सारांश, हिंदुस्थान हेच साम्राज्य; हिंदुस्थान ताब्यात ठेवले, तेथे लुटमार चालवी, म्हणून इंग्लंड देशाला एवढे वैभव, असे सामर्थ्य लाभले व इंग्लंड मोठे बलाढ्य राष्ट्र बनले.  एका मोठ्या साम्राज्याचा प्रमुख, त्याचा धनी, याव्यतिरिक्त इंगलंड देशाचे दुसरे कोणतेही चित्र मि. चर्चिल यांना आपल्या मनश्चक्षूंपुढे आणता येणे शक्य नव्हते, म्हणून त्यांना हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याची कल्पना करवतच नव्हती.  आम्हाला भुलविण्यापुरते, आमचे हात त्याला सहज पोचता येण्याजोगे आहेत असे दाखवीत, जे साम्राज्यांतर्गत स्वराज्य इतके दिवस आमच्या दृष्टीपुढे खेळवले, ते म्हणज नुसत्या शब्दांची सृष्टी, नसत्या शोभेपुरता संभार आहे, खरे स्वातंत्र्य किंवा सत्ता या साम्राज्यांतर्गत स्वराज्यात काडीचीही नाही, असा हा खुलासा झाला.  या शोभेच्याचशा काय, पण खर्‍या पूर्ण साम्राज्यांतर्गत स्वराज्यालाही आम्ही नकार दिला होता, आम्हाला पूर्ण स्वातंत्र्य पाहिजे होते.  खरोखरच आम्ही व चर्चिल यांच्या दरम्यान साता समुद्रांचे अंतर पडले होते.

आम्हाला चर्चिलसाहेबांचे हे सारे वक्तृत्व आठवत होते.  ते मोठे खंबीर व हटवादी आहेत हे आम्हाला माहीत होते.  तेव्हा ते पुढारी असताना इंग्लंडकडून काही मिळेल या आशेत काही अर्थ नव्हता.  ते कितीही धीराचे असले, नेत्याचे उच्च गुण त्यांच्यात कितीही असले, तरी इंग्लंडातल्या एकोणिसाव्या शतकातल्या पुराणप्रिय साम्राज्यवादी पक्षाचे ते प्रतिनिधी होते व या नव्या जागतल्या संकटांची, त्यात वावरणार्‍या शक्तिप्रवाहांची कल्पनासुध्दा त्यांच्या बुध्दीला अगम्य आहे असे वाटे, मग भविष्यकाळातली घटना जी प्रस्तुत काळी साकार होऊ पाहात होती ती तर दूरच राहीली.  पण हे सारे काही असले तरी एकंदरीत ही व्यक्ती महान होती, मनात आणलेतर मोठी उडी घालण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी होते.  संकट अगदी प्राणावर येऊन बेतले तेव्हा का होईना, पण तेव्हा तरी त्यांनी फ्रान्स व इंग्लंड मिळून एकच देश करून टाकू अशी सूचना फ्रान्स देशाला केली त्यावरून ह्यांची दृष्टी विशाल आहे, प्रसंगच आला तर आपली वृत्ती आमूलाग्र बदलून नवी करण्याची ह्यांना कुवत आहे असे दिसून आले होते, व त्यामुळे त्यांच्याबद्दलचे हिंदुस्थानातील लोकांचे मत पुष्कळ पालटले होते.  ज्या नव्या अधिकारपदाचे काम त्यांच्याकडे आले होते व त्यामुळे जोखमीचे जे मोठे ओझे त्यांच्या शिरावर चढले होते त्याचा परिणाम होऊन कदाचित त्यांची दृष्टी अधिक दूरवरचे पाहू लागली असेल, पूर्वग्रह, पूर्वीची मते त्यांनी मागे टाकली असतील असाही संभव होता.  अपरिहार्य म्हणूनच नव्हे, तर ज्या युध्दाकरता वाटेल ते करायला त्यांची तयारी होती त्या युध्दाला आलेल्या रागरंगामुळे त्या युध्दात फार उपयोग होईल म्हणून तरी हिंदुस्थानला स्वातंत्र्य द्यावे हे चांगले, असे त्यांना पटणे प्राप्तच आहे असाही विचार मनात येई.  मला असेही आठवले की, १९३९ ऑगस्टमध्ये मी चीनमध्ये जायला निघालो तेव्हा आम्हा दोघांचाही एक मित्र होता त्याच्यामार्फत, ''त्या युध्दग्रस्त देशाला तुम्ही भेट देता आहा, त्या भेटीत तुम्हाला यश लाभो'' असा निरोप पाठविला होता.

असा सारा रागरंग असल्यामुळे, आम्ही आमच्या सूचना मांडल्या तेव्हा आम्ही फारशी आशा धरली नसली तरी आशा अगदी सोडलीही नव्हती.  ब्रिटिश सरकारकडून उत्तर ताबडतोब आले.  त्यांनी आमच्या सूचना पार धुडकावून लावल्या, एवढेच नव्हे तर त्यांनी भाषा अशी काही वापरली होती की, हिंदुस्थानातली आपली सत्ता तिळमात्रही सोडण्याचा त्यांचा मुळीच विचार नाही अशी आमची खात्री झाली; उलट, हिंदुस्थानातील लोकांत दुही माजवावी, मध्ययुगीन सत्ताधारी व प्रतिगामी गटांना फूस देऊन चढवून ठेवावे असा त्यांचा कसून प्रयत्न चालला होता.  आपली साम्राज्यशाही सत्ता सोडण्यापेक्षा हिंदुस्थानात यादवी माजून हिंदुस्थानचे वाटोळे झालेले पत्करले, अशी त्यांची वृत्ती दिसली.

नेहमीचीच म्हणून ही असली त्यांची वागणूक आमच्या अंगवळणी पडलेली असली तरी आम्हाला या उत्तराच्या प्रकारामुळे मोठा धक्का बसला व निराशेमुळे आमची वृत्ती बेफाम होऊ लागली.  मला आठवते की, तेव्हा मी एक लेख त्या सुमारास लिहिला होता त्याचा मथळा ''वाटा फुटून वेगळ्या झाल्या''.  मी फार काळापासून पूर्ण स्वातंत्र्याचा पुरस्कार करीत आलो होतो, कारण दुसर्‍या कोणत्याही प्रकाराने देशाची प्रगती करणे, राष्ट्राची वाढ करणे शक्य नाही अशी मला खात्री होती.  संपूर्ण स्वातंत्र्य असल्याखेरीज इंग्लंड देशाशी चारचौघांसारखी मैत्री ठेवणे, सहकार्य करणे आम्हाला शक्यय नाही असे पक्के वाटत होते.  तरीसुध्दा इंग्लंडशी आपल्या देशाचे संबंध कधी काळी तरी मैत्रीचे राहतील अशी आशा मनाला वाटेच.  ह्या उत्तराच्या प्रकाराने मला एकदम असे वाटू लागले की इंग्लंडची वृत्ती आमूलाग्र पालटली नाही तर यापुढे त्यांची आमची वाट एकच राहणे शक्य नाही.  आमच्या वाटा फूटून वेगळ्या होणे प्राप्त आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel