१०९. पराचा कावळा.

(दद्भाजातक नं. ३२२)


प्राचीन काळीं पश्चिम समुद्रतीरावर एका वनांत एक ससा रहात असे. त्या वनांत ताडाचीं आणि बेलाचीं झाडें पुष्कळ होतीं. बरेच दिवस सशाच्या मनांत असा विचार चालला होता कीं, जर धरणीकंप होऊन या प्रदेशाचा संहार झाला, तर आपण जावें कोठें ? एके दिवशीं तो एका तरुण ताडवृक्षाखालीं बसला असतां वरून एक बेलाचें फळ त्या ताडाच्या पानावर पडलें, आणि त्या योगें मोठा आवाज झाला, तेव्हां सशाला खात्रीनें धरणीकंप होतो असें वाटून तो पळत सुटला. त्याचें पळण्याचें कारण काय आहे, हें समजण्यासाठीं दुसरा एक ससा पळतोस कां, पळतोस कां असें म्हणत त्याच्या मागें लागला. पहिला ससा मागें न वळतां म्हणाला, ''गड्या काय विचारतोस ? येथें भयंकर धरणीकंप होत आहे !''

तेव्हां तोहि ससा पळत सुटला. पुढें सशाचा एक मोठा कळप त्यास आढळला. त्यांनीं ही बातमी ऐकल्याबरोबर तेहि पळत सुटले, व्याघ्र, वनमहिष, मृग, सिंह इत्यादि वनांत रहाणारे प्राणी ही बातमी ऐकून सैरावरा धावूं लागले. त्यावेळीं आमचा बोधिसत्त्व सिंहयोनींत जन्मून त्या अरण्यांत रहात होता. तो पळत सुटलेलें हें श्वापदसैन्य पाहून पर्वतावरून धांवत धांवत पायथ्याशीं आला आणि त्यांच्यासमोर उभा राहून त्रिवार सिंहनाद करिता झाला. सिंहाची गर्जना ऐकून सर्व प्राणी चपापले आणि त्या ठिकाणींच उभे राहिले. तेव्हां तो त्यांना म्हणाला, ''तुम्ही भीतीनें व्यग्र झालेल्या प्राण्यासारखें सैरावैरा कां पळतां ?''

त्याला पळणार्‍या सिंहानीं उत्तर दिलें, ''या ठिकाणीं धरणीकंप होत आहे; असें आम्ही ऐकतों.''

''हें तुम्हांला कोणी सांगितलें ?''

ते म्हणाले, ''हत्ती सांगत आहेत.'' हत्तींला विचारलें, तर त्यांना वाघांकडून बातमी मिळाली असें त्यांनी उत्तर दिलें. वाघांना विचारलें, तर हरणांकडून - असें होतां होतां शेवटीं बोधिसत्त्वानें ज्या सशाकडून ही बातमी पसरली त्याला शोधून काढलें; आणि तो म्हणाला, ''बा सशा भूकंप होतो आहे हें तुला कसें समजलें ?''

ससा म्हणाला, ''महाराज, मी एका तरुण ताडवृक्षाखाली धरणीकंप होईल अशा विचारांत गुंत झालों असतां एकाएकीं मोठा आवाज झाला. त्यावरून पृथ्वी दुभंग होऊन कांहीं तरी भयंकर अपघात होणार आहे असें वाटून मी पळत सुटलों.''

बोधिसत्त्व म्हणाला, ''तूं ती जागा मला दाखवशील काय ?''

ससा म्हणाला, ''पण महाराज, तेथें जाण्याचें धैर्य मला मुळींच व्हावयाचें नाहीं.''

पण बोधिसत्त्वानें धीर देऊन त्याला आपल्या पाठीवर बसविलें, आणि त्या ठिकाणीं नेलें. तेथें बेलाचें एक मोठें फळ त्या ताडवृक्षाच्या खालीं पडलें होतें तें पाहून बोधिसत्त्व सशाला म्हणाला, ''अरे, हें फळ ह्या ताडाच्या पानावर आदळल्यामुळें आवाज झाला, आणि त्यायोगें तुझ्या कल्पनाशक्तीला तीव्र गती मिळून खात्रीनें धरणीकंप होतो अशी तुझी समजूत झाली.''

पुनः परत श्वापद्‍गणाजवळ येऊन बोधिसत्त्वानें त्यांची समजूत पाडली, आणि ससा बसलेली जागा दाखवून त्यांची खात्री पटवून दिली.

पराचा कावळा होतो असें म्हणतात तो असा !
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel