प्राचीन हिंदुस्थान आणि ग्रीस यांच्यात पुष्कळ बाबतीत भिन्नता असूनही काही बाबतींत इतके विलक्षण साम्य दिसते की, दोन्ही देशांतील जीवनाची पार्श्वभूमी बरीचशी समान असावी असे मला वाटते.  अथेन्सच्या लोकशाहीचा अंत करणार्‍या पेलापोनोशियन युध्दाची कुरुक्षेत्रावरील महायुध्दाशी काही बाबतींत तुलना करता येण्यासारखी आहे.  ग्रीक संस्कृतीला अपयश आल्यामुळे अथेन्सच्या स्वतंत्र नगरराज्याचा पाडाव झाल्यामुळे संशय आणि निराशा यांची भावना सर्वत्र प्रादुर्भूत होऊन लोक गूढवादाकडे, साक्षात्काराकडे, दैवी संदेशाकडे वळले; ग्रीक लोकांची पूर्वीची परमोच्च ध्येये जाऊन, त्यांचा अध:पात होऊ लागला.  या जगापेक्षा परलोकाकडेच डोळे अधिक लागले; आणि आणखी काही काळाने स्टोइक व एपिक्युरिअन नावाने दु:खवादी आणि सुखवादी दोन नवे तत्त्वज्ञानात्मक संप्रदाय जन्माला आले.

तुटपुंज्या आणि कधी परस्पर विरोधी पुराव्याच्या आधारावर ऐतिहासिक तुलना करणे हे धोक्याचे आहे, चुकीच्या मार्गाने नेणारे आहे, ही गोष्ट खरी.  परंतु आपणाला असे करण्याचा मोह होतो.  भारतीय युध्दानंतरचा हिंदुस्थानातील काळातला मतामतांचा गलबला, मनाची अनिश्चिती सर्वत्र भरलेली पाहून अथेन्सच्या पाडावानंतर ग्रीक संस्कृतीची जी स्थिती झाली होती तिची आठवण होते.  हिंदुस्थानातही ध्येयातील उदात्तता जाऊन त्यांना हीन स्वरूप येऊ लागले.  आणि मग नवीन तत्त्वज्ञाने आणि नवीन दर्शने यांच्यासाठी अंधारात चाचपडणे सुरू झाले.  राजकीय आणि आर्थिक दृष्ट्याही ग्रीस व हिंदुस्थानात घडून आलेली अंतस्थ स्थित्यंतरे सारखीच असतील.  संघराज्ये, जातिजमातींची लोकराज्ये दुबळी झाली असतील; नगरराज्ये सत्ताहीन झाली असतील; आणि राज्यसत्ता एकाच ठिकाणी एकवटण्याची प्रवृत्ती होऊ लागली असेल.

परंतु ही तुलना आणखी अधिक करता येणार नाही.  ग्रीक संस्कृती त्या उत्पातातून पुन्हा कधीही सावरली नाही.  आणखी काही शतके भूमध्यसमुद्राच्या आसपास ती संस्कृती भरभराटत राहिली ही गोष्ट खरी.  पुढे रोमन साम्राज्यावर आणि युरोपवर तिचा परिणामही झाला, परंतु ती मूळची ग्रीक संस्कृतीच नाहीशी झाली.  हिंदुस्थानात तसे न होता येथे हिंदी संस्कृती पुन्हा नीट सावरली; आणि महाभारत आणि बुध्द यांच्या काळापासून पुढे जवळजवळ एक हजार वर्षे ह्या संस्कृतीला सारखा नवा बहार येत राहिला.  तत्त्वज्ञान, काव्य, नाटक, साहित्य, गणित, नाना कला इत्यादी क्षेत्रांत नाव घेण्यासारख्या कितीतरी अगणित व्यक्ती एकदम डोळ्यांसमोर येतात.  इसवी सनाच्या पहिल्या काही शतकांत वसाहती स्थापण्याचे धाडसी, सुसंघटित प्रयत्न करण्याकडे ही उत्साही प्रेरणा वळून भारतीय व त्यांची संस्कृती पूर्वेकडच्या सागरातील दूरदूरच्या बेटांवर पोचली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel