३. लोभाचा परिणाम

(सेरिववाणिज जातक नं. ३)

तैलवाह नदीच्या कांठी आंध्रपूर नांवाचें नगर होतें. तेथें एक प्रख्यात श्रेष्ठी रहात असे. कालांतरानें ह्या श्रेष्ठीच्या घरावर अवदशेची फेरी आली. धनदौलत नष्ट झाली; आणि घरांतील सर्व पुरुषमंडळी मरून गेली, एक भोळसर बाई आणि तिची नात एवढींच काय ती दोन मनुष्यें ह्या श्रेष्ठीचें कुळांत शिल्लक राहिली होतीं. आपल्या वाड्याच्या मोडक्यातोडक्या भागांत राहून त्या दोघी बाया मोलमजूरीवर आपला निर्वाह करीत असत.

त्या काळीं आमचा बोधिसत्त्व एका वाण्याच्या कुळांत जन्मला होता. वयांत आल्यावर तो दुसर्‍या एका सेरिवा नांवाच्या फेरीवाल्यावाण्याबरोबर फेरीवाल्याचा धंदा करून आपला निर्वाह करीत असे. एकदां फिरत फिरत तें दोघे आंध्रपुराला आले. तेथें आपसामध्यें स्पर्धा होऊं नये म्हणून त्यांनी त्या शहरांतील गल्ल्या वांटून घेतल्या. ज्याच्या वांट्याला जे रस्ते आले असतील ते त्यानें फिरून संपविल्यावांचून दुसर्‍यानें त्या रस्त्यांत आपला माल विकण्यासाठीं फिरूं नये, असा त्यांनी निर्बंध केला. बोधिसत्त्वानें आपल्या वांट्याला आलेल्या रस्त्यांतून फेरी करून पांचशें * कार्षापणांची विक्री केली.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* कार्षापण हे एकप्रकारचें नाणें असे. सुवर्ण कार्षापण, रौप्य कार्षापण व ताम्र कार्षापण असे त्याचे भेद असत. त्याच किंमती खात्रीनें सांगता येत नाहींत. तथापि अनुक्रमें ५ रुपये, १ रुपया व अर्धा आणा अशा असाव्या असा अंदाज करितां येतो. तेथें बोधिसत्त्वानें ५०० ताम्र कार्षापणाची विक्री केली असावी; व ह्या गोष्टींत पुढेंहि ताम्र कार्षापणच अभिमत असावा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सेरिवा आपल्या हिश्श्याला आलेल्या रस्त्यांतून फेरी करीत असतां वर सांगितलेल्या श्रेष्ठीच्या मोडक्या वाड्यावरून ''मणी घ्या, मणी घ्या, नानातर्‍हेचे जिन्नस घ्या,'' असें मोठ्यानें ओरडत चालला होता. तें ऐकून त्या घरांत राहणारी मुलगी धावत जाऊन आपल्या आजीला म्हणाली, ''आजीबाई आजीबाई, हा व्यापारी आमच्या घरावरून चालला आहे. त्याजकडून कांचेचे मणी किंवा दुसरा एकादा जिन्नस मजसाठीं विकत घे.''

आजीबाई म्हणाली, ''मुली, आम्हाला मिळणार्‍या मोलमजूरीनें आमचा निर्वाहदेखील नीटपणें होत नाहीं. मग आम्हाला मणी वगैरे जिन्नस घेणें शक्य आहे काय ?''

मोडक्यातोडक्या सामानामध्यें एक भलें मोठें ताट पडलें होतें. तें त्या मुलीनें आपल्या आजीजवळ आणून ती म्हणाली, ''आजीबाई ह्या ताटाचा आम्हाला मुळींच उपयोग होत नाहीं. मी आज किती दिवस पाहातें, हें ताट त्या मोडक्या सामानांत पडून राहिलें आहे. हें देऊन तो व्यापारी कांही जिन्नस देत असला तर आपण घेऊं.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel