प्राचीन भारतीय रंगभूमी

युरोपियनांना प्राचीन भारतीय नाटकांचा शोध लागताच लगेच हे सारे ग्रीक लोकांपासून हिंदी लोकांनी घेतले असले पाहिजे; निदान ह्या भारतीय नाट्यकलेवर ग्रीक नाट्यकलेचा फार प्रभाव पडला आहे, असे मत प्रतिपादण्यात येऊ लागले.  हे मत प्रथम प्रथम थोडे सत्यही वाटे, कारण ग्रीक नाटकांच्या पूर्वीची नाटके अस्तित्वात असलेली उपलब्ध नव्हती आणि अलेक्झांडरच्या स्वारीनंतर भारताच्या सीमेवर ग्रीक राज्ये अस्तित्वात आली होती.  ही राज्ये अनेक शतके चालली होती व तेथे ग्रीक नाटकांचे प्रयोग होत असणारच.  एकोणिसाव्या शतकात या प्रश्नावर युरोपियन पंडित बारीक निरीक्षण करून चर्चा करीत होते.  परंतु आज सर्वजण कबूल करतात की भारतीय रंगभूमी स्वतंत्र आहे, भारतीय नाट्यशास्त्र यांच्या मूळ कल्पना, त्यातील नियम, या कलेचा विकास हे सारे अस्सल भारतीय आहे.  ॠग्वेदातील काही संवादात्मक सूत्रे म्हणजे नाटकातील असावेत असे वाटते, व भारतीय नाट्यकलेचा उगम शोधू पाहता तेथपर्यंत पत्ता लागतो.  रामायण-महाभारतातून नाटकांचे उल्लेख आहेत.  कृष्णाभोवती ज्या दंतकथा आणि आख्यायिका गोळा झाल्या त्यांतून जी गीते, जी नृत्ये, जे संगीत निर्माण होऊ लागले, त्यामुळे नाटकांना नीट स्वरूप येऊ लागले असावे.  ख्रिस्त शकापूर्वी सहाव्या शतकात होऊन गेलेला मोठा व्याकरणकार पाणिनी नाटकांच्या काही प्रकारांचा उल्लेख करताना आढळतो.

रंगभूमी व नाट्यकलेवरचे 'नाट्यशास्त्र' हे इसवी सनाच्या तिसर्‍या शतकातील असावे असे म्हणतात.  परंतु ज्यांच्या आधारावर हे नाट्यशास्त्र रचिले गेले, असे कितीतरी या विषयावरचे, नाट्यकलेचा परिपूर्ण विकास झाल्यावरच आणि जनतेत वारंवार नाट्यप्रयोग होत असल्यावरच असा शास्त्रीय ग्रंथ होणे शक्य आहे.  म्हणून या नाट्यशास्त्र ग्रंथाच्या पूर्वी पुष्कळ अशा प्रकारचे वाङ्मय झाले असले पाहिजे.  आणि शेकडो वर्षे ही कला व हे शास्त्र यांची हळूहळू वाढ होत आली असली पाहिजे.  अलीकडे नागपूर प्रांतामध्ये रामगड टेकड्यांजवळ उत्खननात प्राचीन नाट्यगृह सापडले आहे.  हे नाटकमंदिर ख्रिस्तपूर्व दुसर्‍या शतकातील आहे असे म्हणतात आणि विशेष हे की, नाट्यशास्त्रातील नियमांप्रमाणे हे नाटकमंदिर बांधलेले आहे.  त्यातील वर्णनाशी हे नीट जुळते.

संस्कृत नाट्यकला ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात नीट दृढमूल झालेली होती असे आता सर्वमान्य झाले आहे.  काही विद्वान पाचव्या शतकापर्यंत मागे हा काळ नेतात.  जी नाटके आज उपलब्ध आहेत, त्या सर्वांमध्ये त्या पूर्वीच्या नाटकांचा आणि नाटककरांचा उल्लेख येतो.  परंतु ती नाटके अद्याप तरी उपलब्ध नाहीत.  अशा अनुपलब्ध नाटककरांपैकी भास कवी हा एक होता.  त्याच्या पाठीमागून येणार्‍या अनेक नाटककरांनी त्याची फार स्तुती केलेली आहे.  कर्मधर्मसंयोगाने या शतकाच्या आरंभी भासाची तेरा नाटके एकदम उपलब्ध झाली.  आतापर्यंत अत्यंत प्राचीन असे नाटकग्रंथ अश्वघोषाचे सापडले आहेत.  ख्रिस्त शकापूर्वी पहिल्या शतकात किंवा ख्रिस्तोत्तर पाहिल्या शतकात अश्वघोष झाला असावा.  त्याचे नाटकग्रंथही संपूर्ण मिळाले नाहीत.  ताडपत्रावर लिहिलेले काही अवशेष सापडले आहेत.  ते गोबीच्या वाळवंटाच्या सीमेवरील तुर्फान गावी, कोठच्या कोठे सापडले हे एक आश्चर्यच आहे.  अश्वघोष बौध्दधर्मी संत होता.  त्याने बुध्दचरितही लिहिले आहे.  हा चरित्रात्मक काव्यग्रंथ हिंदुस्थान, चीन, तिबेट सर्वत्र लोकप्रिय होता.  या ग्रंथाचे चिनी भाषेतील भाषांतर एका हिंदी पंडितानेच प्राचीन काळी केले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel