मुलींना आईची ही मसलत पसंत पडली नाहीं. त्या म्हणाल्या, ''हा हंस जरी पक्षाच्या वंशांतला आहे तरी पूर्व जन्मींचा तो आमचा पिता आहे. त्यानें आमच्यावर अनंत उपकार केले आहेत, आणि आतां आम्ही त्याला क्रूरपणें कसें वागवावें ?''

आई म्हणाली, ''काय तरी वेड्या मुली आहेत. आम्हीं जर त्यांचीं पिसें एकदम उपटून घेतलीं, तर त्यांत क्रूरपणा कसला ? पशुपक्षादिक प्राण्याला मनुष्यासारख्या वेदना बाधत नसतात. घोड्याला किंवा बैलाला चाबकांनीं मारलें असतां मनुष्यासारखी त्याला इजा होत नसते. यांची जर आम्ही पिसें काढून घेतलीं तर थोडक्या अवधींत त्याला पुनः पिसें फुटतील. आम्ही सर्व पिसें काढून घेतल्याबद्दल त्याला वाईट मुळींच वाटणार नाहीं. दाणापाणी देऊन चांगलें संगोपन करूं म्हणजे झालें.''

परंतु मुलींचीं मनें आईच्या या उपदेशाला वळलीं नाहींत. त्यांनीं आपल्या पूर्वजन्मीच्या पित्याची यथायोग्य सेवा करण्याचा क्रम तसाच पुढें चालविला.

एके दिवशीं मुली बाहेर गेल्या होत्या. आई एकटीच घरांत होती. इतक्यांत हंस आला तेव्हां ती त्याला म्हणाली, ''पूर्वजन्मींचा आमचा निराळा संबंध असल्याकारणानें माझ्या मुलीसमोर तुम्हापाशीं बोलण्याला मला लाज वाटते. पण आज तुम्ही अशा संधीला आलांत हें फार चांगलें झालें. मला तुमचें अंग जरा चांचपडून पाहूं द्याना.''

हंस बिचारा रोजच्या जागेवरून खालीं येऊन बसला तेव्हां त्या कर्कश स्त्रीनें जवळ जाऊन त्याची मानगुटी धरली, व त्यांचीं सर्व पिसें लुबाडून घेतलीं. तो वेदनेनें व्याकूळ होऊन तेथेंच निचेष्टित पडला. या बाईनें तीं पिसें लपवून ठेविलीं. इतक्यांत मुली घरीं आल्या. त्यांनीं हंसाची ही दुर्दशा पाहून त्याला जवळ घेतलें, व म्हणाल्या, ''तुमची ही दुर्दशा कां झाली ?''

हंस म्हणाला ''तुमच्या आईला विचारा म्हणजे समजेल.''

आईला विचारलें तेव्हां सर्व गोष्ट कळून आली. पुढें पिसें तपासून पहातात तों एक सोडून बाकी सर्व साधीं होतीं. तीं पक्व न झाल्यामुळें सोन्याचीं बनलीं नव्हतीं. या आईच्या कृत्याबद्दल मुलींना किती वाईट वाटत असेल याची कल्पनाच केली पाहिजे. त्यांनीं त्या हंसाचें चांगलें संगोपन केलें; परंतु नवीन पिसें फुटून उडण्याचें सामर्थ्य आल्याबरोबर तो तेथून हिमालयावर गेला, आणि तेथेंच कायम राहिला. इकडे मुलींना आणि त्यांच्या आईला भांडवलावर हल्ला केल्याबद्दल अत्यंत दुःख झालें.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel