हिंदू लोकांत शुचिर्भूतपणाला नंतरच्या काळात फारच महत्त्व आहे.  याचा एक चांगला परिणाम हा झाला की, शारीरिक स्वच्छता सारे ठेवतात.  परंतु दुष्परिणाम बरेच झाले.  हिंदू लोक रोज आंघोळ केल्याशिवाय राहणार नाहीत.  गरीबवर्गही बहुधा रोज स्नान करतील.  स्नानाची ही पध्दती हिंदुस्थानातून इंग्लंड वगैरे देशांत गेली.  सर्वसामान्य हिंदू माणसाच्या अगदी गरिबाच्यासुध्दा घरातील जी काय चारदोन भांडीकुंडी असतील, ती सारी स्वच्छ असतात.  हिंदू माणसाला या स्वच्छतेचा अभिमानही वाटतो.  परंतु स्वच्छतेची ही कल्पना शास्त्रीय मात्र नसे.  दोनदा अंघोळ करणारा मनुष्य अस्वच्छ जंतू असलेलेही पाणी पिईल.  तसेच सामाजिक स्वच्छतेचीही जाणीव नसे; निदान आजतरी दिसत नाही.  मनुष्य आपली झोपडी साफसूफ करील, परंतु शेजार्‍याच्या घरासमोर रस्त्यावर कचरा टाकून देईल.  खेड्यात जाल तर सर्वत्र घाण दिसेल.  ठायीठायी घाणीचे ढिगारे दिसतील.  स्वच्छतेसाठी म्हणून स्वच्छता हा विचार नाही.  धर्माने सांगितले म्हणून स्नान, म्हणून ही शुचिर्भूतता.  जेथे स्वच्छता ठेवण्याबद्दल धर्माचा धाक नाहीसा झाला तेथे स्वच्छतेचे प्रमाण सहज लक्षात येण्याइतके झपाट्याने कमी होते.

या धार्मिक शुचिर्भूततेमुळे सोवळेपणाची, दूरदूर राहण्याची, शिवाशिव, विटाळचांडाळ मानण्याच्या वृत्तीची वाढ झाली.  दुसर्‍या जातीच्या लोकांकडे जेवायचे नाही, पाणी प्यायचे नाही, असले प्रकार वाढले.  जगात कोठेही दिसणार नाहीत असे ते अवास्तव व विचित्र प्रकार येथे पराकोटीला गेले.  ज्यांना गलिच्छ परंतु आवश्यक असे काम दुर्दैवाने करावे लागे त्यांना अस्पृश्य मानण्यात येऊ लागले.  हळूहळू ज्याने त्याने सामान्यत: आपल्याच जातीत जेवायचे अशी चाल पडत चालली.  ही सामाजिक प्रतिष्ठेची बाब होऊन बसली, आणि वरच्या जातींपेक्षाही खालच्या जाती या चालीला अधिकच कट्टरपणे धरून बसल्या.  वरच्या वर्गातून या गोष्टी आता जात आहेत, परंतु खालच्या जातीतून अद्याप हे प्रकार आहेत आणि दलित वर्गातही त्याने याचे खायचे नाही, याने त्याचे खायचे नाही असे आहे.

रोटीव्यवहारही जेथे बंद झाला, तेथे बेटीव्यवहार किती बंद असेल याची कल्पनाच करावी.  काही मिश्रविवाह अपरिहार्य म्हणून होत, परंतु सामान्यत: एका जातीतच लग्ने, एका जातीच्या बंधनात राहूनच वंशवाढ, ही मर्यादा इतकी सांभाळली गेली कशी याचे नवल वाटते.  एखाद्या मानववंश शतकानुशतके तोच, जसाच्या तसा चालू राहतो,  हा एक भ्रम आहे.  परंतु हिंदुस्थानातील जातिव्यवस्थेमुळे निदान वरिष्ठ जातीत तरी विशिष्ट मानवी नमुने, विशिष्ट परंपरा चालत आलेली दिसून येईल.

सामाजिक सोपानाच्या अगदी तळाशी असणार्‍या काही जाती या चातुरर्वर्ण्य व्यवस्थेतल्या नाहीत असा केव्हा केव्हा उल्लेख करण्यात येतो.  परंतु वर्णव्यवस्थेत सर्वांचा, अस्पृश्यांचाही समावेश असल्यामुळे जातिविहीन असे वर्ग नाहीत.  दलित आणि अस्पृश्यांच्याही जाती आहेत, त्यांच्या पंचायती आहेत, ते जातीतील भानगडी पंचायतीत बसून मिटवितात; परंतु खेडेगावातील सर्वसाधारण सामाजिक जीवनातून यांपैकी काही जातींना मुद्दाम वगळले गेल्यामुळे त्यांचे अपार नुकसान झाले आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel