अशोकाला शिल्पांची बांधकामाची खूप हौस होती.  त्याने बांधलेल्या काही भव्य बांधकामांत मदतीकरता परकीय कारागीर कामाला लावले असावेत, असे कोणी कोणी म्हणतात.  घोसदार स्तंभ त्याने अनेक ठिकाणी उभारले आहेत.  त्यांच्या नमुन्यावरून हा तर्क करण्यात येतो. या काही स्तंभांमुळे पार्सिपॉलीसची आठवण होते.  परंतु या प्राचीन शिल्पात आणि जुन्या अवशेषांत परंपरागत हिंदी कलेचे विशेष दिसून येतात.

पाटलिपुत्र येथील अशोकाच्या अनेक स्तंभांचा सुप्रसिध्द दिवाणखाना प्राचीन वस्तुसंशोधन खात्यामार्फत थोडासा उकरून काढण्यात आला आहे.  ३० वर्षांपूर्वी हे काम झाले,  त्या वेळचे त्या खात्यातील अधिकारी डॉ. स्पूनर हे या उत्खननासंबंधी आपल्या अहवालात म्हणतात, ''ह्या दिवाणखान्याचे लाकडी काम असे उत्तम टिकले आहे की, ह्यातील मोठमोठे प्रचंड सरे दोन हजार वर्षांपूर्वी बसविले असतील, त्यावेळी असतील असे गुळगुळीत सुरेख आज घटकेला आहेत.'' ते आणखी म्हणतात, ''प्राचीन काळची ही लाकडे कशी टिकली याचे आश्चर्य वाटते; आणि कडा व सांधे तर इतके बेमालूम आहेत की ते कोठे आहेत ते समजूनही येत नाही.  ज्यांनी हा भाग खणताना हे पाहिले, त्यांना हे पाहून अचंबा वाटला.  सारी इमारतच इतक्या बिनचूकपणे आणि काळजीपूर्वक बांधलेली होती की, आजही त्याहून अधिक आपण काही करू शकणार नाही.''  थोडक्यात सांगायचे म्हणजे बांधकाम अप्रतिम होते.

हिंदुस्थानात अन्यत्रही ज्या खणून काढलेल्या इमारती सापडल्या आहेत, त्यातीलही लाकडी तुळ्या व फळ्या अतिउकृष्ट स्थितीत आहेत.  कोठेही ही गोष्ट आश्चर्याचीच मानायला हवी; परंतु हिंदुस्थानातील हवेमुळे झीज आणि लाकूड खाऊन टाकणारे शेकडो प्रकारचे किडे असूनही इतक्या चांगल्या रीतीने इमारतीतील लाकूड टिकून राहिले की खरोखरच नवलाईची गोष्ट आहे.  टिकाऊ व्हावे म्हणून लाकडावर काहीतरी प्रयोग करीत असावेत, काही विशिष्ट रीत असली पाहिजे.  ती काय रीत होती, ते अद्याप मला वाटते, गूढच आहे.

गया आणि पाटलिपुत्र यांच्या दरम्यान नालंदा विद्यापीठाचे भव्य अवशेष आहेत.  पुढच्या काळात ते विद्यापीठच अतिविख्यात झाले.  या विद्यापीठाचा आरंभ कधी झाला ते माहीत नाही, आणि अशोकाच्या काळात तत्संबंधीचे उल्लेख नाहीत.

एकेचाळीस वर्षे निरलसपणे राज्य केल्यानंतर अशोक राजा ख्रि.पूर्व २३२ मध्ये निधन पावला.  'जगाच्या इतिहासाची रूपरेखा' या आपल्या ग्रंथात एच. जी. वेल्स म्हणतो, ''राजेमहाराजांची, सम्राटांची, सामंतांची, नरपतींची, अधिपतींची जी हजारो नावे इतिहासात आहेत, त्यांत एका अशोकाचेच, फक्त या एकाचेच नाव तार्‍याप्रमाणे चमकत आहे.  व्होल्गा ते जपानपर्यंत त्याचे नाव अद्यापही आदराने घेतले जाते.  चीन, तिबेट येथे आणि त्याचा धर्म जरी आज हिंदुस्थानात नसला तरी तेथेही त्याच्या मोठेपणाची परंपरा अद्याप टिकून आहे.  आज जिवंत असणारी कितीतरी माणसे अशोकाची स्मृती भक्तिप्रेमाने हृदयाशी धरताना आढळतील, परंतु कॉन्स्टंटाईन किंवा शार्लमन यांचे नाव कितींना माहीत असेल ?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel