राजा मृगपुच्छाच्या साहाय्यानें त्या कर्दमरूपी वैतरणीतून मोठ्या कष्टानें बाहेर पडला. बराच वेळ चिखल तुडवण्यांत घालविल्यामुळें तो फार श्रांत झाला होता व आपण कोणत्या दिशेनें आलों याचें देखील त्याला भान राहिलें नाहीं. तो क्षणभर निश्चेष्ट होऊन पडला व पुनः थोडा भानावर येऊन बोधिसत्त्वाला म्हणाला, ''भो मृगराज, तूं मोठा कारुणिक आहेस. तूं मला जर माझे लोक आहेत तें ठिकाण दाखवशील तर मला या पंकांतून उद्धरल्याचें सार्थक होईल. नपेक्षां या जंगलांत भटकतां भटकतां क्लांत होऊन मी मरण पावेन.''

बोधिसत्त्वानें त्याला आपल्या पाठीवर बसवून सैन्याच्या जवळ आणून सोडिलें व सैन्याला कळूं न देतां तो पुनः जंगलांत शिरला. राजानेंहि घडलेली गोष्ट कोणाला कळूं दिली नाहीं. तथापि, राजधानींत सुखरूप पोहोंचल्यावर पहांटेला उठून तो नित्य बोधिसत्त्वाचें व त्याच्या करुणामय वर्तनाचें पद्यबंधनानें स्तवन करीत असे.

एके दिवशीं त्याचा पुरोहित कांहीं कामानिमित्त पहांटेला राजवाड्यांत आला होता व राजा आपल्या शयनमंदिरांतून बाहेर येण्याची तो वाट पहात उभा राहिला होता. इतक्यांत शरभमृगाच्या करुणामय कृत्याचें राजानें केलेलें स्तवन पुरोहिताच्या कानीं पडलें व राजा शयनमंदिरांतून बाहेर आल्यावर तो म्हणाला, ''महाराज, प्रातःकालीं आपणावर उपकार करणार्‍या शरभमृगाची आठवण झाली काय ?''

राजा म्हणाला, ''ही गोष्ट तुम्हास कशी समजली ? अरण्यांत तुम्ही लपून घडलेला प्रकार पाहिला कीं काय ? किंवा तुम्हाला एखादी देवता प्रसन्न असली पाहिजे, अथवा दुसर्‍याचें चित्त जाणण्याचें तुम्हास सामर्थ्य असलें पाहिजे.''

पुरोहित म्हणाला, ''यापैकीं कांहीं नाहीं. आपण केलेलें मृगराजाचें स्तवन ऐकून घडलेल्या प्रकाराचें मला अनुमान करतां आलें.''

राजानें इत्थंभूत वर्तमान पुरोहिताला सांगितलें तेव्हां राजाच्या कृतज्ञतेची कसोटी पहाण्याविषयीं पुरोहिताचें मन अत्यंत उत्सुक झालें. त्याला इंद्र प्रसन्न होता अशी आख्यायिका आहे.

एके दिवशीं राजाबरोबर तोहि शिकारीस गेला व इंद्राच्या सामर्थ्यानें त्यानें शरभमृगाला राजाच्या समोर उभे केलें आणि तो राजाला म्हणाला, ''महाराज, ज्या मृगानें तुम्हाला दवडींत नेऊन पंकांत पाडलें तो हा मृग समोर उभा आहे. याच्यावर आपलें शरसंधान चालूं करा.''

राजा म्हणाला, ''भो ब्राह्मण, हाच तो शरभमृग हें मी पुरें ओळखतों. परंतु ज्याअर्थी त्यानें मला पंकांतून उद्धरलें त्याअर्थी त्याच्यावर बाण टाकणें अत्यंत गैरशिस्त आहे असें मी समजतों.''

ब्राह्मण म्हणाला, ''महाराज, हा मृग नसून असुर आहे आणि याला मारिलें असतां तूं स्वर्गास जाशील. पण जर अशा वेळीं आपलें कर्तव्य सोडून याच्यावर बाण सोडणार नाहींस तर पुत्रदारांसह तूं यमाच्या वैतरणीप्रत जाशील.''

हें ऐकून राजा म्हणाला, ''मी आणि माझें कुटुंब एवढेंच नव्हें तर माझें सर्व राष्ट्र जरी वैतरणीत जाऊन पडलें तरी मला प्राणदान देणार्‍या या मृगावर मी शरसंधान धरणार नाहीं. त्यानें मला पळवून नेलें हें म्हणणें बरोबर नाहीं. तो केवळ आपला जीव बचावण्यासाठीं पळाला व माझ्या अज्ञानामुळें मी जाऊन पंकांत रुतलों. पण त्यानें शत्रुभाव विसरून जाऊन माझा उद्धार केला ही गोष्ट विसरतां येण्यासारखीं नाहीं. आणि जाणून बुजून मी कधींहि कृतघ्न होणार नाहीं.''

तें ऐकून पुरोहित म्हणाला, ''महाराज, तूं हें राज्य चिरकाल कर व पुत्रदारासह सदोदित तुझी अभिवृद्धि असो आणि याप्रमाणें सर्वदैव कृतज्ञताधर्म पालन करून व न्यायनीतीनें राज्य चालवून सर्व अतिथींचा योग्य मान ठेवून मरणोत्तर स्वर्गवास संपादन कर.'' ब्राह्मणानें असा आशीर्वाद दिल्यावर इंद्रहि तेथें प्रकट झाला व त्यानें राजाची प्रशंसा करून त्याला आशीर्वाद दिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel