५४. फळ हातीं आल्यावाचून बोभाटा करूं नये.

(उभतोभट्ट जातक नं. १३९)

एका गांवीं एक कोळी रहात असे. तो जवळच्या नदींत गळ घालून मासे पकडून आपला निर्वाह करी. एके दिवशीं आपल्या मुलाला बरोबर घेऊन मासे धरण्यासाठीं तो नदीवर गेला. तेथें त्यानें एका डोहांत गळ टाकल्याबरोबर तो खालीं पाण्यांत कशाला तरी अडकला, व वर काढतां येईना. कोळ्याला वाटलें कीं, गळाला मोठा मासा लागला असावा. मासा हातीं येण्याची वाट न पहातां आपल्या मुलाला पाठवून आपणाला मोठा मांसा सांपडणार आहे ही बातमी त्यानें आपल्या बायकोला कळविली. ती मुलानें आणलेली बातमी ऐकून त्या बाईला फार आनंद झाला. परंतु एवढा मोठा मासा घरीं आणल्याबरोबरच शेजारीपाजारी त्याचा वाटा मागतील ही गोष्ट तिला मुळींच आवडली नाहीं. कांहीं तरी युक्ति योजून ताबडतोब शेजार्‍या पाजार्‍याशीं भांडण उकरून काढणें तिला इष्ट वाटलें, व त्याप्रमाणें एक ताडपत्र नेसून एका डोळ्यांत काजळ घालून व कुत्र्याला कडेवर घेंऊन ती आपल्या शेजारच्या घरीं गेली.

शेजारीणबाई म्हणाली, ''कायग बाई, लुगड्यावरून हें ताडपत्र काय नेसली आहेस ! आणि कुत्र्याला कडेवर घेऊन या विचित्र वेषानें काय हिंडत आहेस ? तुला वेड तर लागलें नाहीं ना ? तेव्हां ती चवताळून जाऊन व शिव्यांची लाखोली वाहून शेजारीणबाईला म्हणाली, ''थांबा, मला वेडी म्हटल्याबद्दल तुझ्यावर मी फिर्याद लावतें.'' दुसर्‍या कांहीं बायाहि तेथें जमल्या व त्या सर्वानीं आपणास वेडें म्हटल्याबद्दल कोळ्याच्या बायकानें गांवच्या वहिवाटदारापाशीं फिर्याद नेली.

इकडे माशाला वर ओढतां येईना म्हणून आपलें धोतर व पांघरूण नदीच्या कांठावर ठेऊन कोळ्यानें केवळ लंगोटी नेसन डोहांत उडी टाकली, व गळाच्या दोरीला धरून माशाचा थांग लावण्यासाठीं तळाला बुडी मारली. तो गळ डोहांत बुडलेल्या एका झाडाच्या बुंध्याला जाऊन अडकला होता. कोळी मासा समजून त्याला मिठी मारण्यास गेला, तों त्या बुंध्याचें एक मूळ त्याच्या डोळ्यांत शिरून डोळा साफ फुटला. त्या वेदनेनें तळमळत कोळी काठावर आला आणि पहातो तों धोतर कोणीतरी चोरानें लांबवलेलें ! आतां दुसरा कांही उपाय नाहीं असें जाणून एका हातानें आपला डोळा दाबून त्यानें तेथून घरचा रस्ता सुधारला. घरीं बायको दिसेना. मुलाला विचारलें असतां ती शेजार्‍यावर फिर्याद करण्यासाठीं गांवच्या वहिवाटदाराच्या कचेरींत गेली आहे असें समजलें. तेव्हां डोळ्याला पट्टी बांधून व दुसरें जुनेंपुराणें धोतर नेसून तो कचेरीकडे धांवला. तेथे खटल्याचा निकाल होऊन याच्या बायकोलाच गुन्हेगार ठरविण्यांत आले होतें, व दंडाची रक्कम दिल्यावाचून चौकीवरून तिला सोडूं नये असा वहिवाटदारानें हुकूम फर्माविला होता.

आमचा बोधिसत्त्व त्या कालीं त्या गांवांत वृक्षदेवता होऊन रहात असे. हें सर्व प्रकरण पाहून तो त्या कोळ्याला म्हणाला, ''बाबारे, वस्तु हातीं आल्याशिवाय बोभाटा केल्याचें हें फळ आहे. तुझा पाण्यांतला प्रयत्‍न फसला आहे; व जमिनीवर आल्यावर तुझ्या बोभाट्यानें काय परिणाम घडून आला हें तुला दिसून येतच आहे.* तुझ्या या उदाहरणानें वस्तु हातीं आल्याशिवाय बोभाटा न करण्याचा धडा लोकांनीं शिकला पाहिजे.''
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मुळ गाथा --
अक्खी भिन्नो पटो नट्ठो सखिगेहेच भंडनं।
उभतो पदुट्ठो कम्मन्तो उदकम्हि थलम्हिच ॥
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel