मनूची शासनसंस्थेची कल्पना लहान राज्याची होती. परंतु ही कल्पना वाढत होती, बदलत होती; तीतूनच प्रचंड असे मौर्य साम्राज्य पुढे उदयाला आले, आणि ग्रीक वगैरे लोकांशी राज्यसत्तेचे आंतरराष्ट्रीय संबंधही आले.

ग्रीक वकील मेग्यास्थेनीस हा ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात हिंदुस्थानात होता.  तो हिंदुस्थानात गुलामगिरी मुळीच नाही असे लिहितो.  परंतु त्याचे म्हणणे सर्वस्वी यथार्थ नाही.  कारण घरगुती कामाकरता दासदासी होत्या हे निश्चित आहे, व त्या काळातील हिंदी ग्रंथांतून दासदासींची स्थिती सुधारावी असे उल्लेख आहेत.  परंतु मोठ्या प्रमाणावर गुलामगिरी नव्हती, व काबाडकष्टाची कामे करून घेण्यासाठी गुलामांचे तांडेच्यातांडे लावण्यात येत नसत.  इतर देशांतून हे प्रकार त्या काळी प्रचलित होते, म्हणून मेग्यास्थेनिसला वाटले असेल की हिंदुस्थानात गुलामगिरी नाही.  आर्याला कधीही दास करता कामा नये असे शास्त्र सांगते.  नेमका आर्य कोण आणि अनार्य कोण हे समजणे कठीण आहे.  परंतु त्या काळी आर्य शब्दाने स्थूल मानाने चांडाळ सोडून शूद्रासकट चार मूठच्या वर्णाचा उल्लेख होऊ लागला होता.

चीनमध्येही प्राचीन हन् राजाच्या राजवटीत घरगुती कामासाठी गुलाम असत.  शेतीच्या कामाला किंवा मोठ्या प्रमाणात चाललेल्या काबाडकष्टाच्या कामात त्यांचे फारसे महत्त्व नसे.  हिंदुस्थानात काय किंवा चीनमध्ये काय, लोकसंख्येच्या मानाने घरगुती दासदासींची संख्या फारच कमी होती.  त्या काळच्या ग्रीक किंवा रोमन समाजरचनेत आणि हिंदी किंवा चिनी समाजरचनेत ह्या महत्त्वाच्या बाबतीत भलताच मोठा फरक दिसतो.

त्या दूरच्या प्राचीन काळातील आपले पूर्वज एकंदरीत कसे होते ?  आजच्या काळापासून विभिन्न आणि अतिदूरच्या काळातील त्या लोकांची स्पष्ट कल्पना करणे आपणाला कठीण आहे, परंतु जो काही विविध पुरावा आहे त्यावरून काही मोघम कल्पना आपल्याला करता येते.  आपल्या परंपरेची त्यांना खात्री होती व त्या परंपरेचा अभिमान होता.  अज्ञात गूढाचे मर्म शोधण्याची खटपट त्यांनी अधूनमधून सहज चालविली.  निसर्ग व मानवी जीवनाबद्दल नाना प्रकारचे प्रश्न काढण्याचा त्यांना छंद लागला होता.  त्यांनी स्वत: ठरविलेल्या नीती व योग्य-अयोग्याच्या मूल्यांना मान देऊनही जन्मभर सहज हसतखेळत जीवन जगून अखेर जीवाची फारशी पर्वा न ठेवता मृत्यूला तोंड देणारे असे हे आपले पूर्वज सदैव उत्साह बाळगणारे लोक होते.  उत्तर हिंदुस्थानावरील सिकंदरच्या स्वारीचा इतिहास लिहिणारा ग्रीक इतिहासकार अर्रियन हा भारतीयांच्या उल्हासवृत्तीमुळे एकदम थक्क झाला.  तो म्हणतो, ''हिंदुस्थानइतके नृत्य-गानाचे षोकी दुसरे राष्ट्र मी पाहिले नाही.''

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel