पण देशावर स्वारी झाल्यावर देशावर कोसळू घातलेला अनर्थ नुसते पाहात काही एक न करता स्वस्थ बसणे आम्हाला शक्य नव्हते.  देशभर ही सारी नि:शस्त्र प्रजा अफाट पसरली होती.  त्यांनी परचक्र आलो म्हणजे काय करावे याचे त्यांना मार्गदर्शन करणे आम्हाला प्राप्त होते.  आम्ही त्यांना सांगितले की, ''ब्रिटिशांच्या राजनीतीचा तुम्हाला कितीही उद्वेग आला असला तरी ब्रिटिशांच्या किंवा त्यांच्या दोस्तांच्या सैन्याच्या कार्यात काहीही व्यत्यय आणू नका, कारण त्यामुळे अप्रत्यक्षपणे शत्रूलाच मदत केली जाईल.  काहीही झाले तरी शत्रूला शरण जाऊ नका, त्यांचे हुकूम पाळू नका, तुमच्यावर उपकार म्हणून ते काही करतील तर ते करून घेऊ नका.  शत्रूचे सैन्य तुमच्या शेतींचा व घरादारांचा ताबा घेऊ लागले तर त्यांना मुकाट्याने ताबा देऊ नका, त्यापायी तुमच्या प्राणावर संकट आले तरी प्रतिकार चालवा.  हा प्रतिकार शांततामय मार्गांनी करा, शत्रूशी पूर्णपणे असहकार करून त्यांचा प्रतिकार करा.''

जनतेला आम्ही केलेल्या ह्या सूचनांची पुष्कळ लोकांनी मोठ्या छद्मीपणाने थट्टा चालविली, कारण त्यांच्या मते चालून आलेल्या शत्रुसैन्याचा प्रतिकार ह्या असल्या अहिंसात्मक असहकारितेच्या मार्गांनी करणे म्हणजे शुध्द वेडगळपणा होय.  पण हा मार्ग वेडगळपणाचा मुळीच नव्हता, जनतेला प्रतिकाराचा हाच काय तो मार्ग मोकळा होता, आणि तो शूरांचा मार्ग आहे.  हा उपदेश आम्ही आमच्या सैन्याला करीत नव्हतो, सशस्त्र प्रतिकार करता येण्याजोगा असणार्‍यांनाही पर्याय म्हणून नि:शस्त्र प्रतिकार सांगत नव्हतो.  हा उपदेश आम्ही सैन्याखेरीजच्या नि:शस्त्र प्रजेला करीत होतो, कारण सैन्याचा पराभव झाला किंवा सैन्याने माघार घेतल्याने देश उघडा पडला की तेथील प्रजाजन बहुधा मुकाट्याने शत्रूला शरण जातात.  युध्दाचे शिक्षण देऊन तयार केलेले व युध्दाची सामग्री व आयुधे जवळ असलेले व्यवस्थित सैन्य आपल्याजवळ नसले तरी ठिकठिकाणी किरकोळ टोळ्यांची पध्दतशीर उभारणी करून गनिमी कावा चालवून शत्रूला उपद्रव देता येतो हे खरे आहे.  पण ते आम्हाला शक्य नव्हते.  कारण त्याला सुध्दा काही शिक्षण लागते, हत्यारे लागतात, व नेहमीच्या सैन्याचे सहकार्य लागते.  त्यातून काही ठिकाणी अशा टोळ्या उभ्या करता आल्या असत्या तरी बाकीच्या सार्‍या लोकांचा प्रश्न राहिलाच असता.  अपवार सोडून दिले तर साधारण नेहमी अपेक्षा अशी की, देशातील सामान्य प्रजेला शत्रूला शरण जावे लागते व शत्रूच्या अमलाखाली निमूटपणे वागावे लागते.  हिंदुस्थानातील काही भागांतून जेथे शत्रूचा हल्ला येण्याचा संभव होता तेथील सामान्य प्रजेलाच नव्हे, तर किरकोळ सरकारी अधिकार्‍यांनासुध्दा, आपले सैन्य व वरिष्ठ अधिकारी माघार घेऊन तेथून निघून गेल्यास शत्रूचा अंमल चालू द्या, प्रतिकार करू नका अशी ताकीद तेथील ब्रिटिश अधिकार्‍यांनी खरोखरच देऊन ठेवली होती असे प्रसिध्द झाले होते.

चालून आलेल्या शत्रुसैन्याला, त्यांच्याशी अहिंसात्मक असहकारिता करून अडवून थोपविणे शक्य नाही हे आम्हाला अगदी चांगले कळत होते.  सामान्य प्रजेच्या कितीही मनात असले तरी त्यांच्यापैकी बहुतेक जणांना तसे करणे फार अवघड आहे हेही आम्हाला कळत होते.  परंतु आम्हाला अशी आशा होती की, शत्रूंनी व्यापलेल्या शहरातून व खेड्यांतून काही काही प्रमुख व्यक्ती शत्रूंचे राज्य निमूटपणे मान्य करनू शत्रू सांगेल ते काम पार पाडण्याचे, शत्रूला दाणागोटा मिळवून देण्यात किंवा दुसर्‍या तसल्या कामात शत्रूला मदत करण्याचे साफ नाकारतील.  अर्थात जे कोणी असा नकार देतील त्यांना ताबडतोब त्याचे प्रायश्चित्त भोगावे लागले असते, बहुधा मृत्यूचीच शिक्षा झाली असती व शत्रूने त्यांच्या ह्या नकारचा सूड उगविला असता.  आमची अशी अपेक्षा होती की, जरी अगदी मोजक्या लोकांनी शत्रूला शरण न जाता मरण पत्करले तरी तेवढ्या थोड्या लोकांच्यामुळे सुध्दा, त्यांच्या त्यांच्या टापूतच नव्हे तर सबंध देशभर, सामान्य जनतेच्या मनावर त्याचा फार परिणाम होईल.  हा शत्रू म्हणजे आपल्या राष्ट्राचा शत्रू आहे अशी भावना अशा तर्‍हेने सार्‍या देशभर वाढविता येईल अशी आम्हाला आशा वाटत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel