बोधिसत्त्वाच्या म्हणण्याप्रमाणें वागण्याचें त्या सर्वांनी कबूल केलें. बोधिसत्त्व अत्यंत व्यवहारनिपुण असल्यामुळें आपल्या हिताहिताचें ज्ञान त्याला विशेष आहे, असें जाणून त्यांनी आपला भरिभार त्यावर सोंपविला.

त्या मुख्य सार्थवाहाला आणि त्याच्या अनुयायांना दुर्बळ करून मारून खाल्ल्यापासून यक्षांना मनुष्यमांसाची विशेष गोडी लागली होती. पूर्वीप्रमाणें त्यांनी आपलें स्वरूप पालटून ते बोधिसत्त्वाच्या लोकांपुढें आले; आणि जवळ पाण्याचा तलाव आहे इत्यादि वर्तमान त्यांनी सांगितलें. बोधिसत्त्व सर्वांच्या मागल्या गाडीवर बसून चालला होता. पुढें चाललेले त्याचे नोकर धांवत धांवत येऊन त्याला म्हणाले, ''धनीसाहेब, आतांच हा एक व्यापारी दुसर्‍या बाजूनें आपल्या नोकरचाकरांसह येत आहे. त्या सर्व लोकांच्या गळ्यांत कमलांच्या माळा आहेत. आणि त्यांच्या गाड्यांची चाकें चिखलानें भरलेलीं आहेत. ते सांगतात कीं, पलीकडे जें हिरवेंगार अरण्य दिसतें तेथे एक तलाव आहे व त्या भागांत बारमाही पाऊस पडत असतो, तेव्हां आम्हीं ही पाण्याची भांडीं वाहून नेण्यापेक्षां येथेंच टाकून दिल्यास आमच्या बैलांचे ओझें कमी होईल, व त्या तलावाजवळ आम्हीं लवकरच पोहचूं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''गडे हो, तुम्ही माझ्या हुकुमाबाहेर चालूं नका. पाण्याचा थेंब देखील फुकट खर्च होऊं देऊं नका. आतां जवळ पाऊस पडत आहे असें तुम्ही म्हणतां, पण पावसाची हवा एकाच्या तरी अंगाला लागली आहे काय ? किंवा आकाशामध्यें एक तरी ढग दिसत आहे काय ?''

ते म्हणाले, ''आम्हाला ढग दिसत नाहीं; विजेचा कडकडाट ऐकुं येत नाहीं; किंवा आम्हाला थंड हवाहि लागत नाहीं. परंतु ज्या अर्थी तो सभ्य गृहस्थ आणि त्याचे इतके नोकरचाकर मोठा तलाव असल्याचें सांगत आहेत, एवढेंच नव्हे, तर त्यांपैकी पुष्कळांच्या गळ्यांत कमलांच्या माळा आहेत, त्या अर्थी त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास हरकत नाहीं.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''पण विश्वास ठेवण्याची एवढी घाई कां करा ? आणखी एका योजनाच्या अंतरावर तलाव आहे असें जर तो गृहस्थ सांगत आहे, तर आपण तेथें जाऊन हें पाणी फेंकून देऊं, व पुढें जरूर वाटल्यास त्या तलावाचें पाणी भांड्यांत भरून घेऊं. आजचा दिवस बैलांना थोडा त्रास पडला तरी हरकत नाहीं.''

बोधिसत्त्वाच्या हुकुमाप्रमाणें त्याच्या लोकांनी पाणी बाहेर टाकिलें नाहीं. त्या सभ्यपुरुषवेषधारी यक्षानें पुष्कळ आग्रह केला; परंतु त्या लोकांची बोधिसत्त्वावरील श्रद्धा ढळली नाहीं. तेथून दुसर्‍या मुक्कामावर गेल्यावर सामानानें लादलेल्या पांचशें गाड्या आणि इतस्ततः पडलेल्या बैलांचे व माणसांचे अस्थिपंजर त्यांना आढळले. तेव्हां बोधिसत्त्व म्हणाला, ''गडे हो, पहा ! हा आमचा मूर्ख सार्थवाह आपल्या लोकांसह नाश पावला ! आपल्या जवळील पाणी नवीन पाणी सांपडल्यावांचून यानें जर फेकून दिलें नसतें तर हा आपल्या लोकांसह यक्षांच्या भक्ष्यस्थानीं पडला नसता. हातचें सोडून पळत्याच्या पाठीं लागणार्‍यांची ही अशीच गत होत असते !''

त्या गाड्यांवरील बहुमोल सामानसुमान आपल्या गाड्यांवर घालून आणि आपल्या गाड्यांवरील अल्पमोल वस्तु तेथेंच टाकून देऊन बोधिसत्त्व आपल्या लोकांसह सुखरूपपणें त्या कांताराच्या पार गेला, व तेथें मोठा फायदा मिळवून पुनः सुरक्षितपणें वाराणसीला आला.

* प्रत्यक्ष आर्य वदती स्थान दुर्जे तार्किकास आवडतें ॥
जाणोनि तत्त्व सुज्ञें सोडूं नये कुशलकर्म जें घडतें ॥१॥
______________________________________________________________________________
* मूळ पाली गाथा अशी आहे --
अपण्णकं ठानमेके दुतियं आहु तक्किका ।
एतदञ्ञाय मेधावी तं गण्हे यदपण्णकं ॥
______________________________________________________________________________
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel