९६. नेत्याशिवाय संघशक्ति उत्पन्न होत नाहीं.

(वढ्ढकिसूकरजातक नं. २८३)


एका अरण्यांत पुष्कळ डुकर रहात असत. त्यांचा रहाण्याच्या जागेपासून कांहीं अंतरावर एक ढोंगी तपस्वी रहात असे. त्यानें एक वाघाचा बच्चा पाळला होता. तो वयांत आल्यावर तपस्वी त्याला पाठवून डुकरांला मारवून त्यांचे मांस खात असे. प्रत्येक दिवशीं वाघ एक डुकर मारून आणी. तपस्वी त्या डुकराचें उत्तम मांस आपणासाठीं राखून ठेऊन राहिलेलें वाघास देत असे. एके दिवशीं वाघाच्या भयानें डुकर पळत असतां त्यांच्या कळपांतील एक पोर एका खड्डयांत पडलें. डुकर दुसरीकडे निघून गेलें. त्या रस्त्यानें जंगलांतील झाडें तोडण्यासाठीं एक सुतार जात होता. त्याला तें पोर आढळलें. सुताराला त्याची दया आली आणि घरीं नेऊन त्यानें त्याचें चांगलें संगोपन केलें, तो डुकराचा छावा भराभर वाढला. सुताराला तो इतका प्रिय होता की, आपली हत्यारें त्याच्या तोंडात देऊन त्याला तो बरोबर घेऊन जात असे. आपली दोरी त्याच्या तोंडांत देऊन त्याला ती धरावयास लावीत असे. डुकरहि मोठा हुषार असल्यामुळें सर्व कामें मोठ्या काळजीनें करी. तो बराच मोठा झाल्यावर सुताराला अशी भीति उत्पन्न झाली कीं, मांसाच्या आशेनें याला कोणीतरी मारून टाकतील, तेव्हां त्यानें त्याला पूर्वी सांपडलेल्या ठिकाणीं नेऊन सोडण्याचा विचार केला; व एके दिवशीं अरण्यांत लांकडें तोडावयास जात असतां त्याला तेथें नेऊन सोडलें. डुकर इकडे तिकडे हिंडत असतां त्याला आपला जुना कळप आढळला. तेव्हां तो त्याला म्हणाला, ''तुम्ही या अरण्यांत काय करितां ?''

ते डुकर हा कोणीतरी हेर आहे असें वाटून त्याला म्हणाले, ''पण तुझें आमच्याशीं काय काम आहे ? तूं येथें कां आलास ?''

तो म्हणाला, ''मी लहानपणीं याच जंगलांत रहात असे. आतां मला सर्व गोष्टींची नीट आठवण नाहीं. तथापि असें स्मरतें कीं, मीं एकदां एका खड्डयांत पडलों. तेथून मला एका दयाळू सुतारानें नेऊन माझें पालनपोषण केलें. त्याला मी फारच आवडत असें. लोकहि मला वर्धकिसूकर (सुताराचा डुकर) असेंच म्हणत. परंतु माझ्या त्या दयाळू पालकानें मला कोणी तरी मारून खातील या भीतीनें पुनः या अरण्यांत आणून सोडलें.''

ही त्याची हकीगत ऐकून वयोवृद्ध डुकरांना एक पोर हरवलें होतें त्याची आठवण झाली, व तोच हा असावा असें त्यांस वाटलें. पण हा सुखाची जागा सोडून येथें आला हें त्यांस आवडलें नाहीं. ते म्हणाले, ''तूं जेथें होतास तेथें तुला मरणाची भीति कमी होती. पण येथें आमच्या मागें रोजचेंच मरण लागलें आहे. आतां तरी तूं येथून पळ काढ आणि आपल्या पालकापाशीं जाऊन रहा. आमची ही कशी अवस्था झाली आहे ती पहा ! या अरण्यांत चारापाणी विपुल असतां आमच्यांतील एकाच्या तरी अंगावर मांस आहे तर पहा !''

नंतर त्यांनीं त्यांच्या विपत्तीचें सर्व कारण सांगितलें. तेव्हां तो म्हणाला, ''तुम्ही इतकेजण असतां एकटा वाघ येऊन, मिळेल त्याला मारून नेतो हें ठीक नाहीं. तुमच्यापैकी दोघेचौघेजण एकदम मरण्याला सिद्ध झालें तर वाघाचा सूड तेव्हांच उगवितां येण्यासारखा आहे.'' सर्व डुकर एकदम ओरडून म्हणाले, ''चौघे कां वाघाच्या तोंडातून मुक्त होण्याची खात्री असल्यास आम्हीं एकदम पंचवीस असामी मरण्यास तयार आहों !''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel