आजीनें नातीच्या आग्रहास्तव बोधिसत्वाला हांक मारिली आणि ओसरीवर मांडलेल्या एका आसनावर बसावयास सांगितलें. तो खालीं बसल्यावर ती त्याला म्हणाली, ''ह्या जुन्या ताटाची कांही तरी किंमत असावी असें मला वाटतें, कांकीं, आमच्या घरीं ज्या काळीं लक्ष्मी पाणी भरीत होती, त्या काळचें हें ताट आहे. पण तुमच्या पूर्वी येथें येऊन गेलेला व्यापारी गृहस्थ याची कांहींच किंमत नाहीं असें म्हणतो. तुम्हीं हें एकवार नीट तपासून पहा, आणि जर याची कांही किंमत होत असेल, तर ह्याच्या मोबदला माझ्या मुलीसाठीं एकादा मण्याचा अलंकार द्या.''

बोधिसत्वानें तें ताट कसोटीला लावून पाहिलें, आणि तो त्या बाईला म्हणाला, ''बाई, ह्या ताटाची किंमत एक लाख कार्षापण आहे, माझ्याजवळ अवघे पांचशें कार्षापण आहेत, आणि माझ्या मालाची किंमत फार झाली तर तीन साडेतीन हजार कार्षापण भरेल. तेव्हां ह्या ताटाच्या मोबदला देण्याजोगें मजपाशीं कांहीं नाहीं.''

बोधिसत्वाचें सचोटीचें वर्तन पाहून त्या कुलीन स्त्रीला फार संतोष झाला. ती म्हणाली, ''व्यापारी लोकांत तुझ्यासारखा प्रामाणिक माणुस विरळा. आम्हीं जर हें ताट बाजारांत विकावयास नेलें तर आमच्या ह्या दारिद्य्रावस्थेंत आमच्यावर चोरीचा आळ येण्याचा संभव आहे. तेव्हां तुला जें कांही देणें शक्य असेल तेवढें देऊन हें ताट घेऊन जा. तुझ्या प्रामाणिकपणाच्या वर्तनाबद्दल हें तुला बक्षीस आहे असें आम्हीं समजू.''

बोधिसत्व म्हणाला, ''माझ्याजवळ असलेला सर्व माल आणि रोकड रक्कम ह्या ताटाच्या मोबदला मी तुम्हाला देतों, मात्र मला ह्या रकमेपैकी आठ कार्षापण आणि मालापैकीं माझी तराजू मला द्या.''

त्या बाईला हा सौदा पसंत पडला. बोधिसत्व तें ताट, आपली तराजू आणि आठ कार्षापण घेऊन नदीच्या काठीं आला, व ते कार्षापण देऊन त्यानें नावाड्याला विलंब न लावतां आपणाला परतीरीं पोंचविण्यास सांगितलें.

इकडे सेरिवा सर्व शहर हिंडल्यावर पुन्हां त्या कुलीन स्त्रीच्या घरी गेला व तिला म्हणाला, ''बाई, तें ताट आण पाहूं. त्या ताटाची जरी कांहींच किंमत नाहीं, तथापि तुझ्यासारख्या थोर घरांण्यांतील बाईला वाईट वाटूं देणें मला योग्य वाटलें नाहीं, म्हणून पुनः येथवर येण्याची मीं तसदी घेतली.''

बाई म्हणाली, ''वा ! वा ! तू मोठा धूर्त दिसतोस ! जणूं काय आमच्यावर उपकार करण्यासाठींच येथें आला आहेस ! पण हें पहा ! त्या आमच्या ताटाची किंमत एक लाख होती, आणि त्याच्या मोबदला पांच-आठ कार्षापण किंमतीची एकादी मण्याची माळ देखील देणें तुला कठीण पडलें ! म्हणजे जवळ जवळ आमचें ताट तूं फुकटच घेऊं पहात होतास !! परंतु तुझ्या धन्याच्या योग्यतेचा दुसरा एक सज्जन वाणी येथें आला, आणि त्यानें त्या ताटाची खरी किंमत आम्हास सांगितली; व आपणाजवळ होता नव्हता तो सर्व माल आणि पैसा आम्हास देऊन तो तें ताट घेऊन गेला. तूं जर त्या वेळीं आम्हास एकादी मण्याची माळ दिली असतीस, तर ते ताट तुलाच मिळालें असतें ! पण अति शहाण्याचा बैल रिकामा !''

हें त्या बाईचें भाषण ऐकतांच सेरिवा पिसाळलेल्या कुतर्‍यासारखा उन्मत्त झाला. त्यानें आपला माल व पैसे त्या बाईच्या दरवाज्यांत इतस्ततः फेंकून दिले, व एक भलें मोठें दांडकें घेऊन तो नदीवर धांवला. बोधिसत्व नदीच्या मध्यभागी पोंचला होता त्याला पाहून सेरिवा अत्यंत संतप्‍त झाला, व 'नाव परत आणा, नाव मागें आणा' असें मोठमोठ्यानें ओराडूं लागला. कोणी कांही सांगितलें तरी नाव न फिरवतां आपणाला त्वरेनें परतीरी पोचविलें पाहिजे, असा बोधिसत्वानें अगाऊच करार केला होता तेव्हां नावाड्यांनीं सेरिवा वाण्याच्या ओरडण्याकडे लक्ष्य न देतां वेगानें नाव पुढें चालविली. सेरिवा ओरडून ओरडून थकला व घेरीं येऊन तेथेंच पडला !
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* अतिलोभें धर्मनया मोहुनियां कष्ट फार भोगाल ॥
तो सेरिवा बुडाला, तेविं तुम्हीं शोक सागरी व्हाल ॥१॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मूळ गाथा --
इध चे चे हिनं निराधेसि सद्धम्मस्स नियामतं ।
चिरं त्वं अनुतपेस्ससि सेरिबायंऽव वाणिजो ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel