११३. देव प्रसन्न असले तर राक्षसांची पर्वा बाळगावयास नको.

(अयकूट जातक नं. ३४७)


एकदां बोधिसत्त्व वाराणसीच्या राजकुलांत जन्माला येऊन वयांत आल्यावर आपल्या पित्याच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला. तो धर्मन्यायानें राज्यकारभार चालवीत असे. त्यावेळीं लोकांचा भूतपिशाचावर फार विश्वास असे व पुष्कळ प्राण्यांचा वध करून ते भूतपिशाचाला बळी दान देत असत. बोधिसत्त्वाला प्राणिहिंसा मुळींच आवडली नाहीं. त्यानें राज्यकारभार हातीं आल्याबरोबर यक्ष-राक्षसादिकांसाठीं प्राण्यांचा वध करून बलिकर्म करूं नये असा जाहिरनामा लाविला. लोकांना राजाज्ञेप्रमाणें बलिकर्म सोडून देणें भाग पडलें. तेव्हां सर्व यक्षराक्षसादिक भूतगण क्षुब्ध होऊन गेले. आणि त्यांनीं एकत्र जमून राजाचा वध करण्यासाठीं एका भयानक राक्षसाला पाठविलें. तो हातांत एक अग्नितप्‍त लोखंडी गदा घेऊन दुपारच्या प्रहरीं बोधिसत्त्वाच्या वाड्यांत शिरला आणि त्याच्या मंचकाजवळ अंतरिक्षांत उभा राहिला. तो प्रकार पाहून इंद्र तत्क्षणीं त्या ठिकाणीं अवतरला आणि गुप्‍त रूपानें तेथें राक्षसाच्या शिरावर उभा राहिला. तो राक्षसाला मात्र दिसत होता; आणि बोधिसत्त्वाला राक्षस तेवढा दिसत होता; बोधिसत्त्व त्याला भिऊन न जातां म्हणाला, ''हे पुरुषा तूं यक्ष राक्षस, पिशाच किंवा देवता यांपैकीं कोण आहेस ? ही तप्‍त गदा घेऊन माझें रक्षण करण्यासाठीं येथं संचार करीत आहेस किंवा मला मारण्यासाठीं येथें आला आहेस हे मला सांग.''

त्यावर तो राक्षस म्हणाला, ''महाराज, सर्व यक्षराक्षसादिकांचें तुमच्याविषयीं फार वाईट मत झालें आहे. तुम्ही बलिदान बंद केल्यामुळें आम्ही सर्वजण तुमच्यावर रागवलों आहों; आणि तुमच्या वधाचें काम माझ्या सर्व बांधवांनीं माझ्यावर सोंपविलें आहे. परंतु माझ्या मार्गांत एक मोठी अडचण आहे ती ही कीं, देवांचें तुमच्याविषयीं चांगलें मत आहे, आणि साक्षात् इंद्र तुमच्या रक्षणासाठीं येथें संचार करीत आहे. तेव्हां तुमच्या शरीराला अपाय केला असतां इंद्राच्या तावडींतून सुटून सुखरूपपणें परत जाणें शक्य नाहीं. म्हणून मी कर्तव्यमूढ होऊन या ठिकाणीं उभा राहिलों आहें.''

राजा म्हणाला, ''जर माझ्याविषयीं देवांचें मत चांगलें असून साक्षात् इंद्र माझें रक्षण करीत आहे तर यक्षराक्षसादि सर्व पिशाचगणाला वाटेल तेवढा आक्रोश करूं द्या ! किंवा माझ्याविरुद्ध वाटेल तेवढे कट उभारूं द्या ! त्यांच्या मताची किंवा भेडावण्याची मला मुळींच परवा नाहीं ! मनुष्यानें सज्जनाचें मत आपल्या संबंधानें काय आहे एवढें पाहिलें म्हणजे दुर्जन आपल्या संबंधानें काय म्हणतात याचा विचार करावयास नको.

शक्रानें त्या यक्षाला तेथून घालवून देऊन बोधिसत्त्वाला दर्शन दिलें; आणि त्याची स्तुती करून तो देव लोकाला जाता झाला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel