१०७. बोलण्यासारखें चालावें.

(सच्चजातक नं. ३२०)


वाराणसीच्या राजाची आपल्या वडील मुलावर अवकृपा झाल्यामुळें त्याला राज्यांतून घालवून देण्यांत आलें. तो आपल्या पत्‍नीसह सरहद्दीवरील एका गांवीं जाऊन राहिला. कांहीं काळानें त्याचा बाप मरण पावला तेव्हां प्रधानमंडळानें राज्य स्वीकारण्याविषयीं त्याला आमंत्रण केलें. भार्येसह वर्तमान वाराणसीला येत असतां वाटेंत एका टेंकडीकडे पाहून त्याची पत्‍नी त्याला म्हणाली, ''आर्यपुत्र, जर ही टेंकडी सोन्याची झाली तर तुम्ही मला काय द्याल ?'' राजपुत्र म्हणाला, ''तुला मी यांतील कांहीं एक देणार नाहीं. लोकहिताचीं पुष्कळ कामें करण्यासारखीं आहेत.''

त्याच्या पत्‍नीला या बोलण्याचा अत्यंत विषाद वाटला. पुढें वाराणसीला आल्यावर राजपुत्राला राज्याभिषेक करण्यांत आला. त्यानें आपल्या धर्मपत्‍नीला पट्टराणी केलें. महाराणीची पदवी मिळाली होती. तथापि, तिनें राजाजवळ कोणत्याहि उपभोग्य वस्तूची याचना केली नाहीं. राजा काल्पनिक लाभांतून कांहीं देण्याला तयार नाहीं तर मग खर्‍या संपत्तींतून तो काय देईल, असें वाटून आपली विनाकारण फजिती करून घेऊं नये म्हणून राणीनें असलेल्या स्थितींत आनंद मानला. आमचा बोधिसत्त्व त्या राजाचा एक अमात्य होता. महाराणीची ही दीनस्थिती पाहून तो तिला म्हणाला, ''राणीसाहेब आपल्या योग्यतेप्रमाणें आपला थाटमाट कां ठेवीत नाहीं ?''

राणी म्हणाली, ''बा पंडिता, तुला याचें इंगीत माहित नाहीं. राजेसाहेबाबरोबर मी येत असतां वाटेंतील टेंकडी सोन्याची झाली तर मला काय द्याल असा मी त्यांना प्रश्न केला. पण त्यांनीं ठोक जबाब दिला कीं, तुला त्यांपैकीं कांही एक मिळावयाचें नाहीं. ''वचने किं दरिद्रता'' या न्यायानें राजेसाहेबाकडून नुसता काल्पनिक त्यागदेखील घडला नाहीं, ''मग आतां त्यांच्याकडून खरा त्याग कसा घडेल ?''

बोधिसत्त्व म्हणाला, ''एके दिवशीं आपल्यासमक्ष महाराजापाशीं मी आपणाला कांहीं अधिक नेमणूक करून द्यावी अशी गोष्ट काढतों. त्यावेळीं आपण सोन्याच्या टेंकडीची गोष्ट सांगा.''

राणीला ही गोष्ट पसंत पडली. बोधिसत्त्वानें संधि साधून राजापाशीं राणीसाहेबाला त्यांच्या योग्यतेप्रमाणें योग्य नेमणूक करून देण्याची गोष्ट काढली. तेव्हां राणी म्हणाली, ''महाराजांनीं वाटेंत काल्पनिक सोन्याची टेंकडीदेखील मला देण्याचें नाकारलें; तर मग आतां त्यांच्या हातीं आलेल्या खर्‍याखुर्‍या वस्तूंतून ते मला काय देतील ?''

राजा म्हणाला, ''काल्पनिक असो वा खरें असो जें आपणाला देणे शक्य असेल तेवढेंच देण्याचें आपण अभिवचन दिलें पाहिजे. बोलण्यासारखें चालावें असा माझा बाणा आहे. ती टेंकडी सोन्याची झाली असती, तर तुला देतां आली असती काय ? जर नाहीं तर खुशाल घेऊन जा असें म्हणण्यांत काय अर्थ ?''

राणी म्हणाली, ''महाराज, आपण धन्य आहां, कां कीं, अत्यंत दरिद्रावस्थेंत सांपडला होतां तरीदेखील आपली सत्यनिष्ठा ढळली नाहीं. ''बोले तैसा चाले'' हा बाण आपण सोडला नाहीं.''

त्यावर बोधिसत्त्व म्हणाला, ''महाराणीसाहेब आपणाला खरी धर्मपत्‍नी असेंच म्हटलें पाहिजं, कां कीं, राजेसाहेब विपद्ग्रस्त झाले होते तरी तुम्ही त्यांस सोडलें नाहीं; आणि संपत्काळीं त्यांजपाशीं आपला बडेजाव वाढविण्याविषयी कधीं याचना केली नाहीं. असलेल्या स्थितींत संतोषानें वागून त्यांना आपण सर्वथैव सुखी करण्याचा प्रयत्‍न केला आहें. हें जाणून महाराजही आपली विचारल्यावांचून योग्य संभावना करतील अशी मला आशा आहे.''

बोधिसत्त्वाचें भाषण ऐकून राजानें राणीच्या सर्व उणीवा भरून काढल्या आणि तिनें विचारल्यावांचून तिचा योग्य आदरसत्कार व्हावा असा बंदोबस्त केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel