६४. थोराची कृतज्ञता.

(गुणजातक नं. १५०)


एका जन्मीं बोधिसत्त्व सिंह होऊन एका टेकडीवर गुहें रहात असे. त्या गुहेच्या पायथ्याशीं एक तळें होतें. एके दिवशीं एक मृग त्या तळ्याच्या काठीं गवत खात असतांना सिंहानें पाहिला व टेकडीवरून खालीं उतरून मोठ्या वेगानें त्यानें त्या मृगावर झडप घातली. सिंहाची चाहूल ऐकल्याबरोबर मृगानें पळ काढला व त्यामुळें बोधिसत्त्वाची उडी चुकून तो तळ्याच्या कांठच्या चिखलांत रुतला. सात दिवसपर्यंत तो तेथेंच अडकून राहिला. त्या बाजूनें एक कोल्हा पाणी पिण्यासाठीं येत होता. सिंहाला पाहिल्याबरोबर तो पळूं लागला. परंतु सिंह मोठ्यानें ओरडून म्हणाला, ''बा कोल्ह्या, असा घाबरून पळून जाऊं नकोस मी चिखलांत रुतून दुःख भोगीत आहें. जर यांतून पार पडण्याचा कांहीं मार्ग असेल तर शोधून काढ.''

कोल्हा म्हणाला, ''कदाचित् मला कांहीं युक्ती सुचली असती. परंतु तुम्हाला जीवदान देणें म्हणजे माझ्या जिवावरच संकट ओढवून घेण्यासारखें आहे. तेव्हां तुम्ही दुसर्‍या कोणाला तरी मदत करण्याला सांगा. घरीं माझीं बायकामुलें वाट पहात असतील. तेव्हां मला लवकर गेलें पाहिजे.

बोधिसत्त्व म्हणाला, ''बाबारे तुझा मुद्दा खरा आहे. तथापि, तुला मी सर्वथैव मित्राप्रमाणें वागवीन असें अभिवचन देतों. जर तूं मला या संकटांतून पार पाडलेंस तर तुझे उपकार मी कसा विसरेन.''

कोल्ह्यानें त्याच्या चारी पायाजवळचा चिखल उकरून काढला व तळ्याच्या पाण्यापर्यंत वाट करून पाणी त्या भोंकांत शिरेल असें केलें. तळ्याचें पाणी आंत शिरल्याबरोबर बोधिसत्त्वाच्या पायाखालचा चिखल मऊ झाला आणि त्याला अनायासें बाहेर पडतां आलें. त्या दिवसापासून सिंहाची आणि कोल्ह्याची फार मैत्री जडली. कोल्ह्याला दिल्यावाचून सिंह पकडलेल्या शिकारीचें मांस खात नसे. कांहीं दिवसांनीं तो कोल्ह्याला म्हणाला, ''तूं दूर रहात असल्यामुळें तुझी भेट घेण्यास मला त्रास पडतो. जर तूं माझ्या गुहेजवळ येऊन राहशील तर बरें होईल. तुला एखादी सोईस्कर जागा मी देईन.''

कोल्हा म्हणाला, ''पण मी विवाहित आहे, तेव्हां माझ्या बायकोची आणि माझी सोय कशी होईल ?''

सिंह म्हणाला, ''तुम्हां दोघांचीहि व्यवस्था होण्यास अडचण पडणार नाहीं. शिवाय माझी बायको मी शिकारीस गेल्यावर गुहेंत एकटीच असते. तिला तुझ्या बायकोची मदत होईल, आणि आम्हीं सर्वजण मोठ्या गुण्यागोविंदानें राहूं.''

सिंहाच्या सांगण्याप्रमाणें कोल्हा सहकुटुंब येऊन सिंहाच्या शेजारीं एका लहानशा गुहेंत राहिला. सिंह शिकार मारून आणल्यावर प्रथमतः एक वांटा घेऊन कोल्ह्याकडे जात असे, व त्याची आणि त्याच्या बायकोची तृप्ती झाल्यावर मग राहिलेलें मांस आपल्या स्त्रीला देऊन आपण खात असे. कांहीं कालानें कोल्हीला दोन पोरें झालीं व सिंहिणीलाहि दोन पोरें झालीं. तेव्हांपासून सिंहीण कोल्ह्याच्या कुटुंबाचा मत्सर करूं लागली. आपल्या नवर्‍यानें शिकार मारून आणावी व कोल्ह्याच्या कुटुंबानें यथेच्छ मांस खाऊन चैन करावी, हें तिला बिलकूल आवडेना. या शिवाय बायकांचा स्वभाव फार संशयी असतो. त्यामुळें तिला असें वाटलें कीं, कदाचित सिंहाचें प्रेम त्या कोल्हीवर असावें. नाहींतर आपल्या मुलांना मांस देण्यापूर्वी त्यानें तें तिच्या मुलांना दिलें नसतें. कांहीं असो कोल्हीला तेथून हाकलून द्यावें असा त्या सिंहीणीनें बेत केला. व आपल्या पोरांना पाठवून तिच्या पोरांना त्रास देण्यास सुरुवात केली. कोल्ह्याला घेऊन सिंह शिकारीला गेल्याबरोबर इकडे सिंहाचे पोरगे कोल्ह्याच्या पोरांना भय दाखवीत असत. कोल्हीण सिंहिणीजवळ गार्‍हाणें घेऊन येत असे. तेव्हां सिंहीण म्हणत असे कीं, येथें राहिली आहेस कशाला ? माझीं पोरें जर तुझ्या पोरांना त्रास देतात, तर चालती हो येथून त्यांना घेऊन. त्यांच्या कागाळ्या घेऊन आलीस तर तें मला मुळींच खपणार नाहीं.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel