११९. शीलावांचून वेदविद्या व्यर्थ
(सेतकेतुजातक नं. ३७७)
आमचा बोधिसत्त्व एकदां प्रसिद्ध आचार्य होऊन पुष्कळ शिष्य पढवीत होता. त्याचा अग्रशिष्य श्वेतकेतु हा एके दिवशीं स्नान करून येत असतां वाटेंत त्याला एक चांडाळ जातीचा मनुष्य भेटला. चांडाळाच्या अंगाचा वारा आपल्या अंगावर येऊं नये व त्याची सावली आपणावर पडूं नये म्हणून श्वेतकेतु मोठ्यानें ओरडून म्हणाला, ''मूर्ख चांडाळा ! रस्त्यांतून दूर हो ! मी ब्राह्मण असून तुझ्या अंगाचा वारा माझ्यावर येतां कामा नये, हें तुला माहीत नाही काय ?''
चांडाळ म्हणाला, ''तूं जर ब्राह्मण आहेस तर मी सांगतों त्या प्रश्नांची उत्तरें दे.''
असें बोलून चांडाळानें श्वेतकेतूला निरनिराळे प्रश्न विचारले; परंतु श्वेतकेतु त्यांची उत्तरें देऊं शकला नाहीं. तेव्हां चांडाळानें त्याला आपल्या दोन्ही पायांच्या मधून बाजूला सारलें, आणि तो तेथून निघून गेला. चांडाळानें केलेल्या अपमानानें श्वेतकेतु अत्यंत क्रोधायमान झाला. परंतु चांडाळाचें दमन करण्याचें त्याला सामर्थ्य नसल्या कारणानें आपल्या गुरुजवळ जाऊन चांडाळाला शिव्याशाप देण्यास सुरवात केली. तेव्हां आचार्य म्हणाला, ''बा श्वेतकेतु, या बाबतींत तुझाच मोठा अन्याय झाला आहे. मार्गांत उभा रहाणार्या चांडाळाचा उपमर्द करण्याचा तुला अधिकार कसा पोहोंचतो ? शिवाय तो चांडाळ तुझ्यापेक्षां अधिक बुद्धिमान दिसतो. मग त्याच्याशीं स्पर्धा करून आपली फजिती करून घेण्यांत अर्थ कोणता ? तूं वादविवाद करण्यांत आपला काल न घालवितां मुकाट्यानें घरीं यावयाचें होतें कीं नाही ? बरें, आतां तरी शांत हो आणि शिव्याशाप घालून आपल्याच शीलाचा भंग करून घेऊं नकोस. गुरूंच्या या उपदेशानें श्वेतकेतु थंडावला; परंतु तेथें रहाण्यास त्याला फार लाज वाटली. आपण जेथे विद्यार्थ्यांत श्रेष्ठ म्हणून मिरवलों तेथेंच चांडाळाकडून आपली अशी फजिती व्हावी, व आचार्यानेंहि आपलाच अपराध ठरवावा हें त्या अत्यंत मानी तरुणाला कसें रुचेल ? त्यानें ताबडतोब गुरुगृह सोडून प्रयाण केलें. व पुढें तक्षशिलेला जाऊन आपलें अध्ययन पुरें केलें, आणि लोकांमध्ये आपली पूजा व्हावी या उद्देशानें त्यानें संन्यास ग्रहण केला. बरेच शिष्य गोळा करून पुनः तो वाराणसीला आला आणि तेथें शहराबाहेर उतरला. राजानें त्याचा योग्य आदरसत्कार करून तापसगणासह त्याला रहाण्यासाठीं आपलें एक उत्तम उद्यान दिलें, व एके दिवशीं संध्याकाळीं आपण भेटीस येणार आहें असा त्यास निरोप पाठविला. राजा भेटीस येणार आहे हें समजल्याबरोबर श्वेतकेतूनें तपश्चर्येचें मोठेंच अवडंबर माजविलें. आपल्या शिष्यांपैकीं कांहींना पाय झाडांना बांधून लोमकळत ठेविलें; कांहींना पंचाग्निव्रत साधन करावयास लाविलें; कांहीं हात वर करून तपश्चर्या करीत बसले; आणि आपण स्वतः एक पुस्तक घेऊन पुष्कळ शिष्यांस भोंवती गोळा करून त्याचा अर्थ सांगत बसला. इतक्यांत आपल्या अमात्यांसह राजा त्या ठिकाणीं येऊन पोहोंचला. त्या अमात्यांपैकीं एकजण आमचा बोधिसत्त्व होता. त्याला राजा म्हणाला, ''नानातर्हेची तपश्चर्या करीत बसलेले हे तापस कोण आहेत ? आणि या त्यांच्या अवडंबराचा काय उपयोग ? या त्यांच्या कृत्यानीं ते अपायापासून मुक्त होतील काय ?
बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराज, जर माणसाचें शील शुद्ध नसेल तर त्यानें तपश्चर्येचें कितीहि ढोंग माजविलें किंवा विद्येचें मोठें प्रदर्शन मांडलें तरी त्यापासून तिळमात्र फायदा व्हावयाचा नाहीं.''
हें राजाचें आणि बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून श्वेतकेतूस चीड आली, आणि तो म्हणाला, ''तुमच्या म्हणण्याप्रमाणें सदाचरणावांचून मुक्ति नाहीं. मग सर्व वेदांचें अध्ययन करणारा देखील मोक्षाला जावयाचा नाहीं, आणि असें झालें म्हणजे वेदांचे अध्ययन निष्फळ ठरेल.''
बोधिसत्त्व म्हणाला, ''वेदांचे अध्ययन निष्फळ आहे असें माझें मुळींच म्हणणें नाहीं. वेदांच्या अध्ययनानें लोकांत आपलें स्तोम माजतें; परंतु सदाचरणानेंच मोक्ष मिळतो. कीर्ति पाहिजे असली तर वेदांचें अध्ययन करावें पण मोक्ष पाहिजे असला तर शीलच संपादावें.''
याप्रमाणें बोधिसत्त्वानें शीलवांचून तपश्चर्या आणि वेदाध्ययन व्यर्थ आहे हें सिद्ध करून दाखविलें. तेव्हां राजानें श्वेतकेतूचा दांभिकपणा ओळखला, आणि त्याला आणि त्याच्या शिष्यांना गृहस्थाश्रम देऊन आपल्या नोकरींत ठेऊन घेतलें.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.