१३४. पापभय.
(पानेयजातक नं. ४५९)
पाच प्रत्येक बुद्ध हिमालयावरील नंदमुलक नांवाच्या दरींत रहात असत. ते भिक्षाटन करीत करीत एके दिवशीं वाराणशीला आले. राजवाड्यावरून जात असतांना त्यांना पाहून राजा फार प्रसन्न झाला व त्यानें मोठ्या सन्मानानें त्यांना राजवाड्यांत नेऊन जेऊं घातलें.
भोजनोत्तर राजानें त्यांना वैराग्य कां झालें असा प्रश्न केला. तेव्हां त्यांतील एकजण म्हणाला, ''महाराज, मी याच राज्यांतील एका गांवी शेतकरी होतों. एके दिवशीं मी व माझे मित्र आपापलीं पाण्यानीं भरलेली भांडी घेऊन गांवापासून दूर अंतरावर असलेल्या आमच्या शेतांत गेलों. तेथें माझें पाणी लवकर संपेल अशा शंकेनें माझ्या मित्राचा डोळा चुकवून त्याच्या भांड्यांतील मी पाणी प्यालों. पण या माझ्या पापकर्माची मला फार लाज वाटली. व अशीं पापें पुनः न घडावीं म्हणून मी संन्यास ग्रहण केला.''
दुसर्या प्रत्येक बुद्धाला आत्मवृत्त निवेदन करण्याची राजानें विनंती केली. तेव्हां तो म्हणाला, ''महाराज, मी व माझा पिता प्रवासाला जात असतां आम्हांस चोरांनीं गाठलें. या चोरांची वहिवाट अशी असे कीं, बापाला आणि मुलाला पकडलें असतां मुलाला ठेवून घेऊन ते बापाला पैसे आणण्यासाठीं पाठवीत असत. दोघा बंधूंना पकडलें असतां कनिष्ठाला ठेवून ज्येष्ठाला पैसे आणण्यासाठीं पाठवीत असत.
आम्ही जेव्हां या चोरांच्या हाती लागलों तेव्हां पितापुत्रांचें नातें कबूल करावयाचें नाहीं असा निश्चय केला. चोरांनीं विचारिल्यावर आम्ही दोघांनीं साफ सांगितलें कीं, आमचा कांहींएक संबंध नाही. या जंगलातच काय ती आमची प्रथमतः गाठ पडली. त्या चोरांनीं आमच्याजवळ असलेलें सामान हिरावून घेऊन आम्हांस सोडून दिलें. परंतु त्या खोटें बोलण्याचा परिणाम माझ्या मनावर इतका झाला कीं, प्रपंचाचा त्याग करून मी मोकळा झालों. हेतू हा कीं, पुनः असलें पाप माझ्या हातून होऊं नये.''
राजाच्या विनंतीवरून तिसरा बोधिसत्त्व म्हणाला, ''एके दिवशीं बाजारांत बसलों असतां माझें चित्त एका परस्त्रीवर गेलें. पुढें या पापाचा मला अत्यंत पश्चात्ताप झाला व अशीं पापें माझ्या मनानें सुद्धा होऊं नयेत म्हणून मी प्रव्रजया घेतली.''
चवथा प्रत्येक बुद्ध म्हणाला, ''मी एका गांवात अधिकारी होतों. तेथील लोकांनीं यज्ञ करण्याविषयीं माझी परवानगी मागितली व लोकांना संतुष्ट करण्यासाठीं ती मी दिली. परंतु या यज्ञांत पुष्कळ प्राण्यांचा वध करण्यांत आला. आणि त्यामुळें माझ्या मनाला फार हुरहुर लागली. कांहीं अंशीं त्या प्राण्यांच्या घाताला मीच कारण झालों असें वाटून मी अधिकाराचाच नव्हे तर सार्या प्रपंचाचा त्याग केला आणि अशीं पापें पुनरपी माझ्याकडून होवूं नयेत म्हणून संन्याशी झालों.''
पांचवा प्रत्येक बुद्ध म्हणाला, ''महाराज, माझ्या मित्राप्रमाणेंच मी देखील एका गावचा अधिकारी होतों. तेथील लोकांनीं मोठ्या उत्सवासाठी माझी परवानगी मागितली असतां ती मी विचार न करितां दिली. पुढें त्या लोकांनीं उत्सवांत मद्यप्राशन करून पुष्कळ दंगेधोपे केले. त्यांच्या मद्यपानाला अंशतः मीच कारण झालों याचें मला फार वाईट वाटलें व पुनः असें पाप माझ्याकडून न व्हावें म्हणून मी संन्यास घेतला.''
हें त्यांचें आत्मवृत्त ऐकून राजा संतुष्ट झाला आणि त्यांना चीवरादिक पदार्थ देऊन त्यानें रवाना केलें. परंतु या दिवसापासून राजाचें चित्त राज्यव्यवहारांत रमेनासें झालें. त्याच्या पट्टराणीनें त्याचें मन वळविण्याचा मोठा खटाटोप केला, पण व्यर्थ. राज्यसुखोपभोगाविषयीं राजा पूर्ण विरक्त झाला आणि आपल्या प्रधानमंडळाच्या स्वाधीन राज्यकारभार करून त्यानें संन्यास घेतला. असें सांगतात कीं, योगसाधनाच्यायोगें मरणोत्तर तो ब्रह्मलोकाला गेला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.