''त्या काळात इंग्रजांशीच आमचा प्रथम संबंध आला आणि विशाल जगाचे जे काही ज्ञान आम्हांस येई ते तत्कालीन इंग्रजांच्या इतिहासाशी जोडले गेले.  हिंदी किनार्‍यावर हे जे नवीन लोक आले त्यांच्यासंबंधीच्या कल्पना, त्यांच्या बलशाली, भव्य वाङ्मयावरून आम्ही बसविल्या.  त्या काळात आम्हांला जे शिक्षण मिळे ते विपुल असे, विविध नसे किंवा शास्त्रीय जिज्ञासा वाढीस लागेल असेही त्यात काही नसे.  अशा मर्यादितपणामुळे त्या काळातील सुशिक्षित लोक इंग्रजी भाषा व इंग्रजी वाङ्मय याकडे वळत.  बर्कची भावनोत्कट भाषणे, मेकॉलेची गडगडाट करणारी दीर्घ वाक्ये यांनीच आमचे वातावरण अहोरात्र दुमदुमत होते.  शेक्सपिअरची नाटके, बायरनची काव्ये यावरच चर्चा चाले आणि एकोणिसाव्या शतकातील ब्रिटिश राजकारणातील उदारमतवाद हा तर चर्चेचा प्राण असे.

''आपले राष्ट्रीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी तात्पुरते प्रयत्न जरी सुरू होते, तरी ब्रिटिशांच्या उदारपणावरची आमची श्रध्दा मनातून पार नाहीशी झाली नव्हती.  आमच्या पुढार्‍यांच्या मनोवृत्तीत ही श्रध्दा इतकी खोल जाऊन बसलेली होती की, त्यांना खरोखर वाटे की, जित लोकांच्या स्वातंत्र्याचा मार्ग जेते आपण होऊन उदारपणाने खुला करतील.  ह्या श्रध्देला आधार प्रत्यक्ष घडलेल्या घटनेचा होता, ती ही की ज्या ज्या देशभक्तांना स्वत:च्या देशातील छळवादापासून बचावण्यासाठी बाहेर पडावे लागते, त्या सर्वांना इंग्लंडमध्ये आश्रय मिळे.  पुढार्‍यांच्या इंग्रजांवरील श्रध्देचे बीज या गोष्टीत होते.  स्वत:च्या राष्ट्राच्या स्वाभिमानार्थ हालअपेष्टा भोगणार्‍या राजकीय हुतात्म्यांना इंग्लंडने आपल्या देशात घेतले; मनापासून इंग्रजांनी त्यांचे स्वागत केले.  इंग्रजांच्या स्वभावातील या उदार माणुसकीमुळे माझ्या मनावर अपार परिणाम होऊन, परम आदराने मी त्यांना देव्हार्‍यात बसविले.  त्यांच्या राष्ट्रीय स्वभावातील ही उदारता साम्राज्यशाही अभिमानाने व गर्वाने अद्याप दूषित झालेली नव्हती.  इंग्लंडमध्ये माझ्या लहानपणी मी जॉन ब्राईटची भाषणे पार्लमेंटात व पार्लमेंटच्या बाहेर ऐकली होती.  त्या भाषणांमधून विशाल दृष्टीची मूलगामी उदारमतवाद संकुचित राष्ट्रीयतेच्या मर्यादा ओलांडून उचंबळून वहात आहे असे वाटे.  त्या भाषणांचा माझ्या मनावर इतका परिणाम झाला होता की, आजच्या या निष्ठुर भ्रमनिरासाच्या काळीही जॉन ब्राईटचे शब्द माझ्या कानात अद्याप घोटाळत आहेत.

''राज्यकर्त्यांच्या औदार्यावर दीनपणे विसंबून राहणे हे लाजिरवाणे तर खरेच.  ती काही अभिमान मानण्यासारखी गोष्ट नाही.  परंतु मानव्याची उदात्तता परकीयांत आढळली तरी सुध्दा ती मानावयाला तयार असलेला आमचा मनमोकळेपणाही लक्षात घेण्याजोगा आहे.  मानवतेला लाभलेल्या उत्कृष्ट आणि परमोच्च देणग्यांचा मक्ता एखाद्या विशिष्ट देशाला किंवा जातीलाच नसतो.  त्यांचे क्षेत्र मर्यादित नसते.  या देणग्या एखाद्या कृपणाच्या ठेव्याप्रमाणे कुठेतरी लपवून ठेवलेल्या आहेत असेही समजण्याचे कारण नाही आणि म्हणूनच ज्या इंग्रजी वाङ्मयाने मागे आमच्या मनोबुध्दीला खाद्य मिळाले, स्फूर्ती मिळाली त्याचा आजही हृदयाच्या खोल गाभार्‍यात गंभीर प्रतिध्वनी निर्माण झाल्याशिवाय राहात नाही.''

यानंतर रवीन्द्रनाथांनी भारतीयांच्या परंपरागत सदाचाराच्या ध्येयासंबंधी विवेचन केले आहे.  ते म्हणतात, ''सदाचाराचे हे परंपरागत सामाजिक संकेत मुळातच संकुचित वृत्तीचे आहेत.  त्यांचा उगम सरस्वती व दृशद्वती ह्या दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या चिंचोळ्या ब्रह्मावर्तात झाला व भौगोलिक मर्यादांमुळे लहान पडलेल्या त्या प्रदेशात त्यांचा उपयोगही चांगला झाला.  परंतु त्यामुळे पुढे स्वतंत्र विचारशक्तीवर दांभिक कर्मकांडाचा शिरजोरपणा वाढला व मनूने जी सदाचाराची कल्पना ब्रह्मावर्तात रूढ झालेली म्हणून स्वीकारली होती तिची सारखी अधोगती होताहोता तिचे पर्यवसान सामाजिक शिरजोरपणात झाले.

''इंग्रजी विद्येवर वाढलेल्या बंगाली सुसंस्कृत सुशिक्षितांची मनोरचना अशी झाली होती की, माझ्या लहानपणी या कडक सामाजिक निर्बंधांविरुध्द बंड करण्याचे वारे त्यांच्यात संचारले होते; आणि या परंपरागत ठरीव आचारमार्गाऐवजी 'इंग्रजी' या शब्दाने बोध होणार्‍या संस्कृतीचे ध्येय आम्ही स्वीकारले होते.

''या वृत्तीत जो बुध्दिस्वातंत्र्याचा व नीतीचा आवेश होता त्यामुळे आमच्या कुटुंबातल्या लोकांना ही वृत्ती पटली व त्यामुळे आमच्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत या नवीन वृत्तीचा प्रभाव पडू लागला होता.  अशा वातावरणात माझा जन्म झाला आणि उपजतच वाङ्मयाकडे आमची प्रवृत्ती असल्यामुळे इंग्रजी वाङ्मयाला माझ्या हृदयसिंहासनावर मी बसविले.  माझ्या जीवनग्रंथाचे पहिले अध्याय अशा प्रकारे चालले.  परंतु संस्कृतीची ही परमोच्च तत्त्वे स्वीकारणारे लोकही स्वत:च्या राष्ट्राच्या फायद्याचा प्रश्न आला म्हणजे किती दिक्कत न ठेवता सहज ती सत्ये सोडतात हे जसजसे अधिकाधिक मला स्पष्ट दिसून येऊ लागले, तसतसे ते सारे आशेचे व श्रध्देचे मृगजळ विरून गेले व त्या वृत्तीपासून मी दुरावलो.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel