७. जिभेचें बंधन.

(वातमिग जातक नं. १४)

आमचा बोधिसत्त्व एकदां वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि बापाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला. त्याचा संजय नांवाचा एक हुषार माळी (उद्यानपाल) होता. एके दिवशीं राजा त्याला म्हणाला, ''संजया, तुझ्या उद्यानामध्यें एकादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवूं शकशील काय ?''

''जर मला लागेल तेवढा मध देण्याचा हुकूम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसांत एक अपूर्व आश्चर्य दाखवीन.''

राजानें आपल्या कोठारांतून संजयाला लागेल तेवढा मध देण्याची आज्ञा केली.

त्या उद्यानामध्यें रोज एक वातमृग येत असे; पण--वातमृगच तो--संजयाचें वारें पडल्याबरोबर बाणासारखा पळत सुटे. संजयानें राजाच्या कोठारांतून मध आणून तो उद्यानांतील गवताला सारविला. हळूंहळूं वातमृगाला त्या गवताची इतकी गोडी लागली कीं, तो संजयाच्या जवळ जाऊन देखील तें गवत खाऊं लागला. कांहीं दिवस लोटल्यावर संजय राजाला म्हणाला, ''महाराज, आज तुम्हाला मी उद्यानांतील आश्चर्य दाखविणार आहें. दुपारीं तें पहाण्यासाठीं आपण राजवाड्यांतच रहावें.''

नंतर संजय उद्यानांत गेला; आणि वातमृग तेथें आल्यावर त्यानें त्यासमोर मध फांसलेले गवत टाकिलें. ते खाल्यावर राजवाड्याच्या बाजूला कांहीं अंतरावर आणखी गवत टाकिलें. याप्रमाणें हळुहळू त्या मृगाला संजयानें राजवाड्यांत आणून बाहेरचा दरवाजा बंद केला व तो राजाला म्हणाला, ''महाराज, वातमृग मनुष्याच्या छायेलादेखील उभा रहात नाहीं, हें आपण जाणतच आहां. असें असतां त्याला मी येथपर्यंत आणून सोडलें हें अपूर्व आश्चर्य नव्हे काय ?''

राजा म्हणाला, ''वातमृग मनुष्याच्या वार्‍याला उभा रहात नाहीं ही गोष्ट खरी आहे. परंतु रसतृष्णा मोठी बळकट आहे. आपल्या जिभेला जर हा वातमृग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यांत कधींहि आला नसता. पण जिभेच्या मागें लागल्यामुळें तूं नेशील तिकडे त्याला जाणें भाग पडलें ! जिभेचें बंधन बळकट खरें !!''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel