पूर्वेकडे काय किंवा पश्चिमेकडे काय; प्रत्येक देशाला स्वत:चे वैशिष्ट्य आलेले आहे, प्रत्येक देशाने स्वतंत्रपणे आपले असे काही जगापुढे मांडलेले आहे.  प्रत्येकाने आपापल्या विशिष्ट रीतीने जीवनाचे प्रश्न सोडवायचा यत्न केला आहे.  ग्रीस देशाचेही काही निश्चित, अपूर्व वैशिष्ट्य आहे.  तसेच भारत, चीन, इराण यांचे वेगवेगळे अपूर्व वैशिष्ट्य आहे.  प्राचीन हिंदुस्थान आणि प्राचीन ग्रीस हे परस्परभिन्न असूनही परस्परसदृशही होते; चीनच्या बाबतीतही, चीन आणि हिंदुस्थान यांच्यात काही भिन्नता असली तरी विचारांत समानता होती.  या सर्वांचीच दृष्टी उदार व सहिष्णू होती.  नाना प्रकारच्या देवदेवता ते मानीत, विविध सौंदर्यलहरींनी नटलेल्या मानवी जीवनाचा व निसर्गाचा उपभोग आनंदाने घेण्याची त्यांची वृत्ती होती.  त्यांना सर्व प्रकारच्या कलांचा छंद होता, व हजारो वर्षे जगाचा अनुभव घेताघेता साचलेले जुन्या लोकांचे शहाणपण त्यांच्या अंगी आले होते.  प्रत्येकजण आपल्या वांशिक गुणधर्मानुसार वाढले, विकास करून घेते झाले; सभोवतालच्या परिस्थितीचा प्रत्येकावर परिणाम झाला; आणि प्रत्येकाने जीवनातल्या एखाद्या गोष्टीवर अधिक भर दिलेला आहे.  ज्याच्यावर भर द्यायचा ती गोष्ट प्रत्येकाची वेगळी होती.  ग्रीकांचे जीवनविषयक तत्त्वज्ञान चालू काळापुरते पाहण्याचे असावे.  सभोवती जे सृष्टिसौंदर्य त्यांना दिसे किंवा जे सौंदर्य त्यांनी निर्माण केले होते त्यामध्ये ते आनंद घेत, त्यात त्यांना एक प्रकारचे समाधान मिळे.  हिंदी लोकही प्रत्यक्ष वर्तमानकाळात, सभोवतालच्या जीवनात आनंद आणि समाधान अनुभवीत; परंतु तेवढ्यावर ते तृप्त नसत.  अधिक गंभीर ज्ञानाकडे त्यांचे डोळे वळत आणि निराळ्याच विचित्र प्रश्नांच्या जगात त्यांचे मन गुंतून पडे.  हे प्रश्न काय आहेत व ते किती गहनगूढ आहेत ते चिनी लोकांना पूर्णपणे ठाऊक होते.  परंतु शहाणपणाने या जंगलात, या गुंतागुंतीत शिरण्याचे त्यांनी टाळले.  प्रत्येकाने जीवनातील पूर्णता व आनंद म्हणजे काय ते आपापल्या विशिष्ट पध्दतीने प्रकट करण्याचा प्रयत्न केला आहे.  चीन आणि हिंदुस्थान यांनी घातलेले पाये अधिक मजबूत होते.  त्या पायांत टिकून राहण्याची अधिक शक्ती होती, ही गोष्ट इतिहासाने दाखवून दिली आहे.  या पायांना आता जोराचे धक्के बसले आहेत, त्यामुळे ते कमजोर झाले आहेत व पुढचे काही सांगता येत नसले तरी अद्याप टिकून आहेत.  प्राचीन ग्रीस खूप चमकला पण त्याचे जीवन अगदी अल्पायुषी झाले व पुढे काही उत्कट कलाकृती, पुढच्या झालेल्या संस्कृतीवरचा परिणाम व समृध्द परंतु स्वल्प जीवनाची चटकदार आठवण यापलीकडे प्राचीन ग्रीसचे आज घटकेला काहीही राहिलेले नाही.  कदाचित वर्तमान काळातच अती रमल्यामुळे ते राष्ट्र आज भूतकाळात जमा झाले.

युरोपियन राष्ट्रे स्वत:ला ग्रीक संस्कृतीची अपत्ये समजत असली तरी आजच्या युरोपियन राष्ट्रांचे आणि ग्रीकांचे जे काही साम्य असेल त्यापेक्षा कितीतरी पटीने विचारात आणि दृष्टीत हिंदुस्थानचे आणि प्राचीन ग्रीकांचे अधिक साम्य आहे.  आपण बहुधा ही गोष्ट. विसरतो, कारण आपण वंशपरंपरा काही पूर्वग्रह पक्के करून घेतलेले आहेत, आणि त्यामुळे तर्कशुध्द विचारांना वाव मिळत नाही.  असे नेहमी म्हणण्यात येते की, हिंदुस्थान म्हणजे धर्मनिष्ठा तत्त्वज्ञानात रंगलेला, उलटसुलट कल्पनांत गुरफटलेला, अध्यात्मात गुंगलेला, इहलोकीचे प्रस्तुत सोडून परलोक व परमतत्त्वाच्या स्वप्नात गढलेला असा एक देश आहे.  हा प्रचार पुष्कळ झालेला आहे व हिंदुस्थानने असेच चिंतनात व विचारात तन्मय राहावे अशीही असा प्रचार करणार्‍यांची इच्छा असेल.  कारण मग त्यांना विरोध करायला हिंदुस्थान उभा राहणार नाही व जगाची लूट करायला, जीवनातील सर्व सुखोपभोग भोगायला त्यांना मग स्वच्छंद वाव मिळेल.  या प्रचारकांना सांगायचे आहे की, होय, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंदुस्थान होता.  परंतु तेवढाच नव्हता, याहूनही अधिक त्याच्याजवळ काही होते.  बाल्यातील निष्पाप व निश्चित वृत्तीचा याने अनुभव घेतलेला आहे.  तारुण्यातील विकारवशता व बेदरकारवृत्तीही त्याने अनुभवली आहे, आणि सुखदु:खाच्या दीर्घ अनुभवातून पिळून काढलेले प्रौढाचे शहाणपणही त्याने मिळविले आहे.  भारतवर्षाने बाल्याचा, यौवनाचा, परिणत वयाचा पुन:पुन्हा अनुभव घेतला आहे.  हजारो वर्षांचे वय व हजारो योजने शरीराचा विस्तार वाहतावाहता भारताला शीण येऊन पोक आले आहे.  दुष्ट रूढी व भ्रष्ट आचार यांचे भुंगेही त्याला पोखरीत आहेत.  कितीतरी बांडगुळांनी त्याची गळचेपी चालविली आहे, त्याचे रक्तशोषण सुरू आहे.  परंतु या सर्वांच्या पाठीमागे युगायुगांचे सामर्थ्य, एका प्राचीन मानववंशाच्या पिढ्यापिढ्यांनी मिळवून दिलेले सुप्तज्ञान उभे आहे.  आम्ही फार पुरातन लोक आहोत, दृष्टीसुध्दा पोचत नाही इतकी अनंत शतके रांग लावून आमच्या कानांत गुणगुणत आहेत.  परंतु कितीही पुरातनत्व आले तरी पुन:पुन्हा नवयौवनसंपन्न कसे व्हावे तेही आम्हाला माहीत आहे.  गतकालातील स्मृती व स्वप्ने जरी आमच्यासमोर सदैव असली तरी पुन:पुन्हा नवयौवन मिळविण्याची विद्या आम्ही शिकलो आहोत.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel