जो सर्वलोकांशीं नम्रपणें वागतो; स्त्री, पुरुष, लहान किंवा मोठा या सर्वांचीं दुर्भाषणें सहन करितो व कधींहि अपशब्द उच्चारीत नाहीं तोच खरा क्षमावान् होय. आणि त्याच्या आचरणाला क्षमामंगल असें म्हणण्यास हरकत नाहीं.

आपल्या ओळखीच्या गृहस्थांना जो समानभावानें वागवितो; विद्येने, धनानें किंवा जातीनें गर्विष्ठ होऊन त्यांचा अपमान करीत नाही आणि त्यांचें कल्याण करण्यास तत्पर असतो अशा मनुष्याला साहाय्यापासून सुख होतें. आणि अशा वर्तनाला शहाणे लोक साहाय्याविषयीं मंगलाचरण असें म्हणतात.

सत्पुरुषच ज्याचे मित्र असतात; त्यांच्यावर याचा पूर्ण विश्वास असून याजविषयीं त्यांचीहि पूज्यबुद्धि असते; जो मित्राचा द्रोह कधींहि करीत नाहीं आणि आपल्या भाग्याचे त्यांनाहि वाटेकरी करतो तोच मित्रांविषयीं मंगलाचरण करतो असें समजलें पाहिजे.

ज्याची भार्या समानवयस्क असून अत्यंत प्रेम करणारी असते व जिची बुद्धि सर्वदैव धार्मिक असते ती कुलीन घराण्यांतील असून शीलवती व पतिव्रता असते. आणि अशा भार्येच्या अनुरोधानें जो प्रपंच करितो त्यालाच गृहस्थाश्रमापासून सुख होतें. तोच गृहिणीमंगलाचें आचरण करितो असें समजलें पाहिजे.

ज्याचा पराक्रम, सदाचरण, सत्यप्रीति इत्यादि सद्गुण राज्यकर्त्याला माहीत असतात व अशा गुणांनी जो राजाचें प्रेम संपादन करितो तो राजापासून सुख होण्यासाठीं मंगलाचरण करितो असें समजलें पाहिजे.

श्रद्धावान् होत्साता जो अन्नपानादिकाचें मोठ्या आनंदानें दान करितो व दुसर्‍यानें दिलेल्या धनाचें अनुमोदन करितो तो परलोकीं सुख मिळविण्यासाठीं मंगलाचरण करितो असें समजलें पाहिजे.

बहुश्रुत, सदाचरणसंपन्न, आर्यधर्मकोविद् अशा ॠषींची जो सेवा करितो व त्यांना प्रसन्न करून घेतो तो ॠषींपासून सुख मिळविण्यासाठीं मंगलाचरण करितो असें समजलें पाहिजे.

शिष्यहो, अशा तर्‍हेच्या मंगलांनीं खरें सुख प्राप्‍त होतें. सत्पुरुष अशाच मंगलांची तारीफ करितात आणि म्हणूनच शहाण्या माणसानें भलत्या सलत्या मंगलाच्या नादीं न लागतां अशींच मंगलें आचरावीं.''

रक्षित तापसाच्या शिष्यांनीं हीं मंगलें पाठ करून वाराणसीला येऊन राजाला शिकविलीं. हें ऐकून राजाला फार आनंद झाला व त्यांनें तीं आपल्या राष्ट्रांत सर्व लोकांना जाहीर केलीं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel