३६. अकिंचनाला भय कोठून.

(असंकिय जातक नं. ७६)

एकदां आमचा बोधिसत्त्व ब्राह्मणकुलांत जन्मला होता. वयांत आल्यावर प्रापंचित सुखें त्याज्य वाटून त्यानें हिमालयावर तपश्चर्या आरंभिली. पुष्कळ काळपर्यंत फलमूलांवर निर्वाह केल्यावर खारट आणि आंबट पदार्थ खाण्यासाठीं लोकवस्तींत जावें या उद्देशानें तो तेथून निघाला. वाटेंत त्याला कारवानांचा तांडा सांपडला. त्यांच्या बरोबरच तो मार्गक्रमण करूं लागला. रात्रीं एका ठिकाणीं मुक्कामाला उतरले असतां त्या व्यापार्‍यांना लुटण्यासाठीं पुष्कळ चोर जमा होऊन व्यापारी निजल्यावर लुटावें अशा उद्देशानें आसपास दबा धरून राहिले. बोधिसत्त्व एका झाडाखालीं इकडून तिकडे फिरत होता. सगळे व्यापारी झोंपी गेल्यावर चोर हळू हळू जवळ येऊं लागले. त्यांची चाहूल ऐकून बोधिसत्त्व तसाच फेर्‍या घालीत राहिला. चोर तिकडे वाट पहात बसले होते. हा तपस्वी निजणार व या तांड्याला आम्ही लुटणार, अशा बेतानें चोरांनीं ती सारी रात्र घालविली परंतु आमचा बोधिसत्त्व झोंपीं न जातां सारी रात्र फेर्‍या घालीत जागृत राहिला. पहांटेला चोर आपली हत्यारें तेथेंच टाकून पळत सुटले, व जातां जातां मोठ्यानें ओरडून म्हणाले, ''निष्काळजी व्यापार्‍यांनों, हा तपस्वी तुमच्या बरोबर नसता तर आजच तुमचे घडे भरले असते !''

व्यापारी चोरांच्या आरोळ्यांनीं जागे होऊन पहातात तों त्यांना चोरांनीं टांकून दिलेलीं शस्त्रास्त्रें आढळून आलीं. ते बोधिसत्त्वाला म्हणाले, ''सारी रात्र चोर तुमच्या आसपास दबा धरून बसले असतां, व ते तुमच्यावर हल्ला करतील असा संभव असतां तुम्ही भिऊन आरडाओरडा केली नाहीं हें कसें !''

बोधिसत्त्व म्हणाला, ''गृहस्थहो, जेथें संपत्ति आहे तेथें भय आहे. माझ्यासारख्याला भय मुळींच नाहीं, गांवांत किंवा अरण्यांत कोणत्याही प्राण्याची मला भीति वाटत नाहीं. कां कीं, मैत्री आणि करुणा यांची मी सतत भावना करीत असतों.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel