१३७. गुरूचें प्रत्याख्यान.

(अंबजाताक नं. ४७४)


वाराणसीच्या राजाच्या पुरोहिताचें सर्व कुटुंब अहिवातक नांवाच्या रोगानें नाश पावलें. एकटा अल्पवयस्क मुलगा तेवढा घरांतून पळ काढल्यामुळें बचावला. त्यानें तक्षशिलेला जाऊन वेद, वेदांग, शास्त्रें इत्यादिक सर्व ब्राह्मणविद्येंत नैपुण्य संपादन केलें. आपल्या गुरूची आज्ञा घेऊन तो देशाटन करण्यास निघाला व फिरत फिरत एका शहराजवळ धर्मशाळेंत येऊन उतरला. तेथें त्यानें एक मनुष्य कावडींतून आंबे घेऊन शहरांत विकावयासाठीं जात असलेला पाहिला. या ॠतूंत आंबें असणें शक्य नाहीं असें असतां या मनुष्यानें ते कोठून आणले असावे याबद्दल त्याला फार विस्मय वाटला. पण त्या मनुष्याला कांहीं एक कळूं न देतां त्यानें दुसर्‍या दिवसापासून त्याच्यावर पाळत ठेविली. तो मनुष्य दुसर्‍या दिवशीं अरण्यांत गेला तेव्हां त्याच्या मागोमाग हा तरूण ब्राह्मणहि दडत दडत गेला. त्या मनुष्यानें थोडें पाणी हातांत घेऊन व तोंडानें मंत्रोपचार करून तें एका अंब्याच्या झाडावर शिंपडलें. तात्काळ आंब्याला नवीन मोहोर फुटून पाव अर्ध्या घटकेच्या आंत उत्तम परिपक्व आंबे तयार होऊन मेघधारेप्रमाणें आंब्याच्या झाडावरून खालीं पडूं लागले. तेव्हां त्या माणसानें आपली कावड भरून घेतली व तो परत शहरांत आला. तरूण ब्राह्मणहि त्याच्या मागोमाग शहरांत आला. आंबे विकून झाल्यावर तो मनुष्य जवळच्या चांडालग्रामांत आपल्या घरीं गेला. हाहि त्याच्या मागोमाग त्या घरीं गेला. एवढें मंत्रसामर्थ्य असलेला मनुष्य जातीनें चांडाल आहे याबद्दल या तरुणाला वाईट वाटलें. तथापि तो आपल्या मनाशींच म्हणाला, 'चांडाल झाला तरी काय झालें ! अशी अमोलिक विद्या संपादन करण्यास आपला अभिमान आड येतां कामा नयें. अग्नि जरी कोणत्याहि काष्ठापासून उत्पन्न झालेला असला तरी तो वंद्यच आहे.'

हा चांडाल बोधिसत्त्व होता. त्याला जरी एवढा अमोलिक मंत्र अवगत झाला होता तरी त्याचा त्यानें दुरुपयोग केला नाहीं व आपली गरिबी आणि जात सोडली नाहीं. या तरूण ब्राह्मणाला आपल्या दाराशीं उभा असलेंला पाहून तो आपल्या पत्‍नीला म्हणाला, ''हा तरूण मनुष्य मंत्राच्या आशेनें मजपाशीं आला असला पाहिजे. परंतु त्याच्या मुखचर्येवरून तो मंत्र ग्रहण करण्याला समर्थ नाहीं व यदाकदाचित त्याला सर्व मंत्र नीट अवगत झाला तरी तो त्या सामर्थ्याचा दुरुपयोग करून आपली भयंकर हानि करून घेईल असें चिन्ह दिसतें.''

तदनंतर त्या तरुण ब्राह्मणानें बोधिसत्त्वाला आपल्या येण्याचें कारण न सांगता केवळ शुश्रूषेनें गुरूची मर्जी संपादन करून मंत्र शिकावा असा बेत केला व त्या दिवसापासून तो त्या चांडाळाच्या सेवेंत तत्पर राहिला. विशेषतः चांडाळाच्या स्त्रीची त्यानें फार मर्जी संपादन केली. तिच्यासाठीं अरण्यांतून तो लाकडें घेऊन येत असे. स्वयंपाक करीत असे. वस्त्रें प्रावरणें धुऊन आणीत असे. घरांत पाणी भरत असे. याप्रमाणें बराच काल गेल्यावर हा तरूण मनुष्य तेथें येण्यापूर्वी चांडाळ स्त्री गरोदर होती ती पुत्र प्रसवली. आणि त्या मुलाचाहि सांभाळ ह्यालाच करावा लागला. हा तरूण मनुष्य आपली जात बाजूस सारून सर्वप्रकारें सेवा करण्यास तत्पर असतो हें पाहून बोधिसत्त्वाच्या बायकोला त्याची फार दया आली आणि ती बोधिसत्त्वाला म्हणाली, ''याच्या अंगीं मंत्ररक्षणाचें सामर्थ्य असो वा नसो तुम्ही त्याची कींव करून त्याला एकदांचा आपला मंत्र शिकवा.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel