९०. ऐहिक उपभोगानें तृप्ति होणें कठीण.

(मंधातुजातक नं. २५८)


बुद्ध भगवान श्रावस्तीमध्यें रहात असतां एका भिक्षूला पुनः गृहस्थाश्रमांत शिरून चैन करण्याची उत्कट इच्छा उत्पन्न झाली. त्याच्या बरोबरच्या भिक्षूंला ही गोष्ट समजली तेव्हां त्यांनीं त्याला भगवंताकडे नेलें. भगवान् त्याला म्हणाले, ''हे भिक्षू, इहलोकींच्या उपभोगानें मनुष्य आपली तृष्णा शमवील हें संभवत नाहीं. लाभापेक्षां लोभ वाढत जात असतो. तेव्हां सुज्ञ पुरुषांनीं आपल्या तृष्णेचें शमन सद्विचारांनींच केलें पाहिजे. तृष्णेचें शमन उपभोगांनीं होत नाहीं. याचें उदाहरण म्हणून भगवंतानें खालील गोष्ट सांगितली ः-

प्रथम कल्पांत महासमंत नांवाचा प्रसिद्ध राजा होऊन गेला. त्याचा पुत्र रोज, रोजाचा पुत्र वररोज, वररोजाचा पुत्र कल्याण, कल्याणाचा पुत्र वरकल्याण, वरकल्याणाचा पुत्र उपोसथ आणि उपासथाचा पुत्र मांधाता. मांधाता सर्व राजांत मोठा दैवशाली राजा होऊन गेला. चक्रवर्ति राजाच्या राज्यांत चक्र, हत्ती, घोडा, मणि, स्त्री, श्रेष्ठी, आणि मुख्य प्रधान अशीं सात रत्नें असतात. त्याच्या प्रभावानें राजवाड्यासमोर अंतरिक्षांमध्यें एक दिव्य चक्र भ्रमत असे. आपल्या सामर्थ्यानें चक्राला फिरवणारा म्हणूनच याला चक्रवर्ती राजा असें म्हणतात. या चक्राच्या जोरावर चक्रवर्ती राजाला वाटेल त्या ठिकाणीं अप्रतिहतपणें जातां येतें; सगळे राजे त्याचें स्वामित्व तात्काळ कबूल करतात. त्याच्यासारखा हत्ती दुसर्‍या ठिकाणीं असूं शकत नाहीं; तो अंगानें सफेत असतो; त्याचा घोडा सर्व घोड्यांत उत्तम असतो; मणि सर्व जवाहिरांत श्रेष्ठ असतो; स्त्री सर्व स्त्रियांत सुस्वरूप आणि सुशील असते; श्रेष्ठी सर्व व्यापारांत सधन असून राजाला वाटेल त्या प्रसंगी वाटेल तेवढी पैशाची मदत करूं शकतो; आणि त्याचा मुख्य प्रधान सर्व राजकारणी पुरुषांत श्रेष्ठ असून दूरदर्शी जनतेचें कल्याण करण्यांत दक्ष असतो. यांशिवाय चक्रवर्ती राजाच्या अंगीं या चार ॠद्धी असतात; तो सुस्वरूप असतो, दीर्घायुषी असतो, त्याचें शरीर निरोगी असतें, आणि तो सर्व लोकांना प्रिय असतो.

मांधाता राजाला हीं सात रत्नें आणि चार ॠद्धी प्राप्‍त झाल्या होत्या. एवढेंच नव्हे, तर डाव्या हातावर उजव्या हातानें टाळी मारल्याबरोबर आकाशांतून अशा रत्‍नांची वृष्टी पाडण्याचें त्याच्या आंगीं सामर्थ्य होतें. चौर्‍याऐशीं हजार वर्षे त्यानें बालपणांतील खेळ खेळण्यांत घालविली. तदनंतर ८४००० वर्षे युवराजपदाचा उपभोग घेतला. आणि नंतर ८४००० वर्षे चक्रवर्ती राजा होऊन सर्व जगाचें राज्य केलें. त्याचें आयुष्य किती होतें याची गणना करणें जवळ जवळ अशक्य आहे. चक्रवर्ती होऊन राज्य करीत असतां एके दिवशीं त्यांच्या मनांत 'अतिपरिचयादवज्ञा' या म्हणीप्रमाणें राज्याविषयीं तिरस्कार उद्भवला. येऊन जाऊन तेच उपभोग, तीच सत्ता आणि तीच चैन; त्यांत त्याला सुख वाटेनासें झालें किंबहुना या सर्व गोष्टींचा त्याला वीट आला. राजा कंटाळलेला आहे, असें पाहून अमात्य म्हणाले, ''महाराज आपण कोणत्या तरी वस्तुविषयीं उत्सुक दिसतां. येथें आपणाला कांहीं दुःख उपस्थित झालेलें आहे कीं काय ?''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel