हणाली, ''स्वामी, मला माझ्या आईबापांस आणि नातलगांस पहावें असें वाटतें. आपण जर माझ्याबरोबर याल तर कांहीं दिवस माझ्या वडिलांच्या घरीं राहून परत येऊं.''
शेताभाताचें विशेष काम नव्हतें तेव्हां बोधिसत्त्वानें सुजातेला घेऊन चार दिवसांसाठीं सासरीं जाऊन रहाण्याचा बेत केला. त्याच्या घरीं बैलाचा एक टांगा होता. त्यांत सुजातेला बसवून तो वाराणसीच्या नगरद्वारापाशीं आला. तेथें स्नान वगैरे करून त्यानें आणि सुजातेनें जेवण केलें, आणि कपडे बदलून शहरांत प्रवेश केला. त्याच वेळीं वाराणसीला ब्रह्मदत्त राजाची स्वारी नगर प्रदक्षिणेला निघाली होती. राजाला मान देण्यासाठी सुजाता यानांतून खालीं उतरून पायीं चालू लागली. तिला पाहून राजा अत्यंत मोहित झाला आणि तिच्यासंबंधानें चौकशीं करण्यास त्यानें आपले दूत पाठविले. त्या कालीं कोणत्याहि राजाला विवाहित स्त्रीला तिचा पति जिवंत असेपर्यंत जनानखान्यांत नेण्याचा अधिकार नव्हता. राजानें जर या नियमाविरुद्ध वर्तन केलें असतें तर त्याचा ताबडतोब वध करण्यांत आला असता. राजदूतांनीं ती स्त्री विवाहित आहे आणि बैलाचा टांगा हांकणारा तिचा पति आहे, हें वर्तमान जेव्हां राजाला कळविलें तेव्हां तिला कसें स्वाधीन करून घेतां येईल अशा विवंचनेंत तो पडला. तेवहां त्याला अशी युक्ती सुचली कीं, कोणत्याहि निमित्तानें तिच्या नवर्याला फाशीं द्यावें आणि मग तिला अंतःपुरांत आणून ठेवावें. आपल्या एका जिव्हाळ्याच्या हुजर्याला बोलावून आणून तो म्हणाला, ''तूं हा माझा चूडामणि नेऊन त्या माणसाच्या टांग्यांत दडवून ठेव.''
त्या हुजर्यानें धन्याची आज्ञा ताबडतोब अमलांत आणली. तेव्हां राजानें आपला चूडामणि हरवल्याचें मिष करून सगळीं नाकीं बंद करण्याचा हुकूम केला; आणि रस्त्यांतून जाणार्या येणार्या लोकांची झडती घेण्यास लावली. नंतर एका हुजर्याला पाठवून बोधिसत्त्वाच्या टांग्याचीहि झडती घेण्यांत आली. तेथें चूडामणि सांपडल्यामुळें बोधिसत्त्वाला पकडून राजासमोर उभें करण्यांत आलें. राजानें याचा याचक्षणीं वध करा, असा हुकूम फर्माविला. मारेकरी बोधिसत्त्वाला घेऊन वधस्थानीं जाऊं लागले. तेव्हां सुजातेनें अत्यंत आक्रोश केला. ती म्हणाली, ''या पृथ्वीतलावर सत्याचें रक्षण करणार्या कोणी देवता राहिल्या नसाव्या. नाहींतर हा धडधडीत अन्याय घडत असतां, त्यांनीं मौन व्रत धरलें नसतें. आम्हीं इंद्रादिकाच्या सत्याचरणाच्या पुष्कळ गोष्टी ऐकत आलों आहों; परंतु एकतर या गोष्टींत मुळींच तथ्य नसावें अथवा अशा देवताच नष्टप्राय झाल्या असाव्या.''
तिच्या नानातर्हेनें चाललेल्या विलापानें आणि पतिव्रत्याच्या तेजानें इंद्राचें सिंहासन गरम झालें. इंद्राला याचें कारण काय हें एकाएकी समजलें नाहीं. परंतु विचाराअंतीं सुजाता संकटांत पडली असून तिच्या पतिव्रत्याचा भंग होऊं पहात आहे की गोष्ट त्याला समजून आली, आणि तो एकदम त्या ठिकाणीं आला. त्यावेळीं मारेकर्यांनीं बोधिसत्त्वाला लाकडाच्या ओंडक्यावर शिर ठेऊन उताणें पाडलें आणि त्यावर कुर्हाडीचा प्रहार करण्याच्या बेतांत ते होते. इतक्यांत इंद्रानें राजाला राजवाड्यांतून उचलून आणून त्याचे हातपाय बांधून त्या ठिकाणीं उताणें पाडलें, आणि बोधिसत्त्वाला राजवेष देऊन राजवाड्यांत नेऊन ठेविलें. ही अदलाबदल इतक्या त्वरेनें आणि अदृश्यपणें करण्यांत आली कीं, मारेकर्यानीं कुर्हाडीच्या घावानें धडावेगळें शिर केल्यावर तें राजाचें आहे असें त्यांस दिसून आलें. त्यांनीं एकच बोभाटा केला; तेव्हां नगरवासी लोकांचा तेथें मोठा जमाव जमला आणि पहातात तों खुद्द ब्रह्मदत्त राजाचेच दोन तुकडे झालेले त्यांना दिसले ! पुढें ते सर्व लोक शहरांत गेले, आणि त्यांनीं हे वर्तमान अमात्य वगैरे बड्या अधिकारी लोकांना कळविलें. तेव्हां ते लोक राजांगणांत जमून आतां पुढें कोणाला राज्यपद द्यावें याचा खल करूं लागले. तें पाहून बोधिसत्त्वाला हातीं धरून इंद्र राजवाड्याच्या खिडकीच्या बाहेरील गच्चीवर आला, आणि त्या जमलेल्या बड्या अधिकार्यांस म्हणाला, ''लोकहो, मी इंद्र आहे; आणि माझ्या प्रभावानेंच तुमच्या अधार्मिक राजाचा वध झाला आहे. आतां हा मी तुम्हांला नवीन राजा देत आहें. हा आणि याची पत्नी सुजाता हीं दोघें अत्यंत सुशील आहेत. यांची तुम्ही आपल्या आईबापांप्रमाणें शुश्रूषा करा; आणि त्याचप्रमाणें हीं दोघें आपल्या मुलांप्रमाणें सर्व प्रजेचें पालन करतील. पतिव्रता स्त्रियांना कोणत्याहि मनुष्याकडून ताप झाला-मग तो राजा असो वा साधारण मनुष्य असो-तर त्याचे घडे भरलेच असें समजा. पृथ्वीवरील राजाच्या शिरावर देवता आहेत हें त्यांनीं विसरतां कामा नये. आणि जर दुर्मदानें देवतांची पर्वा न करितां ते लोकांना त्रास देऊं लागले, तर मी स्वतः आपल्या हातानें त्यांची खोड मोडल्यावांचून रहाणार नाहीं.''
असें भाषण करून इंद्र तेथेंच अंतर्धान पावला. अधिकारी लोकांनीं मोठ्या समारंभानें वधस्थानातून सुजातेला राजवाड्यांत आणलें आणि सुमुहूर्तावर तिला आणि बोधिसत्त्वाला राज्यपद देऊन शहरांत मोठा उत्सव केला. आपला अधार्मिक राजा नाश पावला आणि त्याबरोबरच धार्मिक राजाचा लाभ झाला, हें पाहून सर्व प्रजा संतुष्ट झाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.