जातककथासंग्रह

१. हातचें सोडून पळत्याच्या पाठीमागें लागू नये
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(* अपण्णक जातक नं.१)
* हीच कथा थोड्या भिन्न प्रकारानें दीघनिकायांतील पायासिसुत्तांत सांपडते.

+ दक्षिणहैदराबादच्या राजघराण्यांतील पुरुषांना निजाम म्हणण्याची वहिवाट आहे, त्याप्रमाणें प्राचीन काळीं वाराणसीच्या बहुतेक राजांना ब्रह्मदत्त म्हणत असत असें टीकाकारांचें म्हणणें आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
प्राचीन काळीं वाराणसीनगरांत ब्रह्मदत्त +नांवाचा राजा राज्य करीत होता. त्या वेळीं आमचा बोधिसत्त्व एका मोठ्या सावकाराच्या कुळांत जन्माला येऊन वयांत आल्यावर पांचशें गाड्या बरोबर घेऊन परदेशी व्यापाराला जात असे. तो कधी पूर्वदिवशेला जाई, आणि कधी कधीं पश्चिम दिशेला जाई.

एका वर्षी पावसाळा संपल्यावर आमच्या बोधिसत्त्वानें परदेशी जाण्याची सर्व सिद्धता केली. त्याच वेळीं दुसरा एक व्यापारी आपल्या पांचशे गाड्या घेऊन त्याच रस्त्यानें जाण्यास तयार झाला होता. त्याला बोधिसत्त्व म्हणाला, ''मित्रा, आम्ही दोघे जर एकदम एकाच मार्गानें गेलों, तर आमच्या बैलांना वैरण मिळण्यास अडचण पडेल. आमच्या माणसांनाहि शाकभाजी बरोबर मिळणार नाहीं तेव्हां आमच्यापैकीं एकानें पुढें जावें, व दुसर्‍यानें आठ पंधरा दिवसांनी मागाहून जावें हें बर.''

तो दुसरा व्यापारी म्हणाला, ''मित्रा, असें जर आहे, तर मीच पुढें जातों. कां कीं माझी सर्व सिद्धता झाली आहे. आतां येथें वाट पहात बसणें मला योग्य वाटत नाहीं.''

बोधिसत्त्वालाप ही गोष्ट पसंत पडली. त्या व्यापार्‍यानें पुढें जावें व बोधिसत्त्वानें पंधरा दिवसांनी त्याच्या मागाहून जावें असा बेत ठरला. तेव्हां तो व्यापारी आपल्या नोकरांस म्हणाला, ''गडे हो, आजच्या आज आम्हीं प्रवासाला निघूं. पुढें जाण्यामुळें आम्हाला पुष्कळ फायदा होणार आहे. आमच्या बैलांना चारापाणी यथेच्छ मिळेल, व आमच्या मालाला दामदुप्पट किंमत येईल.''

पण बोधिसत्त्वाच्या अनुयायांना हा बेत आवडला नाहीं. ते आपल्या मालकाला म्हणाले, ''तुम्ही हें भलतेंच काय केलें ! आमची सर्व तयारी आगाऊ झाली असतां तुम्ही त्या गृहस्थाला पुढें जाण्यास अनुमति दिली हें काय ? आम्हीं जर त्याला न कळवितां मुकाट्यानें पुढें गेलों असतों तर आमच्या मालाचा चांगला खप होऊन आपल्या पदरांत पुष्कळ नफा पडला असता.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel