बंगालमध्ये जुने हिंदु-मुसलमान सरंजामदारी वर्ग नष्ट करायला या धोरणामुळे मदतच झाली आणि या वर्गावर अवलंबून असणारे वर्गही देशोधडीला लागले.  हिंदूंपेक्षा मुसलमानांवर याचा अधिक परिणाम झाला.  कारण ते हिंदूंपेक्षा अधिक सरंजामशाही वृत्तीचे होते.  या मुनाफी जमिनींचा अधिक फायदा त्यांनाच मिळे.  हिंदूंमध्ये मध्यम वर्गाचे लोक, अधिक होते व उद्योगधंदा, व्यापारउदीम, इतर धंदे यांत ते गुंतलेले होते.  हे लोक नवीन परिस्थितीशी अधिक जुळवून घेणारे होते.  त्यांनी ताबडतोब इंग्रजी शिक्षणाकडे डोळे वळविले.  ब्रिटिशांनाही दुय्यम दर्जाच्या नोकरीचाकरीसाठी असे लोक हवेच होते.  मुसलमान इंग्रजी शिक्षणापासून दूर राहिले आणि ब्रिटिश यांच्याकडे जरा वाकड्या नजरेनेच बघत, कारण सत्ताधारी लोकांपैकी हे असल्यामुळे हे कटकटी निर्माण करतील असे ब्रिटिशांना वाटे.  त्यामुळे दुय्यम दर्जाच्या नोकरी-चाकरीची बंगाली हिंदूंना जणू वतनदारीच मिळाली, आणि उत्तर हिंदुस्थानभर ते पाठविण्यात येऊ लागले.  जुन्या खानदानी कुटुंबातील काही मूठभर मुसलमान पुढे या नोकर्‍या-चाकर्‍यांतून घेतले गेले.

इंग्रजी शिक्षणामुळे हिंदी क्षितिज अधिक विशाल व विस्तृत झाले.  इंग्रजी वाङ्मय, इंग्रजी संस्था यांच्याविषयी आदर वाटू लागला, कौतुक वाटू लागले; हिंदी जीवनातील काही चालीरीतींविषयी तिटकारा वाटू लागला, काही पध्दतीविरुध्द बंडखोरी वाढू लागली; तसेच राजकीय सुधारणांसाठी वाढती मागणी करण्यात येऊ लागली.  नवीन पांढरपेशा वर्गानी राजकीय चळवळीत पुढारीपण घेतले.  सरकारकडे शिष्टमंडळे पाठविणे हेच या चळवळीचे मुख्य स्वरूप असे.  पांढरपेशे आणि नोकरीचाकरी करणारे अशा नवसुशिक्षितांचा एक नवीन वर्गच जन्माला आला आणि तो सर्व हिंदुस्थानभर वाढत होता.  पाश्चिमात्य विचार आणि पध्दती यांचा या वर्गावर परिणाम झालेला होता.  बहुजनसमाजापासून हा वर्ग अलग होता.  १८५२ मध्ये कलकत्त्यास ब्रिटिश इंडियन असोसिएशन स्थापण्यात आले.  हिंदी राष्ट्रीय सभेच्या पूर्वीची ही संस्था होती.  परंतु १८८५ मध्ये राष्ट्रीय सभा स्थापन होईपर्यंत मध्यंतर एक पिढीचा अवकाश लागला.  हा जो मध्यंतरीचा काळा त्यातच १८५७ चे बंड, त्या बंडाचा मोड, नंतरचे परिणाम हे सारे येते.  एकोणिसाव्या शतकाच्या मध्यला उत्तर व मध्य हिंदुस्थानात आणि बंगाल यांच्यातील स्थितीत मोठा फरक होता.  बंगालमधील बुध्दिमान वर्गावर इंग्रजी विचार व वाङ्मय यांचा परिणाम झाला होता.  सनदशीर राजकीय सुधारणांसाठी हे लोक इंग्लंडच्या तोंडाकडे पाहात होते; परंतु उत्तर व मध्य हिंदुस्थानात सर्वत्र बंडाचे वारे भिरभिरत होते.

ब्रिटिश सत्तेचे आणि पाश्चिमात्य संस्कारांचे पहिले परिणाम आपणांस बंगालमध्ये अधिक स्पष्टपणे पाहायला मिळतात.  जुनी कृषिप्रधान अर्थव्यवस्था संपूर्णपणे नष्ट केली गेली होती.  जुने सरंजामशाही वर्ग निकालात काढण्यात आले होते.  त्यांच्या जागी एक नवीन जमिनीचा मालकवर्ग निर्माण करण्यात आला होता.  त्यांचा देहस्वभावाने किंवा परंपरेने शेतीशी फार कमी संबंध होता.  सरंजामशाही पध्दतीतील जमीनदारांचे गुण या नवीनांच्या अंगी मुळीच नव्हते.  त्यांचे दोष मात्र सारे होते.  शेतकरी दुष्काळामुळे रंजीस आले होते व नाना प्रकारे त्यांची लूटमार चालविण्यात येत असल्यामुळे ते अगदी दरिद्री झाले होते.  कलाकुसरीची कामे करणारा वर्ग जवळजवळ नष्ट झाला होता.  अशा या विस्कळीत आणि जीर्णशीर्ण पायावर नवीन वर्ग उभे राहिले, नवीन संघ जन्माला आहे.  ब्रिटिश सत्तेने त्यांना जन्म दिला होता आणि तिच्याशी त्यांचे अनेक संबंध होते.  नवीन व्यापारी वर्ग उदयाला आला.  तो ब्रिटिशा उद्योगधंद्यांचा केवळ दलाल होता व त्यांचा माल विकून जे काही उरेल त्याच्यावरच तो संतुष्ट राही.  दुय्यम दर्जाच्या नोकरीचाकरीत सुशिक्षित वर्ग होते व काही सुशिक्षितांनी प्रतिष्ठित असे विद्वत्तादर्शक व्यवसाय उचलले.  त्यांची बढती ब्रिटिशांच्या हाती होती व पाश्चिमात्य विचारांचाच कमी-अधिक प्रमाणात त्यांच्यावर संस्कार झालेला असे.  हिंदुसमाजाची सामाजिक रचना आणि हिंदुसमाजातील अनेक बलवान रूढी यांच्याविषयी त्यांच्या मनात एक प्रकारची बंडखोरी उत्पन्न झाली.  इंग्रजी उदारमतवाद, इंग्रजी संस्था यांतूनच त्यांना नवे विचार सुचू लागले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel