४०. नांवाची फारशी किंमत नाहीं.

(नामसिद्धि जातक नं. ९७)

एका जन्मीं आमचा बोधिसत्त्व तक्षशिला नगरींत प्रसिद्ध आचार्य होऊन पांचशें शिष्यांना वेद पढवीत असे. त्यांतील एकाचें नांव पापक असें होतें. ''कायरे पाप्या, इकडे येरे पाप्या'' असें लोक त्याला म्हणत असत. त्यामुळें कंटाळून जाऊन तो आपल्या गुरूला म्हणजे बोधिसत्त्वाला म्हणाला, ''गुरुजी, माझें नांव मला अमंगल वाटतें. दुसरें एखादें मला चांगलेसें नांव द्या.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''येथल्या येथेंच चांगलें नांव घेण्यापेक्षां देशपर्यटन करून एखादें चांगलें नांव पाहून ये, व मला सांग, म्हणजे आम्ही सर्वजण त्याच नांवानें तुला हांक मारीत जाऊं.''

दुसर्‍या दिवशीं पापकानें शिदोरी सज्ज करून दुसर्‍या गांवचा रस्ता धरला. व ज्याच्या त्याच्या नांवाचा अर्थ पहात जाऊं लागला. वाटेंत एका शहराजवह आला असतां कांहीं लोक प्रेत घेऊन स्मशानयात्रेला चालले होते. तेव्हां पापक म्हणाला, ''कायहो इतकी मंडळी कोणीकडे चालली ?''

ते लोक म्हणाले, ''जीवक नांवाचा आमचा एक दोस्त नुकताच मरण पावला. त्याच्या अंत्यविधीला आम्हीं जात आहों.'' ''पण कायहो ! जीवक मरतो हें कसे ?''

''जीवक असो अथवा अजीवक असो, मनुष्य म्हटला कीं तो मरावयाचाच. नांवानें मरण चुकतें असें नाहीं. व्यवहारापुरताच काय तो नांवाचा उपयोग. तूं अगदींच खुळा दिसतोस !'' असें त्यांनीं उत्तर दिलें.

बिचारा पापक चांगल्या नांवाचा हा विपर्यास पाहून विस्मित होऊन गेला, व तसाच पुढें जातो तों एका दासीला वेळेवर काम करीत नाहीं, म्हणून तिचे मालक रस्त्यावर चाबकानें मारीत होते. तो त्याला म्हणाला, ''या बाईचें नांव काय, व हिला तुम्ही कां मारितां ?''

ते म्हणाले, ''इचें नांव धनपाली व वेळेवर काम करीत नसल्यामुळें हिला आम्हीं दंड करीत आहों.''

''अहो पण धनपालीवर दुसर्‍याचें काम करण्याचा प्रसंग यावा कसा ?''

''अहो तुम्ही हें मूर्खासारखें काय विचारितां ? ही जन्माचीच दासी आहे. धनपाली असें नांव ठेविलें म्हणून काय झालें ? धनपाली असूं द्या किंवा अधनपाली असूं द्या. दारिद्रय यावयाचें असलें तर तें आल्यावांचून रहात नाहीं. नांवानें कोणताच कार्यभाग व्हावयाचा नाहीं, तें केवळ व्यवहारापुरतें आहे ही गोष्ट तुम्हाला माहीत नसावी, हें मोठें आश्चर्य आहे.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel