१११. राजपुत्राची युक्ति.

(ब्रह्माच्छत्त जातक नं. ३३६)

एकदां वाराणसीच्या राजानें कोसल देशाच्या राजावर स्वारी करून त्याला रणांगणांत ठार मारिलें, आणि त्याचें सर्व वित्त हरण करून तें वाराणसीला आणून तें मोठमोठ्या भांड्यांत भरून आपल्या बागेंत ठेविलें. या लढाईच्या धामधुमींत कोसल राजाचा तरुण कुमार अज्ञातक वेषानें आपल्या राजधानींतून तक्षशिलेला पळून गेला. तेथें त्यानें एका प्रसिद्ध आचार्यापाशीं वेदशास्त्रांचें अध्ययन केलें. सर्व विद्यांत प्रवीण झाल्यावर गुरूची आज्ञा घेऊन तो स्वदेशी येण्यास निघाला. परंतु वाटेंत त्यास कांहीं परिव्राजक भेटले. त्या लोकांपाशीं कांहीं शिल्पकला असली तर तीहि शिकावी या उद्देशानें तो त्यांच्या पंथांत शिरला आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पांचशें परिव्राजकाचा गुरू होऊन बसला. नंतर तो आपल्या शिष्यांना म्हणाला, ''आपण वाराणसीकडे जाऊन जनपदसंचार करूं.''

परंतु ते म्हणालो, ''वाराणसींतील लोक मोठे हुषार आहेत. ते नाना प्रश्न विचारून आमची फजिती करतील.''

राजकुमार म्हणाला, ''त्याबद्दल तुम्ही भिऊं नका. तुमचा पुढारी ह्या नात्यानें सर्व प्रश्नांची उत्तरें मीच देत जाईन.''

असें सांगून आपल्या परिवारासह फिरत-फिरत अनुक्रमें तो वाराणसीला येऊन पोहोंचला. तेथें या तरुण परिव्राजकाची सर्व लोकांत कीर्ति पसरण्यास विलंब लागला नाहीं. हळूहळू राजाच्या कानापर्यंत त्याची तारीफ पोहोंचली. तेव्हां राजानें त्याला आपल्या राजवाड्यांत बोलावून नेऊन त्याचा बहुमान केला. पुढें राजाची आणि त्याची विशेष मैत्री जडली. तेव्हां राजाचे सर्व गुणावगुण त्याला चांगले समजले. राजा जरा धनलोभी होता. त्यानें या तरुण परिव्राजकाला मंत्रतंत्राच्या साह्यानें धन उत्पादन करितां येईल कीं काय असा एकांतीं प्रश्न केला. तेव्हां तो राजाला म्हणाला, ''महाराज, नवीन धन उत्पादन करण्याचे सामर्थ्य माझ्या अंगीं नाहीं. तथापि असलेले धन द्विगुणित, चतुर्गुणित करितां येईल अशी मंत्रविद्या मी जाणत आहे.''

त्यावर राजा म्हणाला, ''कोसल राजाकडून मी पुष्कळ धन हिसकावून आणलें आहे, व गुप्‍तपणें तें माझ्या बागांत पुरून ठेविले आहे. तें तुम्ही आपल्या मंत्राच्या सामर्थ्यानें जितकें वाढवितां येईल, तितकें वाढवा; म्हणजे प्रसंग आला असतां त्याचा मला फार उपयोग होईल.''

असें बोलून राजानें त्याला धन पुरून ठेविलेली जागा दाखविली, व त्या ठिकाणीं मंत्रविद्येचा प्रयोग करून धन वाढविण्याची विनंती केली. तेव्हां त्या परिव्राजकानें आपल्या पांचशे शिष्यांसह येऊन त्या ठिकाणी ठाणें दिलें, आणि एका मोठ्या हवनास सुरुवात केली. राजाला होमहवनादी प्रकार पाहून फार आनंद झाला आणि लवकरच आपण अफाट संपत्तीचा मालक होईन असें तो मनांतल्या मनांत मांडे खाऊं लागला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel