आपल्या स्वत:च्या देशाच्या बाबतीत तर आपले कितीतरी व्यक्तिगत संबंध आलेले असतात, आणि या संबंधांमुळे अनेक चित्रे डोळ्यांसमोर उभी राहतात; किंवा या सर्व संबंधांतून आपल्या देशबांधवांसंबंधीचे संयुक्त असे एक चित्र मनात तयार होते.  मी माझ्या मनाची चित्रशाळा अशा चित्रांनी भरून टाकिली आहे.  या चित्रशाळेत काही अगदी जिवंत प्राणमय अशी संपूर्ण चित्रे आहेत.  ती चित्रे माझ्याकडे बघत आहेत असे वाटते.  जीवनातील काही परमोच्च शिखरांची स्मृती ती चित्रे मला करून देतात. असे असूनही जणू ही स्मृती फार पूर्वीची असे वाटते.  दुसरीही काही लहानमोठी चित्रे आहेत. त्यांच्याही भोवती अनेक स्मृती गुंफलेल्या आहेत.  जीवनाला माधुरी आणणार्‍या स्नेहाच्या व खांद्याला खांदा लावून एका पक्षातर्फे लढताना झालेल्या ओळखीच्या स्मृती तेथे विणलेल्या आहेत, आणि या चित्रशाळेत बहुजनसमाजाची, हिंदी जनतेची, स्त्री-पुरुषांची, मुलांची हजारो चित्रे गर्दी करून उभी आहेत.  ही सारी अफाट जनता एकत्र येऊन माझ्याकडे बघते आहे, आणि त्यांच्या त्या सहस्त्रावधी नेत्रांच्या पाठीमागे गहन गूढ काय आहे हे सारे माझ्या मनाच्या चित्रशाळेत आहे.

मी जी ही भारतीय कथा लिहिणार आहे, तिचा आरंभ एका वैयक्तिक प्रकरणाने मी करणार आहे.  माझ्या आत्मचरित्राचा शेवटचा भाग लिहिल्यानंतर जो महिना गेला त्या काळात माझ्या मनाची काय स्थिती होती ते या प्रकारणाने कळून येईल.  परंतु मी ही दुसरी आत्मकथा लिहितो आहे असे नाही.  अर्थात माझ्या लिहिण्यात पुष्कळदा व्यक्तिगत स्वत:संबंधी असे येणार, त्याला माझा निरूपाय आहे.

दुसरे महायुध्द चालूच आहे.  सारे जग भयंकर उद्योगात या भीषण खाईत जळत असता मी या अहमदनगरच्या किल्ल्यात निरूपायाने पडून आहे.  बळजबरीने, सक्तीने मला निष्क्रिय बनविण्यात आले आहे.  कधी कधी मी चिडतो, चरफडतो, आदळआपट करतो. गेली कितीतरी वर्षे कितीतरी मोठमोठी स्वप्ने, मोठमोठ्या गोष्टी, साहसांचे शूर विचार माझ्या मनात मी खेळवीत आलो.  त्या सर्वांचा विचार मनात येतो नि या कोंडीचा संताप येतो.  आपण पंचमहाभूतांच्या एखाद्या भयंकर उत्पाताकडे ज्याप्रमाणे तटस्थपणे बघतो, त्याप्रमाणे मी या युध्दाकडे त्रयस्थाच्या दृष्टीने पाहण्याचा प्रयत्न करितो.  निसर्गाचा कोप व्हावा, प्रचंड भूकंप व्हावा, मोठे पूर यावेत, त्या वेळेस जशी तटस्थ दृष्टी असते तशी या युध्दाच्या बाबतीत मी घेऊ इच्छितो; परंतु मला यश येत नाही.  तथापी द्वेष, प्रक्षोभ, अत्यंत मन:संताप यांपासून जर मला स्वत:ला वाचवायचे असेल तर ही दृष्टी घेण्याचा प्रयत्न करण्यावाचून गत्यंतर नाही.  मनुष्याच्या रानटी नि संहारक स्वरूपाच्या या प्रचंड आक्राळविक्राळ आविष्कारासमोर माझे स्वत:चे मनस्ताप, माझा हा जीव कोठल्या कोठे पार विरून जातात.

१९४२ च्या ऑगस्टच्या आठ तारखेस सायंकाळी गांधीजींनी जे गंभीर शब्द उच्चारले त्यांचे मला स्मरण होते. ''जगाच्या डोळ्यात आज घटकेला खून चढला असला तरी आपण शान्त व निर्मळ दृष्टीने जगाच्या डोळ्याला डोळा भिडविला पाहिजे.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel