असे आक्षेप असूनही तैनाती फौजेची पध्दती पध्दतशीरपणे सर्वत्र अमलात आणली गेली.  आणि जुलूम, लाचलुचपत इत्यादी प्रकार अपरिहार्यपणे पाठोपाठ आलेच.  या संस्थानांतील कारभार वाईट असेच; परंतु त्यांना कोणतीही सत्ता नसे.  मेटकाफसारखे काही थोडे रेसिडेंट प्रामाणिक व सदसद्विवेकबुध्दी शाबूत असलेले असे असत, परंतु ते अपवादात्मकच.  बहुतेक सारे वेश्येसारखे सत्ता मात्र गाजवीत आणि जबाबदारी तिळभरही घेत नसत.  काही खाजगी इंग्रज भामटे नशीब उघडायला आलेले--या संस्थानांतून धुमाकूळ घालून संस्थानी पैशाचे मातेरे करीत.  सरकारी अधिकार्‍यांचा आपणांस पाठिंबा आहे आणि आपण गोर्‍या राज्यकर्त्यांच्या जातीचे आहोत ही जाणीव असल्यामुळे त्यांना कशाचे भय नसे.  अयोध्या आणि हैदराबाद संस्थानांत एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धांत ज्या गोष्टी घडल्या त्या कल्पनातीत आहेत.  १८५७ च्या बंडाआधी थोडे दिवस अयोध्या संस्थान खालसा केले गेले.

संस्थाने खालसा करण्याचे धोरण त्या वेळेस चालू होते व सापडेल त्या निमित्ताचा फायदा घेऊन संस्थाने ब्रिटिश मुलुखाला जोडण्याचा सपाटा चालला होता.  परंतु १८५७ च्या बंडाने- स्वातंत्र्ययुध्दाने या तैनाती संस्थानांचे महत्त्व ब्रिटिश सरकारला कळले.  काही थोडी अपवादात्मकच संस्थाने त्या वेळेस गडबडली, परंतु बहुतेक सारी अलिप्त राहीली, एवढेच नव्हे, तर ते स्वातंत्र्ययुध्द दडपून टाकायला इंग्रजांना त्यांनी प्रत्यक्ष मदत दिली.  यामुळे त्यांच्यासंबंधीच्या ब्रिटिश धोरणात फरक होऊन ती संस्थाने टिकविली पाहिजेत, एवढेच नव्हे तर, ती बळकट केली पाहिजेत असे ब्रिटिशांनी ठरविले.

तत्त्वत: सर्व संस्थानांवर सार्वभौम सत्ता ब्रिटिश सरकारची आहे असे जाहीर करण्यात आले व प्रत्यक्ष कारभारात संस्थानांवर हिंदुस्थान सरकारच्या राजकीय खात्याची अव्याहत करडी नजर सुरू झाली.  कधीकधी राज्यकर्त्यांना वाटेल तेव्हा काढून टाकले आहे व कधीकधी त्यांची सत्ता हिरावून घेऊन ब्रिटिश सनदी नोकरांतील माणसे त्यांच्यावर दिवाण म्हणून लादली गेली आहेत.  आजही कितीतरी संस्थानांतून असे मंत्री काम करीत आहेत आणि ते स्वत:ला राजाला जबाबदार न मानता ब्रिटिश सत्तेला जबाबदार समजून वागतात. 

काही संस्थानिक चांगले असतात, काही वाईट असतात.  परंतु जे चांगले असतात त्यांच्याही मार्गात पदोपदी विघ्ने आणली जाऊन त्यांचे हेतू विफल केले जातात.  राजांचा वर्ग ह्या दृष्टीने पाहिले तर बहुतेक राज्यकर्ते अपरिहार्यपणे प्रतिगामीच आहेत, व त्यांची दृष्टी सरंजामशाही वृत्तीची आणि त्यांचे मार्ग हुकूमशाही पध्दतीचे आहेत.  फक्त ब्रिटिश सरकारशी वागतात ते लाचार वृत्तीने वागतात.  ''संस्थाने म्हणजे हिंदुस्थानातील ब्रिटिशांचा पंचमस्तंभ होय,'' असे शेलवणकर यांनी म्हटले आहे ते बरोबर आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel