प्रवास फार लांबचा पडतो तेव्हा ही भेट लहान असे मनात आणू नका.  या वस्त्रांचा तुम्ही स्वीकार करावा अशी आमची इच्छा आहे.  जी सूत्रे आणि शास्त्रे तुम्हांला लागतील, त्यांची एक यादी करून पाठवा म्हणजे हस्तलिखित प्रती करून आम्ही पाठवू.''  उत्तरात ह्युएनत्संग लिहितो, ''नुकत्याच आलेल्या वकिलाकडून कळले की थोर आचार्य शीलभद्र मरण पावले.  ती वार्ता ऐकून मी अपार दु:खविव्हळ झालो.  जी सुत्रे व शास्त्रे मी बरोबर आणली होती, त्यांची योगाचार्य-भूमि-शास्त्र याचे तसेच आणखी कित्येकांचे भाषांतर मी केले आहे.  एकूण तीस भाग होतील.  सिंधू नदीतून पलीकडे जात असता माझ्याबरोबरच्या पवित्र पोथ्यांचे एक गाठोडे नदीत पडले ते गेले. प्रस्तुतच्या पत्रासोबत आवश्यक त्या ग्रंथांची यादी दिली आहे.  संधी मिळाली तर हे ग्रंथ मला पाठवावे अशी विनंती आहे.  काही लहान वस्तू भेट म्हणून पाठविल्या आहेत.  त्यांचाही कृपेने स्वीकार करा.'' *

ह्युएनत्संगने नालंदा विद्यापीठाविषयी बरेचसे लिहिले आहे.  आणखीही दुसरे वृत्तांत या विद्यापीठाविषयी उपलब्ध आहेत.  परंतु काही वर्षांपूर्वी मी त्या ठिकाणी गेलो होतो व तेथील उत्खनन पाहिले तेव्हा नालंदा विद्यापीठाचा विस्तार व त्याची एकंदर अफाट योजना हे सारे पाहून मी थक्क झालो.  काही थोडेसेच उत्खनन झाले होते,  उरलेल्या भागावर लोक हल्ली राहतात, तेथे घरे-दारे आहेत.  परंतु खणून काढलेला जो लहानसा भाग आहे तेथे सुध्दा प्रचंड प्रांगणाच्या भोवती भव्य दगडी इमारती होत्या.

चीनमध्ये ह्युएनत्संग मरण पावल्यावर लौकरच आणखी एक प्रवासी हिंदुस्थानात यायला निघाला.  त्याचे नाव इत्सिंग किंवा यि-त्सिंग.  इ.स. ६७१ मध्ये तो निघाला व हुगळीच्या मुखाजवळीत ताम्रलिपती बंदरात येऊन दाखल व्हायला त्याला दोन वर्षे लागली.  समुद्रमार्गे येताना वाटेत सुमात्रा बेटात श्रीभोग (अर्वाचीन पाळेबांग) येथे संस्कृतच्या अध्ययनासाठी काही महिने त्याने मुक्काम केला.  त्या काळी मध्यआशियातील राजकीय परिस्थिती शांततेची नव्हती.  निरनिराळे बदल होत होते, घडामोडी होत होत्या आणि म्हणूनच यित्सिंगने समुद्रप्रवास पत्करला असावा.  कारण भूमिमार्गाने येणे धोक्याचे होते.  ठायीठायी स्वागत करणारे, आश्रय देणारे जे मठ होते, ते उद्ध्वस्त झाले होते,  नष्ट झाले होते.  समुद्रमार्ग अधिक सुखसोयीचाही त्या वेळेस
--------------------
*  डॉ. पी. सी. बागची यांच्या 'हिंदुस्थान आणि चीन' (कलकत्ता १९४४) या पुस्तकातून.

असेल, कारण हिंदी वसाहती तिकडे पसरल्या होत्या, व हिंदुस्थानशी इंडोनेशियातील या प्रदेशांचा व्यापारधंद्याच्या आणि अन्य निमित्तांच्या योगाने नित्य संबंध असे. यित्सिंगने लिहून ठेवलेल्या हकीकतीवरून तसेच तात्कालीन अन्य वृत्तांतावरून दिसून येते की, इराण, हिंदुस्थान, मलाया, सुमात्रा, चीन या देशांमध्ये नियमित नौकानयन सुरू होते.  क्वांगटुंग येथून यित्सिंग प्रथम निघाला तो एका पर्शियन गलबतातून व त्यातून तो सुमात्रात आला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel