अशा रीतीने जातिव्यवस्था ही समाजाच्या सेवेवर आणि विशिष्ट धंद्यावर उभारलेली होती.  ह्या वर्णव्यवस्थेचा उद्देश हा होता की, यात सर्वांचा समावेश तर व्हावा, परंतु सर्वांना एकाच धर्मप्रकारावर, आचारावर कडवी श्रध्दा ठेवण्याची सक्ती असू नये.  प्रत्येक शाखेला या बाबतीत पूर्ण मोकळीक राहावी.  जातिव्यवस्थेच्या या विशाल कक्षेत नाना प्रकार होते.  तेथे एकपत्नीव्रत होते, बहुपत्नीकत्वाची चाल होती, ब्रह्मचारीही होते.  नाना चाली, नाना आचार, नाना रूढी, नाना दैवते यांच्या बाबतीत ज्याप्रमाणे सहिष्णुता असे, त्याप्रमाणे याही बाबतीत असे.  कोणत्याही पातळीवरचे जीवन असो, त्याची समाजात धारणा व्हावी अशी या व्यवस्थेत योजना होती.  अल्पसंख्याकांनी बहुसंख्याकांना शरण जाण्याची जरुरी नव्हती. कारण त्यांना स्वत:चा स्वायत्त असा संघ करण्याची सदैव मुभाच असे.  कसोटी किंवा अट एकच असे, स्वतंत्र जात म्हणून चालू राहण्याइतपत तो संघ मोठा आहे किंवा नाही.  निरनिराळ्या जातिजमातींत वाटेल तितके भेद असले तरी चालत.  वंश, धर्म, रंग, संस्कृती, बौध्दिक विकास इत्यादी स्वरूपाचे कितीही भेद असले तरी आपण स्वतंत्र राहून एका विशिष्ट सामाजिक संघटनेचे सारे भाग असत.

व्यक्ती म्हणजे त्या जातीतील, त्या संघातील एक सभासद या अर्थाने पाहण्यात येई.  संघाच्या, जातीच्या एकंदर कार्यात व्यक्ती जोपर्यंत ढवळाढवळ करीत नाही, तोपर्यंत व्यक्तीला वाटेल ते करण्याचे स्वातंत्र्य असे.  समूहाच्या कार्यात विघ्न आणण्याचा, त्याला हक्क नसे.  परंतु आपल्याला पुष्कळांचा पाठिंबा आहे, आपण प्रबळ आहोत असे एखाद्याला वाटले तर तो स्वत:चा एक नवीन संघ बनवी.  कोणत्याच समूहाशी, संघाशी त्याचे पटत नसेल तर संसारात राहायला तो योग्य नाही, जगातील सामाजिक व्यवहार त्याला जमणार नाही असा त्याचा अर्थ केला जाई.  त्याने वाटले तर मग संन्याशी व्हावे.  जातपात, संघ, समूह हा व्यावहारिक पसारा, हा प्रपंच सारे सोडून त्याने जावे, जगभर विचरावे, स्वच्छंद वागावे.

भारतीय सामाजिक प्रवृत्ती व्यक्तीला समाजापेक्षा, समूहापेक्षा कमी महत्त्व देण्याकडे होती, परंतु भारतीय धार्मिक व आध्यात्मिक प्रवृत्ती व्यक्तीला महत्त्व देणारी होती ही गोष्ट आपण विसरता कामा नये.  मोक्षा अंतिम सत्याचे ज्ञान, याचे सारे अधिकारी होते.  कोणतीही जात असो, उच्च असो वा नीच असो, सर्वांना मोक्षाची दारे, परमज्ञानाची दारे मोकळी होती.  मोक्ष, ब्रह्मज्ञान यात जातीचा प्रश्नच नव्हता.  तो ज्या त्या व्यक्तिपुरताच होता.  या मोक्षसंशोधनातही साधनांची विविधता होती.  अमुकच केल्याने मोक्ष मिळतो असा हट्ट नव्हता. सारे मार्ग मोक्षाकडेच जाणारे आहेत असे प्रतिपादिले जाई.

सामाजिक संघटनेच्या क्षेत्रात, संघाला, समूहाला प्राधान्य दिल्यामुळे जातिव्यवस्था आली.  तरी एकंदरीत हिंदुस्थानात व्यक्तिवादालाच महत्त्व होते, व्याक्तिवादाकडेच प्रवृत्ती होती असे दिसून येईल.  या दोन दृष्टींतील झगडा आपणास पुष्कळ वेळा दिसून येतो.  धर्म व्यक्तीवर भर देई त्यामुळेही व्यक्तिवाद पुढे आला.  तसेच धर्मसुधारकही जे येत ते जातिभेदावर झोड उठवी  समाजसुधारक हे बहुधा धर्मसुधारक असत.  ते म्हणत की, या जाती हे नाना भेद आध्यात्मिक विकासाच्या आड येतात.  धर्म व्यक्तीला ओळखतो, जातबीत ओळखत नाही असे ते प्रतिपादीत. बौध्दधर्म म्हणजे जातिसमूहाच्या ध्येयाविरूध्द बंड होते.  बौध्दधर्म व्यक्तिवादी व विश्ववादी होता.  परंतु संसारापासून दूर जाणे, विरक्त होणे हा या व्यक्तिवादाचा अर्थ केला गेला.  जातीशी मिळून वागायचे नसेल तर भिक्षू होणे, सन्यासी होणे असे जाणू झाले.  समाजरचनेतील जातितत्त्वावर हल्ले चढविले गेले.  परंतु त्याच्या जागी दुसरे परिणामकारक असे सामाजिक तत्त्व पुढे मांडण्यात आले नाही, त्यामुळे जात नाहीशी झाली नाही.  त्या वेळी आणि पुढेही जाती टिकूनच राहिल्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel