व्यक्तिप्रधान तत्त्वज्ञान : लाभ व हानी

व्यक्तिमत्त्वाचा विकास सफल होण्याकरता शरीर कार्यक्षम व मन निर्मळ असलेच पाहिजे व दोन्हींवर संयम राखण्याचे वळण पाहिजे, असा उपनिषदांत सारखा आग्रह धरला आहे.  ज्ञान किंवा कोणतेही श्रेय मिळवावयाचे असेल तर त्याकरता संयम, तपश्चर्या, त्याग अवश्य मानली आहेत.  काहीतरी व्रत नियम पाळले पाहिजेत, तपस्या केली पाहिजे ही समजूत अगदी श्रेष्ठ, विचारी, ज्ञानी ते अगदी कनिष्ठ निरक्षर अडाण्यापर्यंत हाडीमासी खिळलेली आहे.  हजारो वर्षांपूर्वी हा विचार जागृत होता, तसा आजही आहे.  आणि गांधीजींच्या नेतृत्वाखाली सार्‍या देशाला हलवून सोडणार्‍या प्रचंड चळवळी झाल्या.  त्यांच्या पाठीमागे वैचारिक पार्श्वभूमी, त्यांच्या पाठीमागील मनोवृत्ती समजावयाला प्रथम ही त्यागतपस्येची कल्पना नीटपणे ध्यानात आली पाहिजे.

पृथ्वीवरच्या वातावरणात, वर उंच गेले म्हणजे श्वासोच्छ्वास करणे जडजड होत जाऊन जीवन गुदमरतो, बेशुध्दी येते, तशाच प्रकारच्या उंच पातळीवरच्या मानसिक वातावरणात वावरणार्‍या उपनिषदकारांचे विचार, त्या उच्च वातावरणात वावरताना बुध्दीची शुध्द कायम ठेवू शकणार्‍या काही निवडक लोकांनाच समजणे शक्य होते व ते त्यांच्याकरताच होते.  बहुसंख्य सामान्य लोकांच्या आवाक्याबाहेरचे होते.  नवे विचार, नव्या कल्पना निर्माण करणारे नेहमी अगदी थोडेच असतात.  परंतु बहुजनसमाजाशी त्यांची जर एकतानता झालेली असेल, बहुजनसमाजाला वरती नेण्यासाठी त्यांची जर नेहमी धडपड चालू असेल, दोघांमधील अंतर दिवसेंदिवस कमी व्हावे म्हणून जर त्यांचे प्रयत्न चालू असतील, तर एक स्थिर आणि अखंड प्रगतिशील संस्कृती निर्माण होते.  असे नवनिर्मिती करणारे लोक थोडेसुध्दा समाजात नसतील तर तो समाज मरणपंथाला लागतो, व त्या संस्कृतीचा नाश होणे टळत नाही.  परंतु नवनिर्मिती करणारे हे मूठभर लोक आणि बहुजनसमाज यांना जोडणारी साखळी तुटली व समाजिक संबंधाच्या दृष्टीने सगळा समाज एकजीव न राहता तुकडे पडू लागले, तरीही त्या संस्कृतीचा र्‍हास होणे शक्य आहे आणि तसे घडले तर ह्या पुढारलेल्या लहान वर्गाची नवनिर्मितीला आवश्य असलेली प्रतिभा लोपते व तो वर्ग वांझ व रुक्ष होतो.  केव्हा केव्हा त्याची जागा त्याच समाजातून निघालेल्या एखाद्या नवीन सजीव शक्तीला मिळते.

उपनिषत्कालीन परिस्थिती नीट डोळ्यासमोर आणणे, त्या वेळेस ज्या निरनिराळ्या वृत्ति-प्रवृत्ती, ज्या निरनिराळ्या शक्ती परस्परांवर परिणाम घडवीत होत्या, त्यांचे नीट पृथक्करण करणे मला व इतर पुष्कळांना कठीण आहे.  परंतु माझी कल्पना आहे की, त्या काळी तत्त्वचिंतनात गढून गेलेल्या मूठभर अल्पसंख्याकांचा विशेष वर्ग व सामान्य बहुजनसमाज यांच्यामध्ये बुध्दी व संस्कृतीच्या दृष्टीने अफाट अंतर असले तरी परस्परांचा दृढ संबंध जिवंत होता, निदान त्यांच्या मधोमध उघडउघड खड्डा पडलेला नव्हता.  समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ असे भेद पडलेले होते, त्या क्रमाने मानसिक उन्नतीचेही क्रम झालेले होते व हे भेद असे असावयाचेच हे गृहीत धरून भेदांची व्यवस्थाही लावण्यात आली होती.  त्यामुळे समाजात एकोपा राहून विरोध टळला.  उपनिषदांतील नव्या तत्त्वज्ञानालासुध्दा बहुजनसमाजाच्या उपयोगाकरता असे रूप दिले होते की, त्या समाजात प्रचलित असलेले पूर्वग्रह व भोळ्या समजुतींशी त्यांचा मेळ बसावा व रूपात निदान त्यातले सार यावे.  या रूपांतरामुळे त्या तत्त्वज्ञानातला बराच महत्त्वाचा भाग गळून जाई.  समाजातल्या वर्णव्यवस्थेला हात न लावता ती तशीच ठेवण्यात आली.  वेदांतील तत्त्वज्ञानात जे अद्वैत म्हणून ओळखले गेले होते त्या तत्त्वाचे सामान्य जनतेच्या धर्माचरणाकरता ईश्वर एकच आहे या कल्पनेत रूपांतर झाले.  व्यक्तीच्या मानसिक विकासाच्या हेतूने त्यांची श्रध्दा व बुध्दी कोणत्या पातळीपर्यंत वर आली आहे हे लक्षात घेऊन, त्याला योग्य म्हणून कनिष्ठ प्रकारच्या देवदेवता व त्यांचे पूजेचे प्रकार शिष्टसंमत झाले, इतकेच नव्हे, तर अशा कल्पनांना मुद्दाम उत्तेजन देण्यात आले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे பதிவு செய்யவும் करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
கருத்துக்கள்
இதுபோன்ற மேலும் கதைகள் மற்றும் புதுப்பிப்புகளுக்கு எங்கள் தந்தி குழுவில் சேரவும்.telegram channel