कटाहक पळून गेल्यावर श्रेष्ठीला वर्ष दोन वर्षे त्याचा पत्ता लागला नाहीं. पण पुढें तो व्यापार्‍याच्या घरीं घरजांवई होऊन रहात आहे ही बातमी त्याला समजली, व तिचा खरेपणा पाहण्यासाठीं त्यानें आपले हेर त्या शहरीं पाठविले. त्यांनी जेव्हां बोधिसत्त्वाला कटाहकाचें इत्थंभूत वर्तमान सांगितलें, तेव्हां त्यानें तेथें जाऊन त्याची फजीति करून पुनः आपल्या घरीं आणण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणें आपल्याबरोबर मोठा सरंजाम घेऊन तो त्या शहरीं जाण्यास निघाला. तो त्या शहरापासून कांहीं अंतरावर पोहोंचला नाहीं तों त्याच्या आगमनाचें वर्तमान कटाहकाला समजलें, व तो अगदीं घाबरून गेला. श्रेष्ठी या ठिकाणीं आला तर आपली पुरी फजीति होणार हें तो जाणून होता पण येथून दुसर्‍या ठिकाणीं पळून जाणें हें देखील त्याला इष्ट वाटेना. कांहीं काळ कटाहक किंकर्तव्यमूढ होऊन विवंचनेंत पडला. परंतु त्याच्या समयसूचकबुद्धीनें त्याला शेवटीं हात दिला. या नवीन संकटांतून पार पडण्यास त्यानें नवीच युक्ति शोधून काढली. त्या दिवसापासून आपल्या आप्‍तइष्टांजवळ तो पितृभक्तीचीं मोठमोठालीं वर्णनें करूं लागला. तो म्हणाला, ''अहो तुमचें हें शहर म्हणजे वाराणसीच्या मानानें नुसतें खेडेगांव आहे. येथील लोकांना रीतरिवाज कांहींच माहीत नाहीं. पितृभक्ति कशी असते हें या गांवढळ लोकांना कसें समजणार. तुम्ही एकदां वाराणसीला जाऊन पहा ! आम्हीं तेथें आमच्या वडिलांसमोर कधींहि खालीं बसत नसतों. भोजनसमयीं त्यांची सर्व सेवा करतों. पिकदाणी लागली तर आणून देतों. एवढेंच नव्हे तर वडील शौचाला जावयास निघाले; तर स्वतः त्यांजबरोबर त्यांच्या उपयोगासाठीं पाणी नेऊन ठेवितों. असलीं कामें आम्ही आमच्या नोकरांवर मुळींच सोंपवित नसतों पण या गांवीं तुम्हाला अशा तर्‍हेनें पितृसेवा करावी ही गोष्ट माहीत तरी आहे काय ?''

त्या शहरांतील लोकांनीं वाराणसींत फार दिवस वास्तव्य केलें नसल्यामुळें व तेथील रीतिरिवाजाची माहिती नसल्यामुळें कटाहक सांगेल तें त्यांना प्रमाण होऊन बसलें, व काशीच्या चालीरीतीसंबंधानें त्यांना एकप्रकारचा मोठा आदर वाटला.

महाश्रेष्ठी लवकरच त्या शहरीं पोहोंचणार हें जाणून कटाहक आपल्या सासर्‍याला म्हणाला, ''मामाजी, तुम्ही माझ्या पित्याच्या आदरातिथ्याची सर्व तयारी करून ठेवा. मी पित्याच्या भेटीला आमच्या सामर्थ्यांप्रमाणें नजराणे घेऊन जातों व मोठ्या गौरवानें त्याला तेथें घेऊन येतों. आपले वडील इतके जवळ आले आहेत हें जाणून घरींच बसून राहणें हें वाराणसींतील कुलपुत्रांना अत्यंत अनुचित आहे. तेव्हा मी आजच्या आज माझ्या पित्याच्या भेटीसाठीं जात आहे.''

बराच लवाजमा बरोबर घेऊन तो महाश्रेष्ठीच्या दर्शनाला गेला. वाटेंत महाश्रेष्ठी एका ठिकाणीं उतरला होता. तेथें कटाहकानें त्याची भेट घेऊन आपण आणलेले नजराणे दिले. श्रेष्ठीला मोठा चमत्कार वाटला ! आपलें नांव ऐकल्याबरोबर कटाहकानें पलायन करावें किंवा गर्भगळीत होऊन जावें, असें असतां हा दासीपुत्र मोठ्या शौर्यानें आपल्याजवळ येऊन नजराणे देतो याचा अर्थ काय ? हें त्याला समजेना. श्रेष्ठी या विचारांत गढून गेला असतां स्नानाची वेळ झाली, स्नानाच्यापूर्वी शौचविधीला जाण्याचा श्रेष्ठीचा परिपाठ असे. त्याप्रमाणें श्रेष्ठी आपल्या ठाण्याजवळच्या जंगलांत जाण्यास निघाला. त्यावेळीं कटाहकानें आपल्या लोकांना तेथेंच रहाण्यास सांगितलें, व तो उदकपात्र घेऊन, श्रेष्ठीच्या मागोमाग गेला. वाराणसींतील कुलपुत्र आपल्या पित्याची अनन्यभावें सेवा करीत असतात ही गोष्ट कटाहकाच्या सर्व नोकरांना माहीत असल्यामुळें त्यांना त्याच्या या कृत्यानें मुळींच आश्चर्य वाटलें नाहीं. श्रेष्ठी एकांत स्थानीं गेल्यावर कटाहकानें उदकपात्र खालीं ठेऊन त्याच्या पायावर एकदम उडी टाकली; आणि म्हणाला, ''महाराज मी जरी आपला दासीपुत्र आहें, तथापि आपल्या मुलासंगेंच माझें आपण पालन केलें आहे. मी केलेले सर्व अपराध क्षमा करून येथें मला मुलाच्या नात्यानें वागविल्यास माझ्यावर अत्यंत उपकार होईल. पण जर तुम्ही माझें कृत्य उघडकीस आणाल तर त्यापासून कोणाचाच फायदा न होतां बिचार्‍या माझ्या सासर्‍याच्या कुटुंबांत फारच गोंधळ उडून जाईल व त्यामुळें सर्वांना दुःख भोगावें लागेल.''
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel