तो गृहस्थ मोठ्यानें हंसून म्हणाला, ''वः ! हें कांही तरी भलतेंच तुमच्या ऐकण्यांत आलें. पलीकडे ती हिरवी गार झाली दिसते की नाहीं, तेथें तुडुंब भरलेला एक मोठा तलाव आहे. त्या भागांत बारमाही पाऊस पडत असल्यामुळें पाण्याची टंचाई अशी कधींच पडत नाहीं. नुकताच तेथे पाऊस पडल्यामुळें आमच्या गाड्यांची चाकें चिखलानें भरून गेलीं आहेत तीं पहा. आमचे बैल भिजून गेले आहेत आणि पावसाच्या झडीनें भिजलेलीं आमची वस्त्रें अद्यापि वाळून गेलीं नाहींत. आपण हीं पाण्याची भांडी गाड्यावर लादून बैलांना विनाकारण त्रास देत आहां ! बरें, आतां उशीर झाला. सहजासहजीं गांठ पडल्यामुळें आपला परिचय घडला. पुढें कधी गांठ पडली तर ओळखदेख असूं द्या म्हणजे झालें.''

सार्थवाह म्हणाला, हें काय विचारतां. आपण ह्या बाजूनें आलांत म्हणून आमचा फार फायदा झाला. दंतकथांवर विश्वास ठेवून आम्ही आमच्या गाड्यांवर हें पाण्याचें ओझें लादून नेत होतों. पण आतां त्याची जरून राहिली नाहीं. नमस्कार, अशीच मेहेरबानी राहूं द्या.

तो गृहस्थ आपल्या नोकरांसह तेथून निघून गेल्यावर सार्थवाहानें मडक्यांतील पाणी फेंकून देण्यास लाविलें, व तीं मडकी तेथेंच टाकविलीं. आतां बैलांचे ओझें हलकें झाल्यामुळे गाड्या त्वरेनें चालल्या होत्या. परंतु सारा दिवस मार्ग आक्रमण केल्यावरदेखील पाण्याचा पत्ता लागेना ! तेव्हां यक्षांनी आपणाला आणि आपल्या लोकांना फसविण्यासाठीं अशी युक्ती लढविली असली पाहिजे, ही गोष्ट त्या सार्थवाहाला लक्ष्यांत आली. पण ''चौरे* (* चोर पळून गेल्यावर सावध सावध म्हणून ओरडण्यांत काय फायदा ! किंवा दिवा विझल्यावर तेल घालून काय उपयोग !!) गते वा किमु सावधानं निर्वाणदीपे किमु तैलदानम्'' ह्या म्हणीप्रमाणें संग्रहीं असलेलें पाणी कधींच जमिनींत मुरून गेलें होतें !

त्या सार्थवाहाच्या तांड्यांतील सर्व लोक हताश होऊन गेले, आणि बैलांना मोकळे सोडून गाड्या वर्तुळाकार रचून आपापल्या गाडीखालीं शोकमग्न होऊन बसले. तेव्हां त्यांच्या अंगीं त्राण राहिलें नाहीं अशी त्या धूर्त यक्षाची पक्की खात्री झाली, तेव्हां त्या तांड्यावर तो तुटून पडला; व आपल्या अनुयायांना म्हणाला, ''गडे हो, माझी युक्ति सिद्धीला जाणार नाहीं असें तुम्हाला वाटलें होतें परंतु तो सार्थवाह हातचें सोडून पळत्याच्या पाठीं लागणारा असल्यामुळें माझा पाय त्यावर बिनचूक पडला. आज तुम्ही यथेच्छ भोजन करा. अशी पर्वणी पुन्हां येईल कीं नाहीं याची मला शंकाच आहे.''

गाड्यांतील सामानसुमान आणि गाड्या तेथेंच टाकून देऊन यक्षांनी सर्व बैलांना आणि माणसांना खाऊन टाकिलें, आणि मोठ्या हर्षानें नाचत उडत ते आपल्या निवासस्थानाला गेले.

त्या मूर्ख सार्थवाहाला वाराणसीहून निघून पंधरवडा झाल्यावर आमचा बोधिसत्त्व आपल्या नोकरांसह वाराणसीहून निघून अनुक्रमें प्रवास करीत करीत त्या जंगलांजवळ आला. तेथें आपल्या सगळ्या लोकांना एकत्र जमवून तो म्हणाला, ''गडे हो हें निरुदककांतार असून अमनुष्यकांतारहि आहे. तेव्हां तेथें आम्ही मोठ्या सावधपणानें वागलें पाहिजे. जर वाटेंत तुम्हाला कोणी भलतेंच फळ, मूळ, दाखवील तर तें तुम्ही खातां कामा नये; अपरिचित शाकभाजीचा तुम्ही आपल्या अन्नात उपयोग करितां कामा नये; किंवा अन्य कोणतीहि विशेष गोष्ट घडून आली, तर ती ताबडतोब मला सांगितल्यावांचून राहतां कामा नये.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel