कृष्णद्वैपायन ॠषी म्हणाला, ''या नगराच्या आसान्नप्रदेशांत गर्दभवेषधारी एक यक्ष रहात आहे. नगरावर हल्ला करण्यासाठीं परचक्र आल्याबरोबर तो मोठमोठ्यानें ओरडत असतो. त्यामुळें इतर यक्षांना सूचना मिळून ते नगर उचलून समुद्रामध्यें एका बेटावर नेऊन ठेवितात. तेव्हां प्रथमतः या गाढवाला गाठून त्याची प्रार्थना करा. तोच तुम्हाला नगरप्राप्तीचा मार्ग दाखवून देईल.''

ॠषीच्या आज्ञेप्रमाणें त्या गर्दभाची पुष्कळ विनवणी केली. परंतु तो म्हणाला, ''तुम्ही जवळ आल्याबरोबर मोठ्यानें ओरडणें हा माझा धर्म आहे. त्यापासून विन्मुख होणें शक्य नाहीं. पण दुसर्‍या एका युक्तीनें तुम्हांला ही नगरी हस्तगत करून घेतां येईल. मोठा सैन्यभार बरोबर न आणतां तुम्ही कांहीं माणसें घेऊन या, व या नगरीच्या चारी द्वारांवर चार लोहस्तंभ गाडून त्यांला लोखंडी साखळीनें चार भक्कम नांगर बांधून टाका. ज्यावेळीं नगर उडावयास लागेल त्यावेळीं हे नांगर दाबून धरिले म्हणजे नगर स्थिर राहील, व तें उचलून नेणार्‍या यक्षांचे श्रम व्यर्थ जातील.''

या गर्दभवेषधारी यक्षाच्या उपदेशाप्रमाणें वागून त्या दहा बंधूंनीं द्वारवती हस्तगत केली आणि तेथील राजास ठार मारून सर्व राज्य आपल्या कबजांत घेतलें. तेथेंच त्यांनीं आपली राजधानी स्थापिली आणि सर्व राज्याचे दहा विभाग करून ते सुखानें कालक्रमण करूं लागले. परंतु त्यांची वडील बहीण अंजनादेवी इची त्यांना आठवण झाली नाहीं. पुढें ती जेव्हां त्यांच्या भेटीला आली तेव्हां तिलाहि एक भाग द्यावा असें ठरलें. परंतु अंकूर म्हणाला, ''आपण काबीज केलेल्या राष्ट्रांचे दहाच्या ऐवजीं अकरा भाग करणें इष्ट नाहीं. मी माझा भाग अंजनादेवीला देतों आणि माझा निर्वाह व्यापारावर चालवितो. मात्र तुमच्या राज्यांत माझ्या मालावर जकात बसवूं नका. ही गोष्ट सर्वांना पसंत पडून अंकुराचा राज्यभाग अंजनादेवीला मिळाला व त्यानें द्वारवतींच मोठी पेढी स्थापन करून व्यापार चालविला.

याप्रमाणें वासुदेवादिक नव बंधू व दहावी अंजनादेवी द्वारवती नगरींत राज्य करीत असतां एके दिवशीं वासुदेवाचा एक प्रिय पुत्र एकाएकीं मरण पावला. त्या शोकानें वासुदेवानें बिछाना धरिला. खाणें पिणें देखील वर्ज केलें. व राज्यव्यवस्थेचा विचार तर दूरच राहिला. ही त्याची अवस्था पाहून बलदेवादिक बंधू फार चिंताग्रस्त झाले. परंतु घृतपंडित त्या सर्वांत हुषार आणि सूज्ञ होता. त्यानें वासुदेवाचा शोक नष्ट करण्याची एक नवी युक्ति शोधून काढिली.

स्वतः वेड्याचें सोंग पांघरून 'ससा ससा' असें तो ओरडत सुटला. तेव्हां दुसर्‍या एका बंधूनें जाऊन हें वृत्त वासुदेवाला कळविलें. त्या बिचार्‍याचा पुत्रशोक तात्काळ निवला आणि त्याच्या जागीं हा नवा बंधुशोक उद्भवला. तो तसाच घृतपंडिताजवळ जाऊन त्याला म्हणाला, ''बाबारे, 'ससा ससा' असें ओरडत कां फिरतोस ? तुझा ससा कोणी नेला ? तुला सोन्याचा, रुप्याचा किंवा जवाहिर्‍याचा अथवा अरण्यांतील सशांपैकीं कोणत्याहि प्रकारचा ससा पाहिजे असेल तर मी ताबडतोब आणून देतों. परंतु हें वेड सोडून दे आणि शुद्धीवर ये.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel