भारतीय सामाजिक रचना; जातीचे किंवा संघाचे महत्त्व

ज्याला म्हणून हिंदुस्थानची काही माहिती आहे, त्याने जातिभेदाविषयी ऐकले असलेच पाहिजे.  बहुतेक सारे परकी लोक आणि हिंदुस्थानातीलही बरेचसे लोक जातिभेदावर टीका करतात, त्याचा धिक्कार करतात.  जातिभेद, हल्ली त्याच्यात फुटलेल्या फाट्यांच्या गोंधळासह व त्यात जी भर पडली आहे त्यासह जसाच्या तसा राहावा असे आज कोणालाच वाटत नाही.  परंतु त्यातील मूलभूत कल्पना मानणारे आणि आपल्या जीवनात तद्‍नुरूप वागणारे अजूनही पुष्कळ हिंदू दिसतील.  जाती या शब्दाच्या अर्थासंबंधीच पुष्कळसा गोंधळ आहे.  निरनिराळे लोक त्याचा निरनिराळा अर्थ करतात.  सर्वसाधारण युरोपियन आणि त्यांच्या विचारांशी आणि दृष्टीशी एकरूप असणारे हिंदी लोक जातिभेद म्हणजे ठरवी साच्याचे वर्ग, वर्गाच्या श्रेष्ठकनिष्ठपणांना टिकविण्याची एक सुंदर पध्दती असा अर्थ करतात; वरिष्ठ वर्गांनी सदैव वरती राहावे आणि कनिष्ठ वर्गांनी सदैव तळाशी राहावे अशा हेतूने निर्माण केलेली योजना असे म्हणतात.  या म्हणण्यात सत्य आहे आणि आरंभी तरी विजयी आर्यांना जित लोकांपासून अलग राखणे आणि त्यांच्याहून त्यांना वरचढ ठेवणे हा हेतू त्यात होता असे वाटते.  जरी आरंभी या वर्णव्यवस्थेत लवचिकपणा असला तरी पुढेपुढे श्रेष्ठकनिष्ठपणाच्या भावनेलाच अधिकाधिक प्राधान्य येत गेले.  परंतु ही गोष्ट खरी असली तरी हे संपूर्ण सत्य नव्हे.  जातिभेद आणि वर्णभेद हजारो वर्षे टिकून राहिले, ही पध्दती आजपर्यंत अस्तित्वात राहिली, तेव्हा काहीतरी अधिक त्यात असले पाहिजे.  काहीतरी ऐक्याची भावना, काहीतरी विशिष्ट शक्ती या वर्णव्यवस्थेच्या, जातिव्यवस्थेच्या मुळाशी असली पाहिजे. बौध्दधर्माच्या प्रबळ आघातांना पुरून ही व्यवस्था टिकाव धरून राहिली.  मुस्लिम धर्माचा प्रसार, अफगाण, मोगल यांची शेकडो वर्षांची सत्ता, एवढेच नव्हे, तर जातिभेदावर हल्ले चढवणार्‍या शेकडो हिंदू सुधारकांच्या व संतांच्या चळवळी, इत्यादी हल्ल्यांना तोंड देऊन ही पध्दती आजपर्यंत तग धरून राहिली आहे.  आज मात्र तिच्यावर प्राणांतिक आघात होऊन राहिले आहेत, तिच्या पायावरच प्रहार होत आहेत.  सुधारणा करण्याच्या अंत:प्रेरणेनेच हिंदू समाज ही पध्दती दूर करू पाहात आहे असे नाही; अशी प्रेरणा अर्थातच आहे.  परंतु ते मुख्य कारण नव्हे, किंवा परकी पाश्चिमात्य विचारांमुळे ही पध्दती नष्ट होणार आहे असेही नाही; अर्थात परकी विचारांचा नि:संशय परिणाम होत आहे.  परंतु या सर्व उलथापालथीच्या मुळाशी आर्थिक घडामोडी आहेत.  आजच्या आर्थिक फरकांमुळे सारा समाजच हादरत आहे.  सारी समाजरचनाच संपूर्णपणे कोलमडून पडण्याच्या बेतात आहे.  जीवनाचे स्वरूपच सारे बदलले आहे; परिस्थिती बदलली आहे; आणि विचारही बदलत आहेत, आणि ही वर्णव्यवस्था, ही जातिव्यवस्था आता टिकेल असे वाटत नाही.  तिच्याऐवजी दुसरी कोणती व्यवस्था येणार हे आज सांगणे कठीण आहे.  कारण केवळ वर्णव्यवस्था, जातिव्यवस्थाच धोक्यात आहे असे नाही; काहीतरी आर्थिक मोलाचे असे धोक्यात आहे.  सामाजिक रचनेकडे पाहण्याच्या दोन दृष्टींतील हा संघर्ष आहे.  या दोन दृष्टी परस्परविरोधी आहेत.  हिंदूंची समाजव्यवस्थेची जी कल्पना होती, तिचा मूलभूत घटक जाती हा होता, संघ हा होता; तर पाश्चिमात्यांच्या समाजव्यवस्थेत व्यक्तीला संघांहून अधिक महत्त्व असे.  पाश्चिमात्यात व्यक्तिवादाला प्राधान्य तर प्राचीन भारतीय समाज संघटनेत संघाला प्राधान्य होते.

हा संघर्ष हिंदुस्थानातच चालू आहे असे नाही; तो पश्चिमेकडेही आहे.  सार्‍या जगातच आहे; अर्थात त्याची तिकडची रूपे निराळी आहेत.  युरोपातील एकोणिसाव्या शतकातील सुधारणा म्हणजे व्यक्तिवादाची परमोच्च सीमा होय.  या सुधारणेनेच लोकशाहीतील उदारमतवाद पुढे आला; आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातही या सुधारणेने भरपूर प्रगती केली.  एकोणिसाव्या शतकातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील हे विचार पुढे विसाव्या शतकात वाहात आले.  परंतु हे विचार आता जुनाट झाले आहेत.  महायुध्दांच्या आणि जागतिक अरिष्टांच्या दडपणाखाली त्या विचारसरणी कोलमडून पडत आहेत.  आज समाज आणि संघ यांना अधिकाधिक महत्त्व येत आहे.  व्यक्तिवाद आणि समाजवाद यांचा मेळ कसा घालावा ही आजची समस्या आहे.  निरनिराळ्या देशांत हा प्रश्न निरनिराळ्या रूपांत सोडविला जाईल.  परंतु सर्व प्रयोगांच्या मुळाशी मूलभूत अशी, सर्वांना लागू पडेल अशी कोणतीतरी विचारसरणी अवश्य आहे असे सर्वांनाच वाटेल.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
Star

new comment

Star

hello

Star

+8 cooment

Star

This has too many comments.

Star

Loving this book.

Star

Finally.

Star

+2 bhai

Star

+1 bhai

Star

Great book.

இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel